शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

भारतीय सैनिकांच्या हौतात्म्याचा इस्रायलमध्ये होतो सन्मान

By विजय दर्डा | Updated: January 22, 2018 00:34 IST

गेल्या आठवड्यात या सदरात मी इस्रायलमधील लोक भारतावर कसे निरतिशय प्रेम करतात, ते लिहिले होते. इस्रायलमध्ये मी जेथे जेथे गेलो, ज्यांना भेटलो, सर्वांकडून फार प्रेमाची वागणूक मिळाली.

गेल्या आठवड्यात या सदरात मी इस्रायलमधील लोक भारतावर कसे निरतिशय प्रेम करतात, ते लिहिले होते. इस्रायलमध्ये मी जेथे जेथे गेलो, ज्यांना भेटलो, सर्वांकडून फार प्रेमाची वागणूक मिळाली. तरीही तेथील लोकांनी मला एक प्रश्न जरूर विचारला : मित्र असूनही भारताने जेरुसलेमच्या मुद्यावर संयुक्त राष्ट्रसंघात इस्रायलच्या विरोधात मतदान का केले? हा प्रश्न मला इतक्या जणांनी विचारला की, यामुळे दोन्ही देशांच्या मित्रत्वाच्या संबंधात दुरावा तर येणार नाही ना, अशी मला भीती वाटू लागली. परंतु इस्रायल हा भारताचा सच्चा मित्र आहे व यहुदी मोठ्या मनाचे आहेत, हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सिद्ध केले. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावास भारताने केलेल्या विरोधाकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता, असे एका पत्रकाराने नेतन्याहू यांना विचारले होते. त्यांनी मोठ्या दिलदारपणाने उत्तर दिले, एका मताने काही बिघडत नाही. दोन्ही देशांची मैत्री यापुढेही कायम राहील!ज्या जेरुसलेमचा वाद काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघात पोहोचला ते शहर केवळ यहुदींच्याच नव्हे तर ख्रिश्चन आणि मुस्लिमांचेही धार्मिक आस्थेचे पवित्र शहर आहे. जुन्या तटबंदीच्या जेरुसलेम सभोवताली नवे शहर पसरले आहे. हे संपूर्ण शहर ‘हेरिटेज शहर’ आहे. अत्यंत सुंदर व उमद्या लोकांच्या या शहरात आल्यावर मला समजले की, इस्रायली लोक हाइफाच्या लढाईस इस्रायल राष्ट्राच्या स्थापनेचे प्रथम प्रतीक मानतात. त्या युद्धात भारतीय सैनिकांनी बजावलेल्या शौर्याची वीरगाथा इस्रायलच्या शालेय पाठ्यपुस्तकांतून विद्यार्थ्यांना शिकविली जाते.ही वीरभूमी पाहण्याची अनावर ओढ लागली व मी हाइफाला जाऊन पोहोचलो. हाइफा हे ठिकाण जेरुसलेमपासून १६० व तेल अविवपासून ९२ कि.मी. अंतरावर आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी हाइफा तुर्कस्तानच्या आॅटोमन साम्राज्याच्या ताब्यात होते व जर्मनीचे सैन्य त्यांना साथ देत होते. हे शहर तुर्कस्तानकडून जिंकून घेण्यासाठी ब्रिटनने त्यावेळी इराणमार्गे जे सैन्य पाठविले त्यात भारतातील जोधपूर व म्हैसूर रेजिमेंटचा समावेश होता. त्यांच्याकडे फक्त तलवारी व भाले हीच शस्त्रे होती. या अंगलढाईच्या शस्त्रांनी लढत हे सैनिक किती कठीण परिस्थितीशी झुंजत घोड्यांवरून तेथपर्यंत पोहचले असतील, याची आपण कल्पना करू शकतो. येथे आल्यावर त्यांची गाठ पडली बंदुका तोफांनी सज्ज असलेल्या तुर्की-जर्मन सैन्याशी. त्या रेजिमेंटचे नेतृत्व करीत होते दलपतसिंह. इंग्रजी सैन्याधिकाºयांनी दलपतसिंह यांना माघारी फिरण्याचा आदेश दिला. परंतु शत्रूला पाठ दाखविणे आम्ही लाजिरवाणे मानतो, असे सांगून भारतीय सैनिकांनी माघारीस नकार दिला. त्यानंतर जोधपूर व म्हैसूर रेजिमेंटच्या सैनिकांनी अतुलनीय शौर्य गाजवून हाइफा स्वतंत्र केले. ती तारीख होती २३ सप्टेंबर १९१८. त्या लढाईत ४७ भारतीय जवानांनी प्राणाहुती दिली होती. तेथील हुतात्मा स्मारकावर त्या सर्वांची नावे लिहिलेली आहेत. तेथे काही संस्कृत श्लोक व गुरुबाणीचे अमर संदेशही कोरलेले आहेत. ‘ओम भगवते नम:’ हे तेथे लिहिलेले वाचून मन अभिमानाने उचंबळून आले! त्या स्मारकावर मी वीरसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. एरवीही मी जेथे कुठे जातो तेथे शहिदांना न चुकता नमन करतो. इस्रायली असे मानतात की, हाइफाच्या विजयामुळेच त्या भागात ब्रिटनची सत्ता आली व त्यातूनच पुढे १९४८ मध्ये स्वतंत्र इस्रायल राष्ट्र स्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला. म्हणून दरवर्षी २३ सप्टेंबर हा दिवस इस्रायली सेना ‘हाइफा दिवस’ म्हणून साजरा करते. दिल्लीतील तीन मूर्ती चौकात हाइफाच्या वीर सैनिकांच्या स्मृत्यर्थ तीन पुतळे आहेत व तेथे भारतही हाइफा विजयाचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. नेतन्याहू यांच्या ताज्या भारत भेटीत दिल्लीतील या तीन मूर्ती चौकाचे ‘तीन मूर्ती हाइफा चौक’ असे यथोचित पुनर्नामकरण करण्याचे भारताने उचललेले पाऊल नक्कीच स्वागतार्ह आहे.