यंत्राधीनं जगत सर्वम!
By Admin | Updated: November 3, 2016 04:58 IST2016-11-03T04:58:16+5:302016-11-03T04:58:16+5:30
‘मंत्राधीनं जगत सर्वम’ असे म्हणणारे आणि तद्नुसार मंत्रसामर्थ्य जपणारे प्रज्ञावान ऋषी या देशात जन्मास आले़

यंत्राधीनं जगत सर्वम!
‘मंत्राधीनं जगत सर्वम’ असे म्हणणारे आणि तद्नुसार मंत्रसामर्थ्य जपणारे प्रज्ञावान ऋषी या देशात जन्मास आले़ त्यांची नावे आणि कर्तृत्व अभ्यासायचे तर सिद्धेश्वरशास्त्री चित्रावांचा प्राचीन चरित्रकोश केवळ चाळला तरी कल्पना येऊ शकते़
विज्ञान उत्तरोत्तर प्रगत होत चालले आणि मंत्रांना अवकळा प्राप्त झाली असे मानव समजू लागला़ दैनंदिन जीवनात मंत्रापेक्षा यंत्र आपले जिणे सुखकर करते़ कंबर भरून येईल, हाताचे सांधे दुखतील मग रहाटाने विहिरीचे पाणी का काढावे? रहाट गेला तो कायमचा़ मोट गेली आणि मोटेवरचे गाणेही गेले़ मिक्सर आला तसे जाते गेले आणि जात्यावरची ओवी लुप्त झाली़ साप कात टाकतो हे ज्ञात होते आता तर काळानेच कात टाकली आहे़ यंत्र नावाच्या नव्या मनूने ‘कोण मला वठणीवर आणू शकतो तो मी पाहे’ असे आव्हानच दिले़ नव्या दमाचे बदल आमच्या पिढीने पाहिले आणि मनाला सावरत पचविले देखील़ कारण बदलांची तक्रार करण्यापेक्षा जमणे महत्त्वाचे होते़ आमच्या बालपणी शेती हिरवीगार होती आणि पोळा सण घरच्या मुलाचे लग्न काढावे एवढ्या थाटात शेतकरी साजरा करत होता़ त्या काळी तिन्हीसांज होत होती आणि रातकिडे किरकिरत होते़ घरची कारभारीण वाड्याच्या उंबऱ्यावर येऊन नवऱ्याची वाट पाहताना म्हणायची़,
अजुनी कसे येती ना परधान्या राजा
किरकिरती रातकिडे
झाल्या तिन्हीसांजा
प्रधान आणि राजा ही बैलांची नावे होती़ यंत्रांनी सगळं बुडीत खात्यात घातलं बघा़ शेतकरीण सांगत होती,
‘पयलं काय बी रायलं नाय बघा़’
यंत्रांनी सगळंच ताब्यात घेतलंय़ चैतन्याचे दिवस संपले आणि अचेतनाचे महत्त्व वाढले़ माणूस माणसाला पारखा असा आजचा काऴ जीवाची किंमत शून्य आणि निर्जीवाला दाम मोजावा लागतो़ कुठले मन आणि कुठली बुद्धी़ मनाचे श्लोक गेले तसे मनाचे दिवसही संपले़ फ क्त यंत्राची मनमानी़ मन घेऊन जगणे फार अवघड होते़ जगणेच अवघड तर,
‘मनुष्यत्वं मुमुक्षुत्वं महापुरुषसंश्रय:’
हे कसे आकलनात यावे़
माणसाला माणूस कळंना तर देव कसा कळावा?
‘यावत् जीवं सुखं जीवेत्’
एवढंच या मनुष्यप्राण्याला कळते आहे़ चार्वाक सगळ्यांनाच आपलासा वाटतो़ ‘मनसस्तु पराबुद्धे यो बुद्धे परतस्तु स:’ मनाच्या पलीकडे बुद्धी आणि तो तर बुद्धीच्याही पलीकडे आहे़ तो समजून यायला मंत्रयुग लागते़ यंत्रयुगाचा उपयोग केवळ जगण्यासाठी़ पण ईश्वरालाच जर हे मंजूर आहे तेथे आपण काय रडणार?
जय यंत्रयुग! जय यंत्र मानव!
-डॉ.गोविंद काळे