प्रसिद्धीचे वाढते व्यसन

By Admin | Updated: January 31, 2016 01:00 IST2016-01-31T01:00:45+5:302016-01-31T01:00:45+5:30

हे जे लक्ष वेधून घ्यायचे ‘व्यसन’ सगळ्यांना लागले आहे, ते दिवसेंदिवस वाढतच जातेय. रस्त्यात एखादा अपघात झाला, तर तो कारमधून जाताना बघण्यासाठी जी उत्सुकता असते,

Increasing addiction of publicity | प्रसिद्धीचे वाढते व्यसन

प्रसिद्धीचे वाढते व्यसन

(महिन्याचे मानकरी)

- पराग कुलकर्णी 

हे जे लक्ष वेधून घ्यायचे ‘व्यसन’ सगळ्यांना लागले आहे, ते दिवसेंदिवस वाढतच जातेय. रस्त्यात एखादा अपघात झाला, तर तो कारमधून जाताना बघण्यासाठी जी उत्सुकता असते, त्याला तोड नाही आणि कधी-कधी त्या दोन अपघाती पार्ट्या चित्रपटाचा सीन सुरू असावा, तसे समोर बघून बोलत असतात. कारण तिकडून जाणाऱ्यांपैकी एखादी व्यक्ती आपल्या मोबाइलमध्ये तो अपघात शूट करत असते.