इस्रायल भेटीचे सर्वच अनुभव या सदरात सामावणे अशक्य आहे. मी तेल अवीवला गेलो. गाझा पट्ट्यात गेलो. तेथे तर पाहावे तेथे सैन्यच दिसते. मी मृत समुद्र पाहिला जो सरासरी समुद्र सपाटीहून ४३०.५ मीटर खालच्या पातळीवर आहे. याचे पाणी एरवीच्या समुद्राच्या पाण्याहून दसपट खारट आहे. या समुद्राच्या पाण्यात कुणीही जलचर जिवंत राहत नाही. पण या पाण्यात ३४ टक्के खनिजे आहेत. त्यांचा वापर करून येथे जगप्रसिद्ध सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन केले जाते. या सर्वाची चर्चा नंतर कधी तरी करू!तूर्तास आपण भारतवासी इस्रायलकडून बरेच काही शिकू शकतो, अशाच गोष्टींचा उल्लेख करतो. येथे सर्व जमीन सरकारच्या मालकीची आहे व ती लोकांना ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिली जाते. त्यावर ‘किबुत’ म्हणजे सामुदायिक शेती केली जाते. या ‘किबुत’मध्ये शाळेपासून कारखान्यापर्यंत सर्वकाही असते. येथे पाण्याची टंचाई आहे, पण ठिबक सिंचनाने त्यांनी गेल्या २५ वर्षांत शेतीचे उत्पादन सातपटीने वाढविले आहे. येथे मला जळगावच्या जैन इरिगेशनचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. जैन इरिगेशनने इस्रायलची नान डान इरिगेशन कंपनी खरेदी केली आहे. आता ही नान डान जैन इरिगेशन जगातील १०० हून अधिक देशांमध्ये व्यवसाय करते. इस्रायलमधील जैन इरिगेशनचे काम मोदीजी, गडकरीजी व देवेंद्र फडणवीस यांनीही येऊन पाहिले आहे. या सर्वांनी त्यांच्या कामाची तोंडभरून स्तुती केली. जैन इरिगेशनचे संस्थापक भंवरलाल जैन यांच्या दूरदृष्टीची व त्यांच्या अनिल जैन आणि इतर मुलांच्या मेहनतीची मी तारीफ करतो.इस्रायलमध्ये मी खरबुजाच्या आकाराचे वांगे पाहिले. अनेक रंगांचे टोमॅटो पाहिले. खूपच स्वादिष्ट होते. त्यांनी शेतीमध्ये एवढी प्रगती केली आहे की, शेतात पिकणाºया टोमॅटोचा, वांग्याचा, कोबीचा, काकडीचा किंवा बटाट्याचा रंग, आकार किंवा स्वाद कसा असावा हे ते आधीच ठरवतात! शेताची कापणी केल्यावर शिल्लक राहणारे खुंट जमिनीत पुरून ते त्याचे खत तयार करतात. तेथे ते या खुंटांनी जमीन सुपीक करतात व आपण ते जाळून दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान व उत्तरेकडील अन्य राज्यांत थंडीमध्ये दाट धुके व प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण करतो!इस्रायलच्या अत्याधुनिक व सदैव सतर्क सुरक्षा व्यवस्थेने मी खूपच प्रभावित झालो. परतीच्या प्रवासात मी ‘मजुल’ जातीचे थोडे खजूर घेतले होते. तसा खजूर मी कधी पाहिला नव्हता म्हणून तो घेण्याची इच्छा झाली. विमानतळावरील सुरक्षा कर्मचाºयांनी खजुराचे ते पुडके आधी मोठ्या स्कॅनरमध्ये व नंतर हॅण्ड स्कॅनरने तपासले. एवढेच नाही. खजुराची प्रत्येक बी त्यांनी बाकराईने तपासली. यात माझा सव्वा तास गेला व विमान चुकते की काय याची चिंता वाटू लागली. परत येताना विचार करू लागलो की, आपण इस्रायलसारखे का होऊ शकत नाही?हे लिखाण संपविण्यापूर्वी...तेथे अनेक लोकांनी माझे मित्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची केलेली तारीफ हा माझ्या इस्रायल दौºयातील आणखी एक सुखद अनुभव होता. लोक मला सांगत होते की, भारताचे अनेक नेते येथे येतात, आम्ही त्यांचे आदरातिथ्य करतो. ते आम्हाला भारतात येण्याचे निमंत्रण देतात. पण आम्ही भारतात जातो तेव्हा त्यांच्याकडे भेटायला वेळ नसतो. नितीनजी याला अपवाद आहेत. ते हमखास भेटतात व आदरही करतात.

टॅग्स :Israelइस्रायलIndian Armyभारतीय जवान