कोरोनालाही नमवत भारतीय पोरांनी जग जिंकले !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 09:34 AM2022-02-08T09:34:15+5:302022-02-08T09:35:05+5:30

१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय युवा खेळाडूंना कोणीही ‘आव्हान’ दिले नाही, कोरोनाने त्यांची ‘परीक्षा’ पाहिली; पण ते पुरून उरले.

Indian kids win the world by bowing to Corona too! | कोरोनालाही नमवत भारतीय पोरांनी जग जिंकले !

कोरोनालाही नमवत भारतीय पोरांनी जग जिंकले !

Next

रोहित नाईक, वरिष्ठ उपसंपादक, लोकमत, मुंबई -

भारतीय युवा क्रिकेटपटूंनी शनिवारी विक्रमी पाचवे विश्वविजेतेपद पटकावले. आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक पाचवेळा जेतेपद उंचावणारा भारतीय संघ पहिला संघ ठरला. स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताने समोर येणाऱ्या प्रत्येक संघाला सहजपणे लोळवले. वरवर पाहता भारताचा विजय सहजसोपा दिसतो, पण अनेक संकटांना मागे टाकून भारतीय युवांनी आपली जिद्द आणि अखेरपर्यंत हार न मानण्याची वृत्ती दाखवून दिली. 

जगभरात अजूनही कोरोनाचे संकट आहे. अशा परिस्थितीत जगाच्या दुसऱ्या टोकाकडे असलेल्या वेस्ट इंडिजमध्ये जाऊन क्रिकेट खेळणे प्रत्येकासाठी आव्हानात्मक होते. कोरोना महामारी सुरु झाल्यापासून या युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली नाही. अपवाद केवळ आशिया चषक स्पर्धेचा. यादरम्यान जो काही सराव केला, त्या जोरावर भारतीय युवांनी यूएईमध्ये जानेवारी महिन्यात आशिया चषक उंचावला आणि येथूनच थेट वेस्ट इंडिजकडे कूच केले. विश्वचषक स्पर्धेत सलामीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहज बाजी मारल्यानंतर बलाढ्य भारताला अंतिम फेरीपासून रोखणे कठीण असल्याचे सर्वांना कळून चुकले. मात्र भारतीयांना अडचणीत आणले ते कोरोनाने. 

एक दोन नव्हे, तर कर्णधार यश धूल आणि उपकर्णधार राशीद शेख यांच्यासह तब्बल सहा प्रमुख खेळाडू कोरोनामुळे विलगीकरणात गेल्याने भारतीय संघ प्रचंड दबावात आला. संघ व्यवस्थापनाची मोठी कसोटी लागली. पण, म्हणतात ना, भारतात क्रिकेट खेळ नाही, तर धर्म आहे. हे या स्पर्धेतून पुन्हा दिसून आले. कोरोनाग्रस्त भारतीय संघाच्या जागी दुसरा कोणता संघ असता, तर त्यांनी माघार घेतली असती किंवा धडपडत वाटचाल केली असती. पण, प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत उपलब्ध राखीव खेळाडूंच्या जोरावर भारताने केवळ विजय नव्हे, तर दणदणीत विजय मिळवत दिमाखात बाद फेरी गाठली. यातून भारतातील गुणवत्ता तर दिसलीच, पण भारतीय क्रिकेटची क्षमता आणि त्याचा स्तरही जागतिक क्रिकेटने पाहिला. 

या युवा भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी सांभाळली ती माजी क्रिकेटपटू ऋषिकेश कानिटकरने. होय, हा तोच कानिटकर, ज्याने इंडिपेंडन्स कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध २ चेंडूंत ३ धावांची गरज असताना विजयी चौकार ठोकला होता. या एका चौकाराच्या जोरावर कानिटकर भारत देशाचा हिरो बनला होता. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत कशाप्रकारे डोकं शांत ठेवून खेळायचे हे खुद्द कानिटकरकडून युवा क्रिकेटपटूंना शिकता आले. शिवाय विश्वचषक स्पर्धेत संघाचा मार्गदर्शक होता माजी खेळाडू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण. लक्ष्मणने दडपणाच्या स्थितीत भारतीय संघाला कशा प्रकारे सावरले, हे सांगायला केवळ २००१ सालचा कोलकाता येथील भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामना पुरेसा आहे. कानिटकर-लक्ष्मण या जोडीचीही या विश्वविजेतेपदामध्ये मोठी भूमिका ठरली. दोघांच्या अनुभवाचे बोल भारताच्या युवा क्रिकेटपटूंसाठी ‘बूस्टर’ ठरले. त्यामुळेच प्रमुख खेळाडू कोरोनामुळे संघाबाहेर गेले असतानाही भारतीय संघाच्या कामगिरीवर जो काही परिणाम झाला, तो केवळ सकारात्मक होता. 

या विश्वविजयी युवा संघातून भारतीय क्रिकेटला भविष्यात अनेक स्टार मिळणार आहेत. यश धूल, राशीद शेख, अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंग, राज बावा, रवी कुमार, कौशल तांबे, विकी ओस्तवाल, निशांत सिंधू अशी अनेक नावे आता गाजतील. कोरोनावर मात करुन संघात परतलेल्या धूलने त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध निर्णायक शतक ठोकले. १९ वर्षांखालील विश्वचषकात शतक ठोकणारा तो भारताचा केवळ तिसरा कर्णधार ठरला. तसेच, राज बावा हा भारताला गवसलेला एक हिराच म्हणावा लागेल. भारताला सध्या भक्कम अष्टपैलूची आवश्यकता आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत बावाने कामगिरीत सातत्य राखले, तर त्याच्यासाठी भारताचा मुख्य राष्ट्रीय संघ दूर नाही. बावाने स्पर्धेत ६ सामन्यांतून २५२ धावा फटकावताना एक नाबाद दीडशतकी खेळी केली. शिवाय ९ बळीही घेतले. अंतिम सामन्यात तर त्याने इंग्लंडचा अर्धा संघ बाद करत भारताच्या विश्वविजेतेपदाचा पाया रचला होता. या कामगिरीच्या जोरावर हे युवा खेळाडू आगामी आयपीएल लिलावात भाव खाऊन जाणार हे नक्की..

Web Title: Indian kids win the world by bowing to Corona too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.