भारतीय संघाचे आत्तापर्यंतचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण

By Admin | Updated: March 14, 2015 00:43 IST2015-03-14T00:43:21+5:302015-03-14T00:43:21+5:30

मला अजून आठवतंय, आल्वीन कालिचरणला बिशन बेदी गोलंदाजी करत होते. कालिचरण एका चेंडूला आॅन-ड्राइव्हचा फटका मारत असताना चेंडू आॅफ साइडला उसळला

India's excellent fielding till now | भारतीय संघाचे आत्तापर्यंतचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण

भारतीय संघाचे आत्तापर्यंतचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण

रामचन्द्र गुहा, (क्रीडा आणि क्रिकेट समीक्षक) -

मला अजून आठवतंय, आल्वीन कालिचरणला बिशन बेदी गोलंदाजी करत होते. कालिचरण एका चेंडूला आॅन-ड्राइव्हचा फटका मारत असताना चेंडू आॅफ साइडला उसळला आणि बेदींनी लगेच ‘ब्रिजेश’ अशी हाक मारली. ती इतकी जबरदस्त होती की मी बसलो होतो, त्या फिरोजशाह कोटला मैदानाच्या आम आदमी स्टॅण्डपर्यंत ती पोहोचली. १९७४च्या त्या कसोटी सामन्यात भारताकडे केवळ पाचच चांगले क्षेत्ररक्षक होते. चारजण फलंदाजाच्या जवळ, इंजिनिअर यष्ट्यांच्या मागे तर स्लीपला वेंकटराघवन आणि लेग-ट्रॅपला सोलकर व आबिद अली. मैदानावर उभ्या सातपैकी सहाच चांगले क्रिकेटर होते, पण क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत सारे ढिम्म. त्यामुळेच बेदींची हाक फक्त ब्रिजेश पटेल यांच्यासाठीच होती.
याच सामन्यातला दुसरा क्षणसुद्धा उल्लेखनीय आहे. अष्टपैलू केथ बॉयस प्रसन्नाच्या गोलंदाजीला फटके मारत सुटला होता. बॉयसने काही फटके सीमापार लावल्यानंतर प्रसन्नाने स्क्वेअरलेगवरचा क्षेत्ररक्षक हलवला आणि त्याजागी ब्रिजेश पटेलला उभे केले. प्रसन्ना आणि पटेल एकाच राज्याकडून खेळत असल्याने प्रसन्नाला पटेल किती भरवशाचा आहे हे बेदीपेक्षा जास्त चांगले माहीत होते. प्रसन्नाच्या एका चेंडूने बॉयसला चकवले आणि तो झेल पटेलने लेगला अलगद पकडला. पण तेव्हाच्या भारतीय संघात क्षेत्ररक्षणाची कौशल्ये असंतुलित होती. झेल घेण्यासाठी झेप घेणे, सीमारेषेवर किंवा कुठेही चेंडू हातात आल्यानंतर तो थेट आणि तितक्याच तत्परतेने यष्टिरक्षकाच्या हातात फेकणे ही कौशल्ये भारतीय खेळाडूंकडे नव्हती आणि तशी ती विकसितही करण्यात आली नव्हती.
या ढिसाळ क्षेत्ररक्षणाला अपवाद होता, १९३० सालचा संघ. मलेशियात जन्मलेला लालसिंंग हा शीख खेळाडू या संघात होता व त्याचे कव्हरचे क्षेत्ररक्षण अप्रतिम होते. १९५० सालच्या संघात पॉली उम्रीगर होते. ते स्लीप किंवा शॉर्टलेगला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करीत. त्यांना संघात नवखे असलेले मन्सूर अली खान पतौडी चपळतेने धावायचे आणि तितक्याच वेगाने, अचूकपणे चेंडू यष्ट्यांकडे फेकायचे.
