एका विसंगत लग्नाचा अन्वयार्थ
By Admin | Updated: November 13, 2016 03:49 IST2016-11-13T03:49:54+5:302016-11-13T03:49:54+5:30
एरव्ही आपल्या पारंपरिक कालगणनेचा आणि आपला फारसा संबंध येत नाही. विशेषता ही कालगणना भिंतीवरील (ग्रेगेरियन) कॅलेंडरवरतीच जिरवल्यामुळे पंचांग नावाची गोष्ट

एका विसंगत लग्नाचा अन्वयार्थ
- रविप्रकाश कुलकर्णी
एरव्ही आपल्या पारंपरिक कालगणनेचा आणि आपला फारसा संबंध येत नाही. विशेषता ही कालगणना भिंतीवरील (ग्रेगेरियन) कॅलेंडरवरतीच जिरवल्यामुळे पंचांग नावाची गोष्ट आणि त्याचा संबंध फारच थोड्या जणांपुरता राहिलेला आहे. तरीसुद्धा चातुर्मास समाप्ती झाली, हे सांगणारे आवर्जून भेटतात हे विशेष. त्या वेळेसच तुळशीचे लग्न असते, हे त्याचे महत्त्व काय हे निदान लग्नाळू आणि त्यासंबंधित मंडळींना नक्कीच माहीत असते. भले तुळशीच्या लग्नाची गोष्ट माहीत नसली तरी!
जिज्ञासूंसाठी एवढेच सांगतो की, दुर्गा भागवत यांचं ‘तुळशीच लग्न’ हे छोटेखानी पुस्तक आहे ते पाहावे. त्या निमित्ताने एके काळी रेडियोवर लागत असलेली ओवी आठवते -
ही गं माझी गं ओवी पहिली बाई मी तुळशीचं लावी रोपं. त्यागं तुळशीचं नाव घेता बाई पाप पळालं आपोआप... आता पाप म्हणजे काय, हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे असू शकेल....
भोवताल आणि आपले जगणे याची कशी फारकत होत चालली आहे आणि त्याचे होणारे परिणाम पडसाद असे काहीतरी तुळशीच्या लग्नानिमित्ताने लिहावे, असा विचार चालू झाला, पण सध्या आजूबाजूला दिवाळी अंक आहेत आणि तो वाचण्याचा मोह इतका आहे की, त्याची तुलना भ्रमरवृत्तीशीच होऊ शकते....
तेव्हा या दिवाळी अंकातच काय काय आहे आणि त्याबद्दल किती सांगू असं माझं होऊन झाले आहे, पण त्यामध्येदेखील वाचकांनी वाचायलाच हवा, अशा एका लेखाकडे लक्ष वेधतो. त्यात ऐक ठिकाणी म्हटले आहे -
‘हे सगळे वाचून फक्त अठरा वर्षांच्या आपल्या मुलाची काय प्रतिक्रिया होईल? आपल्या मागे राहिलेले आपला मुलगा, मुलगी आणि नवरा यांचे आपआपसात संबंध कसे राहतील? - या कशाचा थोडाही विचार तिच्या मनात येऊ नये? स्वत:च्या कुटुंबाबद्दल इतक्या अमानुष पद्धतीने विचार करणारी हीच स्त्री, अनेक चरित्र नायकांना माणूस म्हणून लोकांसमोर मांडत होती. या विसंगतीची मला मनस्वी चीड आली.
या लेखातला आणखी एक भाग पाहा -
‘आईचे लिखाण, जे प्रसिद्ध होणे, प्रसिद्धीच्या वलयात आईचे झळाळून उठणे मी जवळून पाहता होते, अनुभवत होते. आमच्या आयुष्यात निराळाच पर्व होते. ते तेव्हा ‘तुमच्या लेखनामागची प्रेरणा काय?’ हा प्रश्न पुन्हा-पुन्हा तिला विचारला जायचा, याला आईची निरनिराळी उत्तरं असायची. एका दुपारी आई आणि मी घरी असताना अतिशय तीव्रपणे मी आईला विचारले, ‘आई तू सगळे का केलेस, सांगू?- you never wanted to live as a clerk’s wife and you never wanted die as a clerk’s wife.... बरोबर का?’
