पुनर्वसनाचा आदर्श वस्तुपाठ

By Admin | Updated: November 5, 2016 05:09 IST2016-11-05T05:09:33+5:302016-11-05T05:09:33+5:30

प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास अल्पावधीत दर्जेदार काम होऊ शकते, याचा आदर्श वस्तुपाठ पाचोराबारी (जि. नंदुरबार) येथील पुनर्वसन कार्याने घालून दिला

Ideal object of rehabilitation | पुनर्वसनाचा आदर्श वस्तुपाठ

पुनर्वसनाचा आदर्श वस्तुपाठ


प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन काम केल्यास अल्पावधीत दर्जेदार काम होऊ शकते, याचा आदर्श वस्तुपाठ पाचोराबारी (जि. नंदुरबार) येथील पुनर्वसन कार्याने घालून दिला आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर शासन आणि समाज या दोन्ही पातळ्यांवर संवेदनशीलता, दानशूर वृत्ती याचा विलक्षण अनुभव आपण घेत असतोे. काही काळानंतर मात्र पुनर्वसनाचा उत्साह मावळू लागतो आणि पुढे तर अशा आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन लालफितीत कैद होऊन जाते. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील पाचोराबारी या गावात अवघ्या चार महिन्यात पुनर्वसनाचा आदर्श वस्तुपाठ प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी घालून दिला आहे.
१० जुलैच्या मध्यरात्री पाचोराबारी या गावात ढगफुटी झाली. तब्बल ३९० मि.मी.पाऊस कोसळला. गावातल्या चोंडी नाल्याला महापूर आला. एवढे पाणी रेल्वेमार्गाखालील छोट्या बोगद्यातून वाहून जाणे अशक्य असल्याने बोगद्याच्या दोन्ही बाजूचा सुमारे तीन किलोमीटर लांबीचा भराव वाहून गेला. रेल्वे रुळ खचल्याचे लक्षात येताच तिथून जाणाऱ्या भुसावळ-सुरत पॅसेंजरच्या चालकाने गाडी थांबवली. चार डबे रुळावरुन घसरले तरी सव्वाशे प्रवाशांना सुखरुप वाचविण्यात आले. मात्र पश्चिमेकडील वस्तीत पाणी शिरले आणि २०० लोकांचा संसार उद्ध्वस्त झाला. ३९ घरे जमीनदोस्त झाली. २५८ घरांचे नुकसान झाले. सहा लोकांचा मृत्यू झाला. १७३ पाळीव जनावरे वाहून गेली. अवघ्या अर्ध्या तासात होत्याचे नव्हते झाले.
नंदुरबारपासून अवघ्या १० कि.मी.अंतरावर असलेल्या या गावात शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांची मदत तातडीने पोहोचली. संपूर्ण आदिवासी गाव आणि मजुरीवर उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या ग्रामस्थांसाठी अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मदतकार्याच्या सुसूत्रीकरणावर अधिक भर दिला. १५ दिवसांत शासकीय पंचनामे आणि नुकसानभरपाईच्या वाटपाचे काम आटोपण्यात आले. ९८ लाखांची नुकसानभरपाई धनादेशाद्वारे दिल्यानंतर लक्षात आले की, बऱ्याच आदिवासी बांधवांचे बँकेत खाते नाही. खाते उघडून त्यांना शासकीय मदत देण्यात आली. अनेक शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार स्वयंस्फूर्तीने दिला. त्यासोबतच सामाजिक व स्वयंसेवी संस्थांची एकत्रित बैठक घेऊन पुनर्वसन कार्यातील प्राधान्यक्रम, जबाबदारीचे वाटप, आर्थिक व वस्तुरुपाने योगदान याविषयी नियोजन केले. अंमलबजावणी योग्यपणे होत असल्याची खबरदारी घेण्यासाठी स्वत: जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी या गावाला नियमित भेटी दिल्या. परिणामस्वरुप चार महिन्यात सर्व ३९ घरे पुन्हा उभी राहिली. ही घरे उभी राहात असताना शौचालयदेखील उभारण्यात आले. पडझड झालेल्या घरांची डागडुजी करण्यात आली.
अधिकारी व स्वयंसेवी संस्थांच्या चार महिन्यांच्या संपर्क मोहिमेमुळे गावातील पुनर्वसनासोबत विकास कामे मार्गी लागत आहेत. चोंडी नाल्याचे पाणी पुन्हा गावात शिरु नये म्हणून या वस्तीभोवती संरक्षण भिंत उभारण्यात येत आहे. वृक्षारोपण करण्यात आले. व्यसनमुक्तीसाठी केलेल्या जनजागृतीला यश येऊ लागले आहे. ग्रामस्थांच्या सकारात्मक प्रतिसादाने अधिकारी-कर्मचारी व कार्यकर्ते उत्साहित आहेत. या गावात आणखी काय करता येईल, याची आखणी ते करीत आहेत. लोकसहभागाचे मोठे उदाहरण पाचोराबारी गावाच्या निमित्ताने घालून दिले आहे.
पुनर्वसनाचा नवा वस्तुपाठ घातला जात असताना अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकतादेखील अधोरेखीत केली आहे. या गावात १९७७ व १९९७ या वर्षात नाल्याचे पाणी गावात घुसून नुकसान झाले होते. २००६ च्या अतिवृष्टीने तापी नदीला महापूर आला होता. प्रत्येक वेळी आपातकालीन उपाययोजनांविषयी चर्चा झाली. भुसावळ-सुरत रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करताना गावाजवळील बोगद्यांचा विस्तार आवश्यक होता. त्याकडे दुर्लक्ष झाले. चार महिन्यानंतरही या ठिकाणी एकच रेल्वे मार्ग सुुरु आहे. वेळीच खबरदारी घेतली तर नुकसान टाळता येऊ शकते, हे पाचोराबारीच्या दुर्घटनेने दाखवून दिले आहे. पुनर्वसनाचे काम करताना दुर्घटना टाळण्यासाठी उपायांची गरज लक्षात घ्यायला हवी, हा त्यातील संदेश आहे.
- मिलिंद कुलकर्णी

Web Title: Ideal object of rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.