-  विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा एकदा आपल्यापुढे एक विचित्र प्रश्न उभा केला आहे : आर्थिक नुकसान आणि जिवंत राहणे यातून तुम्ही कशाची निवड कराल? अर्थात कोणीही म्हणेल ‘जान है तो जहान है’. जीव वाचला तर आर्थिक नुकसान भरून काढता येईल. लॉकडाऊन पुन्हा सहन करण्याची ताकद आपल्या अर्थव्यवस्थेत नाही हेही स्पष्ट आहे. पण पुन्हा प्रश्न तोच, मग करायचे काय? लोकांचा जीव वाचवायचा कसा? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना लॉकडाऊन नको आहे. सरकारमधल्या कोणालाही हा निर्णय नको आहे. लॉकडाऊन लावण्याचा शौक कोणाला नाही. पण लोक सुधारण्याचे नाव घेत नाहीत. मग कोणता पर्याय उरतो? माझ्या मते मास्क न लावणाऱ्या आणि सुरक्षित अंतर न राखणाऱ्यांवर अत्यंत कडक कारवाई करावी. केवळ दंड वसूल करून भागणार नाही. विमान प्रवास करणारे लोक सुशिक्षित  आहेत, असं आपण गृहित धरतो, पण नाही. एअर होस्टेस  ओरडून सांगत असते, की मास्क आणि शिल्ड वापरा, ते अनिवार्य आहे. कोणीही ते वापरत नाही, हे मी अनुभवले आहे.  विमान प्रवासादरम्यान जे लोक कोविड प्रोटोकॉलचे पालन करीत नाहीत त्यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली पाहिजे.कोविडपासून संरक्षण करण्यासाठी केलेल्या नियमांचे पालन केले नाही तर कडक शिक्षा होईल हे लोकांच्या डोक्यात बसले पाहिजे. तरच लोक मास्क लावतील, सुरक्षित अंतर पळतील. हिंदीत एक म्हण आहे ‘‘भय बिन होयन प्रीती’’!इतक्या संकट काळात लोक बेपर्वा का वागत आहेत हाही एक प्रश्नच आहे. कदाचित लोकांना वाटत असावे, आपल्यावरच ही बंधने का? विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी सभा होताहेत, मोर्चे निघताहेत, लाखो लोक त्यात सहभागी होत आहेत. कुंभमेळ्यात तर लाखो लोक एकत्र आले. अहमदाबादेत दोन क्रिकेट सामने झाले. हजारोंची गर्दी ते पहायला जमली. कोणी मास्क लावला नव्हता, ना सुरक्षित अंतर राखले गेले! हे पाहून लोकांना वाटते कोरोनाचा धोका असा काही नाहीच. आपल्या राज्यात उगीच बागुलबुवा केला गेला आहे. असा समज होणे नक्कीच धोक्याचे आहे !आश्चर्य असे की अशा गर्दीच्या कार्यक्रमांवर ना कोणी सवाल केला, ना कुणी कारवाई केली. अहमदाबादच्या दोन्ही सामन्यांमध्ये स्टेडियम खचाखच भरले होते. असा निष्काळजीपणा का? निवडणूक आयोगाने निवडणूक रॅली व सभांवर बंदी का घातली नाही? किंवा न्यायालयाने स्वत:हून त्याची दखल का घेतली नाही? महामारीच्या काळात तरी जाहीर सभा, मोर्चे आपण टाळले पाहिजेत, असे राजकीय पक्षांना का वाटले नाही? हे पक्ष माध्यमांचा उपयोग करूनही मतदारांपर्यंत पोहोचू शकत होते. विरोधाभास पहा : देशात एकीकडे लाखोंच्या सभा होत आहेत, मोर्चे निघत आहेत, आणि दुसरीकडे अंत्ययात्रेला २० आणि विवाहांना ५० चे बंधन  ! - लोक ही दोन चित्रे पाहतात आणि त्यांच्या मनात असंख्य प्रश्न उभे राहतात. तिथेच गाडी रुळावरून
घसरते. त्यांनाही वाटायला लागते  की, कोरोनाचे नियम काय ते फक्त पाळणाऱ्यांसाठीच आहेत का? - पण लोक सुधारत नाहीत तोवर कोरोनावर नियंत्रण मिळवणे अशक्य हे निर्विवाद सत्य आहे. सरकारच्याही काही मर्यादा आहेत. कोरोना आला तेव्हा महाराष्ट्रात सरकारी इस्पितळात केवळ ८ हजार खाटा होत्या. आज त्यांची संख्या जवळपास पावणे चार लाख झाली आहे.तरीही कोरोना रुग्णांना खाट मिळणे मुश्कील झाले आहे. आज सरकार भले खाटांची संख्या वाढवील पण वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचारी कोठून आणणार?

