डॉ. हमीद दाभोलकर, मानसोपचारतज्ज्ञ, कार्यकर्ता, महाराष्ट्र अंनिस
या लेखमालेची सुरुवात केली तेव्हा जगभरात सज्जनशक्तीच्या पिछेहाटीच्या पार्श्वभूमीवर सज्जनशक्ती समजून घेणे आणि ती कृतिशील करण्याचे मार्ग शोधणे हा प्रमुख उद्देश होता. गेल्या आठवड्यापासून जगभरात तिसऱ्या महायुद्धाचे मळभ दाटून येत असताना तर याचे औचित्य आणखीनच अधोरेखित होते. या पार्श्वभूमीवर सज्जनशक्तीच्या वाटेत प्रमुख अडथळा असलेली मानवी मनातील वाईट वागण्याची प्रवृत्ती आज समजून घेऊ.
मानवी स्वभावात वाईट वागण्याची जी प्रवृत्ती आहे त्याचे संघटित आणि अत्यंत विनाशकारी रूप म्हणजे युद्ध! जगभर पसरलेली दोन महायुद्धे आणि छोटी मोठी असंख्य युद्धे मानव जातीने पहिली आहेत. युद्धांमधून प्रचंड मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि दु:खच निर्माण होते हेदेखील अगणित वेळा अधोरेखित झाले आहे, तरीही काही ठराविक काळाने मानवी समूह या गोष्टीकडे ओढला जातो. मानसशास्त्राच्या भाषेत ‘समाजविघातक व्यक्तिमत्त्व दोषा’चा आजार (Anti social personality disorder) या व्यक्तिमत्त्व दोषाने ग्रासलेल्या व्यक्ती युद्धांच्या केंद्रस्थानी असतात. अशा व्यक्तींमध्ये अगदी कुमारवयापासूनच दुसऱ्या व्यक्तींचे हक्क, सामाजिक नीती-नियम, कायदा या गोष्टींविषयी टोकाचा अनादर असतो. सामान्य माणसाला दुसऱ्याला इजा होणाऱ्या गोष्टींनी दु:ख होते, अशी सहअनुभूतीची भावना या व्यक्तिमत्त्वाच्या लोकांमध्ये दिसून येत नाही. एवढेच नव्हे, तर दुसऱ्याला त्रास दिल्याने एक प्रकारचा आसुरी आनंददेखील अशा लोकांना होत असतो. या सगळ्यांबरोबर अत्यंत उतावळेपणाने आणि बेजबाबदार वागणे हादेखील अशा व्यक्तींच्या स्वभावाचा भाग असतो.
जगभरात युद्धखोरीची भाषा करणाऱ्या देशांचे शीर्षस्थ नेतृत्व पहिले तर वर नमूद केलेले अनेक स्वभावदोष आपल्याला त्यांच्या वागण्यातून सहज लक्षात येऊ शकतील. असे असले तरी या युद्धखोरीचे सर्वच बिल आपण या व्यक्तींच्या नावे फाडू शकत नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अशा स्वभावाच्या माणसांना समाज म्हणून आपल्यातलेच बहुसंख्य निवडून देत असतात. व्यापक हिताचा विचार बाजूला टाकून केवळ आपल्या समूहाचा फायदा बघून त्यांच्या अनेक चुकीच्या गोष्टींकडे नुसते दुर्लक्षच करत नाही तर त्यांचा अनेकवेळा उदो-उदो देखील करीत असतो. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्था देखील याकडे कानाडोळा करत राहतात. या सगळ्यांमधून या वाईट प्रवृत्तींचे फावते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या एका मताने काय होणार आहे, असा विचार करून सज्जन गप्प बसणे पसंत करतात आणि त्यामुळे अशा दुर्जन शक्तींचे आणखीनच फावते.
आइनस्टाइन, बर्ट्रांड रसेलपासून अनेक शास्त्रज्ञांनी जाहीररीत्या युद्धविरोधी भूमिका घेतली होती. भले आपली वैयक्तिक ताकद कमी असली तरी आपण युद्धाच्या विरोधीच भूमिका घेतली पाहिजे. सोशल मीडियावरून युद्धज्वराला खत-पाणी घालणे टाळले पाहिजे. कारण अशाच छोट्या छोट्या सज्जन कृतींच्या एकत्र येण्यातून युद्धविरोधी सज्जन शक्ती निर्माण होऊ शकते. भले आज ते दिवास्वप्न वाटत असले तरी सज्जनशक्तीच्या बाजूने असलेल्या लोकांसाठी हा रस्ता अटळ आहे!
Web Summary : To avert war, understand and counter the human tendency towards destructive behavior. Anti-social personalities drive conflicts, fueled by societal apathy. Active opposition, however small, and resisting war-mongering narratives are crucial for building a peace-loving force.
Web Summary : युद्ध टालने के लिए, विनाशकारी व्यवहार की मानवीय प्रवृत्ति को समझें और उसका मुकाबला करें। असामाजिक व्यक्तित्व संघर्षों को बढ़ावा देते हैं, जिसे सामाजिक उदासीनता से ईंधन मिलता है। सक्रिय विरोध, कितना भी छोटा हो, और युद्ध भड़काने वाले आख्यानों का विरोध शांतिप्रिय शक्ति के निर्माण के लिए महत्वपूर्ण है।