माझं वय ८० वर्षे आहे. माझी स्वकमाईची मालमत्ता मला माझ्या जवळच्या काही जणांना द्यायची आहे.. - अनामिक, धुळेस्वकमाईची आणि स्वत:च्या मालकीची, स्वत: खरेदी केलेली मालमत्ता आपल्या हयातीनंतर योग्य व्यक्तीच्या हाती पडावी अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी मृत्युपत्र करणं हा सर्वांत सुरक्षित आणि चांगला मार्ग आहे. ही मालमत्ता तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे कोणालाही देऊ शकता. मृत्युपत्र जर केलेले नसेल तर मात्र मृत्यूनंतर ही मालमत्ता वारसांना वारसाहक्कानं मिळते.आपल्या मृत्यूनंतर आपली मालमत्ता, संपत्ती किंवा हक्क कोणाला आणि कशा प्रकारे द्यायचे यासंदर्भात मृत्युपत्र तयार केलं तर ते अधिक श्रेयस्कर असतं. महाराष्ट्रात मृत्युपत्राची नोंदणी करणं कायद्यानं बंधनकारक नाही, पण नोंदणी केलेली असली तर भविष्यात वाद निर्माण झाल्यास मृत्युपत्र हा अधिक विश्वसनीय पुरावा ठरतो.
मृत्युपत्र तयार करणाऱ्यानं आपलं पूर्ण नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मालमत्तेचं स्पष्ट वर्णन लिहावं. कोणत्या व्यक्तीला कोणती मालमत्ता द्यायची हे त्यात स्पष्टपणे नमूद करावं. मृत्युपत्र लिहिल्यानंतर दोन प्रौढ साक्षीदारांनी त्यावर सही करणं आवश्यक असतं. लक्षात ठेवा, ज्यांना तुम्ही आपली मालमत्ता देणार आहात, म्हणजे मालमत्तेचा लाभ घेणारेच साक्षीदार नसावेत. सोबत डॉक्टरांचे प्रमाणपत्र असल्यास उत्तम. संबंधित उपनोंदणी कार्यालयात (सब रजिस्ट्रार ऑफिस) मूळ मृत्युपत्र, ओळखपत्र, दोन साक्षीदारांच्या सह्या आणि काही प्रमाणात नोंदणी शुल्क भरल्यानंतर मृत्युपत्र नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होते. मृत्युपत्र तयार करणाऱ्या व्यक्तीला आपल्या हयातीत ते कधीही, कितीही वेळा बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार असतो. शेवटचे मृत्युपत्र ग्राह्य धरले जाते. अट एकच, ती व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे.