गुरुचे महत्व

By Admin | Updated: July 23, 2016 04:55 IST2016-07-23T04:55:23+5:302016-07-23T04:55:23+5:30

आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. या व्यास पौर्णिमेला व्यासगुरूंची मनोभावे पूजा केली जाते.

Importance of the Master | गुरुचे महत्व

गुरुचे महत्व


आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. या व्यास पौर्णिमेला व्यासगुरूंची मनोभावे पूजा केली जाते. अज्ञान, अंध:कार दूर करणाऱ्या, सर्वार्थाने गुरू म्हणजे मोठा असणाऱ्या ज्ञानसूर्याची मानव समाजाला निरंतर गरज होती, आहे, असणार आहे म्हणून गुरूंच्या कृतज्ञतापूर्वक स्मरणाचे महत्त्व आहे.
यद्यद् आचरति श्रेष्ठ: तद् देवेत्तरो नर:
या गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील एकविसाव्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे वयाने, ज्ञानाने आणि क्षमतेने श्रेष्ठ असणाऱ्यांचे अनुकरण करण्याकडे सर्वसाधारण लोकांचा कल असतो. त्यांच्याजवळ अनुभवातून आलेले आणि त्यांनी प्रयत्नपूर्वक मिळवलेले संचित ज्ञान पुढच्या पिढ्यांना दिशादर्शक ठरत असते.
पूर्वी पाठांतरातून, मुखोद्गत वाणी माध्यमातून हा वारसा दर पिढ्यांकडे हस्तांतरित होत असे. छापण्याचे कौशल्य हस्तगत झाल्यावर ग्रंथातून, नियतकालिकांमधून ज्ञानसंग्रह व ज्ञानप्रसार सहजपणे वेगाने होऊ लागला. पण ज्ञानाबरोबर श्रेयस्कर शहाणपणा येतो का, हा प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटलपासूनचा वादाचा विषय आजही अनुत्तरित आहे.
आज विज्ञान युगाची विलक्षण झेप पेलत नुकती चालायला, बोलायला लागलेली बाळे वाढत्या वयाबरोबर शाळांच्या वेळा, दप्तरांचे ओझे, ट्यूशन्स, छंद मंडळ यात भरडली जातात. करिअरमागे धावणारे त्यांचे आई-वडील त्यांना संपन्नता देतात पण सहवास, प्रेम ते केव्हा देणार? मुलांच्या अनुकरण वृत्तीचा, निरीक्षण शक्तीचा सहज फायदा करून घेत त्यांचे हे पहिले निसर्गदत्त गुरू मुलांना घडवू शकतात.
विचारशक्तीबाबत आपल्यापेक्षा निम्न स्तरावरच्या पशु-पक्ष्यांकडे बघावे. लबाड कोकिळा कावळ्याच्या घरट्यात आणि चातकातली मादी सातभार्इंच्या घरट्यात अंडी घालते. ती अंडी आणि नंतर थोडी वेगळी दिसणारी पिले पक्ष्यांच्या विश्वात मायेने जोपासली जातात. पालक मात्र शिक्षकांवर मुलांच्या विकासाची जबाबदारी टाकून मोकळे होतात.
ज्ञानाची क्षितिजे आणि बुद्ध्यांकाची स्पर्धा पार करीत आणि भावनेचा ओलावा, आवेग, संवेदना गमवत ही कोवळी, उमलती पिढी अकाली तणावग्रस्त होते. परिपक्वतेविना निराशेच्या गर्तेत कोसळते.
पुस्तकातील विद्या आणि परक्याजवळचे धन जसे कामी येत नाही तसेच असीम ज्ञान देणाऱ्या इंटरनेटकडून मायेचे, माणुसकीचे संस्कार लाभत नाहीत. संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे माणूस घडवताना गुरूही, मडके घडविताना कुंभार जसे वरून थापट्या मारतात पण आतून आधार देत असतात, तसेच करीत असतो.
-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे

Web Title: Importance of the Master

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.