सहिष्णुता आणि असहिष्णुता या दोन जुळ्या भावांनी मागच्या वर्षापासून जी ‘उष्णता’ निर्माण केली आहे, ती बघता एक तर सरकारला थंडी भरली आहे किंवा सरकारने ‘थंडी’ पाडली आहे. मी मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेलो, सामान्य मुलगा आता पुरुष झालोय, या समजुतीत जगतोय. वरील दोन्ही शब्दांचे अर्थ जुळवण्यात गुंतलोय. खरंच... गुंतलोय हाच शब्द बरोबर आहे. आपण सगळेच गुंतलेलो आहोत म्हणा. हा गुंता फार पूर्वीपासून आहे. मात्र, आजकाल त्याची गुंतागुंत अधिक वाढलीये. कारण प्रत्येकाला काहीतरी सिद्ध करून दाखवायचं ‘व्यसन’ जडले आहे. मी कॅमऱ्यासमोर आलो की, असे काहीतरी बोलणार की, लोकांच्या लक्षात राहायला हवे. व्यसनच म्हटले पाहिजे याला. लोकमान्य टिळक अकोल्याच्या सभेत तेजस्वी पुरुषासमान बोलले. त्या वेळी इंग्रज सरकारचे लक्ष त्यांनी आपल्याकडे वेधून घेतलं. परिणामी, त्यांची रवानगी मंडालेच्या तुरुंगात झाली. आजकाल आपण का बोलतो आणि कोण ऐकतो, याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. म्हणूनच म्हणतोय ‘व्यसन’ जडलं आहे आपल्याला.
इतरांचं सोडा, परवा माझ्या तीन वर्षांच्या मुलाने वडापाव पाहिजे म्हणून स्वत:ला मोबाइलमध्ये शूट केलं आणि तो व्हिडीओ मला दाखवून ती मागणी माझ्यापर्यंत पोहोचवली. काय बोलणार याला, व्यसनच ना!
माझ्या कॉलेजवयात मला अशीच व्यसनं जडली होती. म्हणजे खऱ्या अर्थाने व्यसन. सिगरेटपासून मावा, पान- तंबाखू ते दारूपर्यंत सगळी व्यसन करत होतो मी आणि तीसुद्धा प्रमाणाच्या बाहेर. ‘नो लिमिट’! नंतर वाटले, अजून एक पायरी वर चढावं. असं म्हणत दहा पायऱ्या चढत इतका वर गेलो की, ढगाला हात लागले. परतीचे दोर कधी गळून पडले, मलाही समजलं नव्हतं. कुणाचा दोष होता, सहिष्णुतेचा की असहिष्णुतेचा किंवा माझ्या सहनशक्तीचा असेल, जिने माझी साथ सोडली होती. आई-वडील कुठेही कमी पडले नव्हते. आईशी भांडलो, अद्वा-तद्वा बोललो, घर सोडलं. का, कुणाचं तरी लक्ष माझ्याकडे जावं म्हणून की, त्या व्यसनांचा परिणाम होता, म्हणून घराबाहेर पडून त्या विश्वाचा अनुभव घेतला. जिकडे आत जायची वाट असते, पण एकदा आत गेलं की, परत यायचा रस्ता काही केल्या सापडत नाही.
आपण त्याच रस्त्यावर चालतोय का? नाही म्हणजे हातात सिगरेट्स नसतील. मी तर म्हणतो की, अनेक लोक निर्व्यसनीही असतील, पण हे जे लक्ष वेधून घ्यायचं ‘व्यसन’ सगळ्यांना लागलं आह,े ते दिवसेंदिवस वाढतच जातेय. आता हेच कमी की काय, देवळाच्या चौथऱ्यावर स्त्री पायरी चढली, म्हणून त्या स्थानाकडेही लोकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. तेव्हापासून मी आमच्या हिला सांगितलं आहे, पायऱ्या चढत वर जायचं नाही, लिफ्ट आहे ना... त्याचा वापर करायचा! काही नेम नाही हो. उद्या आमची ही इमारतीच्या पायऱ्या चढत घरी गेली, म्हणून त्याचीसुद्धा बातमी करतील.
आपण कुठे जातोय? हा प्रश्न मी विचारणार नाही. कारण त्याचं उत्तर मला माहीत नाही. या प्रश्नाचं उत्तर गेली अनेक वर्षे कोणीच देऊ शकलं नाहीये, पण मी जेव्हा व्यसनांच्या गर्तेत अडकलो होतो, तेव्हा मला जाणीव झाली होती की, मी शेवटाकडे जातोय. कुणी मागे खेचलं असेल मला? १२ वर्षे रोज न चुकता करीत असलेली व्यसने मी तीन दिवसांत सोडली. केवळ तीन दिवसांत! कुठल्याही डॉक्टरकडे गेलो नाही. कोणताही कोर्स नाही. मला येथे आत्मस्तुती करवून घ्यायची नाहीये, पण मी परत येऊ शकलो, याचे कारण ‘मना’पासून मला परत यायचं होतं. ‘मना’ या शब्दाचं हिंदीत रूपांतर करा. ‘मना’ म्हणजे ‘नकार’. बस तो द्यायला जमला पाहिजे. मी ते जमवलं. माझ्यासोबत जे होते, ते त्याच मार्गावर पुढे निघून गेले.
हे सगळं सांगण्याचे कारण एकच ‘व्यसन’. ते कुठलंही असो शेवटाकडेच नेतं. आजकाल सिंगापूर, पटाया, लास वेगास या ठिकाणी जाणं म्हणजे ‘स्टेटस सिम्बॉल’ झाला आहे, पण शिर्डी, अक्कलकोट, नरसोबाची वाडी, शेगाव येथे जाणे, म्हणजे कमीपणाचं लक्षण मानलं जाऊ लागलं आहे. लोक जात नाहीत, असं नाही, पण लास वेगासला जाऊन जुगार खेळतात हे माहीत आहे. मात्र, या तीर्थक्षेत्रांवर का जायचं, हे कुणीच कुणाला सांगत नाही.
माझा प्रश्न सोपा आहे की, स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याच्या केविलवाण्या प्रकाराला आपण काय म्हणायचं? मला कुणी बोलू देत नाही म्हटलं की झालं? हे वाक्यसुद्धा तुम्हाला प्रसिद्धीच्या झोतात आणतं. विचारवंतांची हत्या करणारी मंडळीसुद्धा याच ‘व्यसनांचे’ बळी ठरले आहेत, हे सर्व थांबायला हवं. प्रत्येक गोष्टीला ‘जातीय वाद’ हा शब्द दिला की, जो वणवा पेटायला लागतो, तो थांबण्याचं नाव घेत नाही. मान्य आहे की, आध्यात्मापासून ते व्यवहारापर्यंत सगळ्या व्याख्या बदलण्याची गरज आहे. पुन्हा माझंच उदाहरण घ्या. मी डावखुरा आहे. जन्मापासून डावा हातच वापरतो. कोणतेही धार्मिक कार्य असले की, पुजाऱ्यांकडून सतत एकच जप सुरू असायचा, ‘डावा हात नाही, उजवा हात’. मी एकदा शांतपणे विचारले की, डावा हात तुमच्या देवाला चालत नसेल, तर तो त्यांनी का दिला?
मी प्रसिद्ध झालो तर जग बदलणार नाही, मी बदललो तर जग बदलणार आहे. प्रसिद्ध होण्याबद्दल आक्षेप नाही, पण त्यासाठी सतत धडपडत राहणे हे व्यसन आहे. प्रसिद्धीसाठी न धडपडता सत्याच्या दिशेने मार्गक्रमण करत मिळवलेल्या खऱ्या प्रसिद्धीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचं असेल, तर त्या पंच्याचं आणि लाठीचं ठेवा, ज्याच्या दर्शनाला लंडनची जनता कडाक्याच्या थंडीत उभी होती आणि चर्चिलसारखा मुत्सद्दी नेता टेबलावर हात आपटत विचारत होत ‘हू इज धीस गांधी?’

(लेखक हे ‘डोंबिवली फास्ट’, ‘गैर’, ‘पोरबाजार’, ‘सांगतो ऐका’, ‘बाबांची शाळा’, ‘असामी असामी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’ अशा सुपरहिट सिनेमांचे आणि ‘लागी तुझसे लगन’, ‘इस देस ना आना लाडो’, ‘जुनून’ ‘लक्ष्य’, ‘देवयानी’, ‘पोलीस फाइल्स’, ‘युनिट 9’, ‘त्यांच्या मागावर’, ‘सात जन्माच्या गाठी’, ‘या सुखांनो या’, ‘रेशीम गाठी’ यांसारख्या हिंदी-मराठी मालिकांचे लेखक आहेत.)

Web Title: Increasing addiction of publicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.