कोरोना विषाणूचा धोका भारताला सर्वात मोठा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 12:37 PM2020-03-21T12:37:52+5:302020-03-21T12:38:13+5:30

भारत देश ज्वालामुखीच्या तोंडावर बसला आहे, या त्यांच्या इशाऱ्यामुळे तर आपणा सर्वांना या रोगाबाबत अत्यंत काटेकोर राहण्याची वेळ आली आहे. त्यांचे म्हणणे आहे, भारतात या रोगाचा सर्वात मोठा उद्रेक होऊ शकतो.

India's biggest risk of corona virus! | कोरोना विषाणूचा धोका भारताला सर्वात मोठा!

कोरोना विषाणूचा धोका भारताला सर्वात मोठा!

Next

- राजू नायक

कोरोना विषाणू हा अत्यंत घातक रोग असून तो झपाट्याने पसरेल. त्यामुळे त्याच्या फैलावाबाबत निष्काळजी राहून चालणार नाही. त्याची लागण लोकसंख्येवर होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागतो, त्यामुळे निवडणुका व इतर प्रकारचे मेळावे, लोकांचा सहभाग असलेले कार्यक्रम पुढचे तीन महिने संपूर्णत: टाळले पाहिजेत, असा इशारा आता जगातील एकूण एक तज्ज्ञ देऊ लागले आहेत. जगविख्यात आरोग्यतज्ज्ञ अमेरिकास्थित रामानन लक्ष्मीनारायण यांची एक मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली असून भारत देश ज्वालामुखीच्या तोंडावर बसला आहे, या त्यांच्या इशाऱ्यामुळे तर आपणा सर्वांना या रोगाबाबत अत्यंत काटेकोर राहण्याची वेळ आली आहे. त्यांचे म्हणणे आहे, भारतात या रोगाचा सर्वात मोठा उद्रेक होऊ शकतो.

अमेरिकेचा हवाला देऊन डॉक्टरांनी म्हटले आहे की तेथील २० ते ६० टक्के लोकांना या रोगाची लागण झालेली असू शकते. तोच निकष लावला तर भारतातील ६० टक्के लोकांना या रोगाने ग्रासले असू शकते. त्यांची ही आकडेवारी पाहिली तर आमचा थरकाप उडू शकतो. परंतु ही गोष्ट अगदीच नाकारली जाऊही शकत नाही. अजून तरी भारत सरकार किंवा आमच्या राज्य सरकारांनी इतक्या गांभीर्याने या रोगाकडे किंवा परिस्थितीकडे पाहिलेले नाही. डॉ. लक्ष्मीनारायण म्हणतात की ७०० ते ८०० दशलक्ष लोकांना या रोगाची लागण झाली असू शकते. परंतु त्यातील बहुसंख्य लोकांना रोगाची सूक्ष्म लागण झालेली असू शकते, त्याहूनही कमी लोकसंख्या गंभीर आजारी असू शकते व आणखी कमी लोकसंख्या प्राण गमावू शकते.


डॉ. लक्ष्मीनारायण यांनी भारतात केवळ १३० लोकांना या रोगाची लागण झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. ते म्हणाले, युरोपातील ब्रिटनसारखे देश- त्यांनी तेथील आकडेवारी ही संपूर्ण सत्य नसल्याचे मान्य केले आहे. भारतीय वैद्यकीय संस्थेचेही म्हणणे आहे की भारतही या रोगाच्या दुस-या टप्प्यावरच उभा आहे आणि सा-या समाजात त्याचा फैलाव होण्याच्या पातळीवर गेलेला नाही. डॉ. लक्ष्मीनारायण यांचा दावा आहे की भारत कदाचित तिस-या टप्प्यावर दोन ते तीन आठवड्यांपूर्वीच पोहोचलेला असू शकतो. भारतातील परिस्थितीचे वैद्यकीय नीतीचा वापर करून अवलोकन करूनच ते या निष्कर्षावर येऊन पोचले आहेत. ज्या प्रमाणात केंद्र सरकारने शाळा, कॉलेज व थिएटर्स, सिनेमा बंद केले आहेत, त्यावरून हा अंदाज केला जाऊ शकतो.

भारताने घेतलेल्या उपायांबाबत डॉ. लक्ष्मीनारायण यांनी समाधान व्यक्त केले असले तरी आपल्या देशाने या रोगाशी मुकाबला करण्यासाठी बरीच वैद्यकीय सामग्री आयात करायला हवी, असे ते म्हणाले. म्हणजे भारताची तयारी अजून अपुरीच आहे! आपण जरी या विषाणूबद्दल सरकारी पातळीवर उपाय योजत असलो तरी अजून आपली लोकसंख्या त्याबाबत किती गंभीर आहे? अजून उत्सव चालू आहेत. लोक आपापसांत मिसळत आहेत. बाजारात गर्दी आहे. साहित्य खरेदी करून त्याचा साठा करण्यासाठी अलोट गर्दी उसळत आहे. गोव्यात जि.पं. निवडणुका होणार होत्या, त्यासाठी भाजपच्या जोरदार सभा चालू होत्या. किंबहुना शुक्रवारी निवडणूक रद्द झाली, त्या दिवशीही ग्रामीण भागात लोकांची गर्दी जमवून भाषणे चालू होती! लोकांना मिसळू न देणे हे खरे म्हणजे सरकारांचे काम होते. त्यात सरकारच कमी पडले!


लक्षात घेतले पाहिजे, हा विषाणू गंभीर आहे. भारत जर या रोगाच्या चौथ्या टप्प्यात गेला व साºया समाजाला या विषाणूने विळख्यात घेतले तर संपूर्ण देश संकटात सापडेल व त्याविरुद्ध लढण्याची आपणाकडे साधनसामग्रीही असेल नसेल! तेव्हा आता लोकपातळीवर मोहीम सुरू व्हायला हवी. विलगतेची ही मोहीम प्रत्येक घरामधून, वाड्यावाड्यांतून, विभाग पातळीवरून चालली पाहिजे. केवळ रविवारी नव्हे, लोकांनी आपणहून या संकटाला चार हात दूर ठेवण्याची काळजी स्वत:हून घेतली पाहिजे! डॉ. लक्ष्मीनारायण यांनी भारताबद्दल केलेले भाकीत खोटे ठरविणे हेसुद्धा आपल्याच हाती आहे!

Web Title: India's biggest risk of corona virus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.