पहिल्या वेळी महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप जास्त होता आत्ताही तो तसाच आहे. पूर्वानुभवावरून असे दिसते की देशाच्या पश्चिम भागात विशेषत: मुंबईला महामारीने जास्त ग्रासले होते. स्वाभाविकपणे आपण अधिक काळजी घ्यायला हवी होती. कोरोनाने सगळ्यांनाच उद्ध्वस्त केले हे आपण पाहतो आहोत. वैद्यकीय व्यवस्था गडबडली आहे. करोडो नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योग धंदे चौपट झाले आहेत. खाजगी शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे.  लॉकडाऊन लागण्याची वेळ आलीच तर काय होईल याचा जरा विचार करा... सगळे बरबाद होणार हे सांगायला भविष्यवेत्त्याची गरज नाही. कोरोनाच्या आधी आपले सकल राष्ट्रीय उत्पन्न ८ टक्के दराने वाढण्याच्या स्थितीत होते. कोरोनाने तो दर उणे २३ टक्के इतका खाली नेला आहे. ७ टक्के वाढ यात जमा केली तर अर्थ असा निघतो की गतवर्षी आपले सकल राष्ट्रीय उत्पन्न ३० टक्के घसरले. आता यापेक्षा जास्त धक्का सहन करण्याची ताकद उरलेली नाही. म्हणून आपण पुन्हा लॉकडाऊन लागणार नाही असेच वागले पाहिजे. सरकारला मी एक गोष्ट सांगू इच्छितो : लसीकरणाचा वेग वाढवा. वयाचे बंधन काढून टाकून १८ वर्षावरील प्रत्येकाला लस मिळू द्या. लसीकरणाची सूत्रे केंद्राकडे आहेत. कोणत्याही राज्यात लस कमी पडणार नाही हे केंद्राने पाहिले पाहिजे. विशेषत: वाईट अवस्था असलेल्या महाराष्ट्राला जास्तीत जास्त लसीचा साठा मिळाला पाहिजे. किमान ८० टक्के जनतेचे लसीकरण झाल्यावर सामूहिक प्रतिकारक्षमता निर्माण होईल. तरीही हे लक्षात ठेवले पाहिजे की कोरोनाविरुद्ध मास्क आणि सुरक्षित अंतर हे शस्त्र वापरावेच लागेल. त्याच्याबरोबर जगणे अंगवळणी पाडून घ्यावे लागेल. बेपर्वाईने वागलो तर परिस्थिती हाताबाहेर जाईल!

मी कोरोना योद्धे, डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, पोलिस आणि फ्रंट लाइन वर्कर्सबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी  आपल्या जीवाची पर्वा न करता आपली कर्तव्ये पार पाडण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मास्क घालून आणि सामाजिक अंतरांचे पालन करुन आपण त्यांच्याप्रति निदान आभार तरी व्यक्त करुया.
vijaydarda@lokmat.com

Web Title: If you act carelessly in corona crisis then self- destruction is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.