हे वाक्य मला का सुचलं, अचानक तळातून काहीतरी बाहेर यावं तसं का माझ्या जिभेवर आलं, मला कळलं नाही, पण मी बोलून गेल्यावर दचकलो. आईचं उत्तर येण्यापर्यंची दोन सेकंद खूप होती. इतक्या वर्षांचा संघर्ष, अपमान, कटुता.... सगळं या क्षणाने सामावले होते. शेवटी मला अतिशय उत्कटपणे वाटले की, आईने ‘नाही म्हणावे’ नाही नाही!.... आई ‘नाही’ म्हण गं, ‘नाही’ म्हण!’ - पण आई ‘हो’ म्हणाली!’
हे असं सगळं आक्रंदन, घुसमट आणि फरफट आणि तटस्थपणे उत्कटतेने मांडला आहे. ‘हंस’ दिवाळी अंकातील (संपादिका-हेमलता अंतरकर) यांच्या ‘न जगलेल्या आयुष्याची गोष्ट’ या लेखात लेखिका आहे -सरिता आवाड
आता या सरिता आवाड म्हणजे कोण, हे विचारण्यापूर्वी सांगून टाकतो की, वीस एक वर्षे नक्कीच झाली असतील’ ‘गुलमोहोर’ (संपादक- अनिल किणीकर) दिवाळी अंकात याच सरिता आवाड यांचा ‘टॉलस्टॉयची आई’ असा लेख होता. विलक्षण घुसमट आणि तडफड त्या लेखातून जाणवत होती. ते वाचून वाटलं होतं की, हा अनुभव एका लेखात मावणारा नाही. त्याचा अवकाश मोठा आहे... हे लेखिकेने गंभीरपणे मांडले पाहिजे... पुढे सरिता आवाड यांची भेट झाली, तेव्हादेखील त्यांना मी हे आवर्जून सांगितले होते...
त्याच सरिता आवाड यांचा हा आता इतक्या वर्षांनी लिहिलेल्या- ‘न जगलेल्या आयुष्याची गोष्ट’ हा लेख.
एखादे लग्न आणि त्या विसंगतीमुळे सगळ्याचीच कशी फरफट आणि होरपळ होते, हे या लेखातून दिसते. आपल्या वडिलासंबंधात लिहिताना हे सगळे आले आहे. इतके प्रत्ययकारी आणि तरीही तटस्थपणे लिहिणे ही फार अवघड किमया सरिता आवाड यांना साधली आहे. त्यांनी आता एकूणच त्यांच्या आयुष्याची गोष्ट एखाद्या लेखापुरतीच मर्यादित ठेवू नये. एका पुस्तकाच्या समर्थ ऐवज हा आहे आणि वेळीच तो आला पाहिजे....
इथे आणखी एक सांगितलं पाहिजे की, या सरिता आवाड कोण हे जरी कळलं नाही, तरीसुद्धा एका संसाराची कहाणी म्हणूनदेखील हे लेखन दुर्मीळ ठरेल. अर्थात, आता त्यांच्याबद्दल सांगायला हवेच नाही का? या लेखाच्या सुरुवातीला त्यांची ओळख करून दिली आहे - ‘सरिता आवाड या, सुप्रसिद्ध लेखिका कै. सुमती देवस्थळे व कै. विठ्ठल विनायक देवस्थळे यांच्या कन्या आणि समाजशास्त्राच्या अभ्यासक. पुरुषप्रधान संस्कृतीत पती पत्नीपेक्षा कमी प्रभावी असला, तर त्याचा कुटुंबावर कसा विदारक परिणाम होऊ शकतो, याचे दुर्मीळ तटस्थेतेने त्यांनी केलेले हे चित्रण-लालित्यपूर्ण आणि अस्वस्थ करणारे, तितकेच सामाजिक - राजकीय वास्तवाचा भेदक वेध घेणारे.’ (इथे राजकीय शब्द मात्र, अनावधानाने आलेला असावा का?) तेव्हा अधिक काही जाणून घेण्यासाठी ‘हंस’ दिवाळी अंक पाहा. नव्हे, आता तुम्ही पाहणारच....