१९७० सालच्या भारतीय संघात काही उत्कृष्ट आणि चपळ झेल टिपणारे क्षेत्ररक्षक होते, त्यातले एक होते एकनाथ सोलकर. शॉर्ट-लेगला हेल्मेट किंवा शिनगार्डशिवाय (पायाला बांधायचे पॅड) क्षेत्ररक्षण करणारे कदाचित या खेळाच्या इतिहासातील ते एक महान खेळाडू असावेत. ८०च्या दशकात कपिल देवसुद्धा एक चांगले क्षेत्ररक्षक आणि स्लीपवर उभे राहणारे चपळ खेळाडू म्हणून नावाजले होते. अझरुद्दीनने तर ९०च्या दशकात कप्तान सांगेल त्या जागेवर अभेद्य आणि चपळ क्षेत्ररक्षण केले आहे. पतौडी आणि अझरूद्दीन सोडले तर भारतीय संघ क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत नेहमीच मागे राहिला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी उत्कृष्ट जाणणारेन क्षेत्ररक्षण आणि झेल घेणेही तेवढेच चांगले जाणले पाहिजे, या गोष्टीला कधीच महत्त्व देण्यात आले नाही. जे काही थोडे फार चांगले क्षेत्ररक्षक संघाला लाभले, ते निसर्गत:च चपळ होते.
संघातले स्थानदेखील चांगल्या क्षेत्ररक्षणावर अवलंबून नव्हते. धावा आणि बळी यावरच सारे अवलंबून होते. त्यामुळेच चांगला क्षेत्ररक्षक असूनही ब्रिजेश पटेलला संघातले आपले स्थान कायम करता आले नाही, कारण फलंदाजीत त्याला जास्त योगदान देता आले नाही.
चपळ हालचाली, वेगवान धाव, सीमापार जाणारा चेंडू अडवण्यासाठी झेप घेण्याची क्षमता, स्लीपला उभे राहून अगदी खालचा झेल घेण्याचे कौशल्य, घसरत जाण्याची तयारी, कुठल्याही अंतरावरून चेंडू फेकून धावचीत करणे या सर्व कौशल्यांना आॅस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाने नेहमीच प्राधान्य दिले आहे, आणि शेवटी भारतानेही याचे महत्त्व ओळखले आहे. त्याचा प्रत्यय
आला २०१३ सालच्या जोहान्सबर्ग येथील कसोटी सामन्यात.
दक्षिण आफ्रिका संघ ४५८ धावांचा पाठलाग करत असताना स्मिथ आणि ड्यू प्लेसीस या उत्कृष्ट फलंदाजांना तितक्याच उत्कृष्टपणे धावचीत केले, अजिंक्य रहाणेने. त्यावेळी मी ट्विटरवर एक उत्स्फूर्त प्रतिक्रि या दिली होती, मुंबईच्या फलंदाजाने त्याच्या क्षेत्ररक्षणाने भारताला वाचवले. राहणे हा मर्चंट, मांजरेकर, गावस्कर आणि तेंडुलकर यांच्यासारखा नुसताच चांगला फलंदाज नाही तर क्षेत्ररक्षणातही उजवा ठरला.
जेव्हा जेव्हा भारतीय संघ विजयी झाला, त्या विजयात क्षेत्ररक्षणाचे योगदान अल्पसेच राहिले आहे. २०११ साली विश्वचषक जिंकतानाही चर्चेचे मुख्य दुवे, तेंडुलकर- सेहवाग आणि जहीर-मुनाफ पटेल हेच होते, क्षेत्ररक्षणाची बाब कुणाच्या मनातही आली नाही.
२०१५ सालचा विश्वकप कोण घेऊन जाईल हे आताच सांगणे घाईचे होणार असले तरी भारतीय संघाचे आत्तापर्यंतचे क्षेत्ररक्षण उत्तम राहिले, हे सांगणे घाईचे होणार नाही. कोहली-रैना-जडेजा-राहणे या चौकडीच्या बरोबरच इतर खेळाडूही वेगवान हालचाली करीत आहेत, फिरकी गोलंदाज म्हणून अश्विन-जडेजा ही जोडगोळी प्रसन्ना-बेदीपेक्षा वेगळी व भाग्यवान आहे. त्यांना कुण्या एका क्षेत्ररक्षकाला लक्षवेधी हाक द्यावी लागत नाही. ते आता सर्व सहकाऱ्यांवर झेल टिपण्यासाठी विश्वास ठेवू शकतात.

 

Web Title: India's excellent fielding till now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.