Hyperloop: शेंगेत बसलेल्या शेंगदाण्यांचा सुपरफास्ट प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 06:27 AM2022-06-25T06:27:32+5:302022-06-25T06:28:00+5:30

Hyperloop: हायपर लूप म्हणजे एका बंदिस्त ट्यूबमधल्या पॉडमध्ये प्रवाशांनी बसायचं, तो पॉड प्रचंड वेगात पुढे गेला की, काही मिनिटांत शेकडो किलोमीटरचा प्रवास !

Hyper loop: The superfast journey of the peanuts sitting in the peanuts! | Hyperloop: शेंगेत बसलेल्या शेंगदाण्यांचा सुपरफास्ट प्रवास!

Hyperloop: शेंगेत बसलेल्या शेंगदाण्यांचा सुपरफास्ट प्रवास!

Next

- अच्युत गोडबोले
(ख्यातनाम लेखक
सहलेखिका- आसावरी निफाडकर)

‘विमानं, ट्रेन्स, मोटारगाड्या आणि बोटी यांच्याबरोबरच ‘हायपर लूप’ लवकरच दळणवळणाचं पाचवं साधन होईल’ असं जगप्रसिद्ध व्यावसायिक इलॉन मस्क याचं म्हणणं आहे. अधातरी बसवलेल्या भल्यामोठ्या पाईपमध्ये एका बंदिस्त ट्यूबमधल्या पॉडमध्ये प्रवाशांना बसवलं जाईल; तो पॉड आपोआप प्रचंड वेगात पुढे ढकलला जाईल आणि प्रवासी आपल्या प्रवासाचा मोठा पल्ला काही क्षणात पार करून एका टोकापासून दुसरीकडे पोहोचतील, अशी ही संकल्पना आहे. म्हणजे शेंगेत शेंगदाणे बसावेत आणि ती शेंगच इकडून तिकडे ढकलली जावी, तसं काहीसं !  
१८४५ मध्ये ब्रुनेल नावाच्या एका ब्रिटिश संशोधकानं ट्यूबमधल्या रेल्वेची संकल्पना मांडून अशाप्रकारच्या ट्रेन्स दरताशी ११० किलोमीटर इतक्या प्रचंड वेगात धावू शकतील, असा दावा केला होता. १८६४ मध्ये लंडनमधली ‘दि क्रिस्टल पॅलेस न्यूमॅटिक रेल्वे’ नावाची कंपनी हवेच्या दाबाचा उपयोग ट्रेन चढावर चढवण्यासाठी करायची आणि ती खाली ओढायला पोकळीचा उपयोग करायची. लंडनमधल्या जोसिया लॅटिमर क्लार्क या इंजिनिअरनं वाफेच्या दाबावर चालणाऱ्या न्यूमॅटिक ट्यूबमधून टेलिग्राफिक संदेशांची देवाण-घेवाण करण्यासाठी १८५४ मध्ये दीड इंच व्यासाची  एक  हवाबंद नळी जमिनीखालून दोन टेलिग्राफ स्टेशन्समध्ये घातली होती. संदेश टेलिग्राफ फॉर्म्सवर लिहून त्यानंतर ते फॉर्म्स गट्टा पर्चापासून (मलेशियन झाडांच्या चिकापासून तयार केलेला रबरासारखा पदार्थ) तयार केलेल्या सिलिंडरच्या आकाराच्या भांड्यात ठेवले जायचे. हवाबंद नळीत हा सिलिंडर दर सेकंदाला २० फूट या वेगानं प्रवास करत दुसऱ्या टोकाला पोहोचायचा ! पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा तंत्रज्ञानाचा वापर होत होता.
दुर्दैवानं हे तंत्रज्ञान फार काळ टिकू शकलं नाही.  यातून उद्या माणसांनाही अशा ट्यूब्जमधून प्रवास करता येऊ शकेल, अशी आशा मात्र निर्माण झाली.  २०१३ मध्ये ‘स्पेस एक्स’ या कंपनीचा सीईओ इलॉन मस्क यानं ‘हायपर लूप’ची संकल्पना मांडली. २८-४० प्रवासी (आणि सामान) बसतील इतक्या मोठ्या कॅप्सुल्स एका भल्यामोठ्या बंदिस्त पाईपलाईनमधून दर २ मिनिटाला (काही वेळा ३० सेकंदाला) सोडल्या जातील.  या कॅप्सुल्स पाईपलाईनमधून प्रवास करत असल्यामुळे त्यांना ट्रॅफिक जॅम किंवा हवामान अशा कशालाच सामोरं जावं लागणार नाही, शिवाय या ‘हायपर लूप’मुळे प्रदूषणही होणार नाही, असा त्यानं दावा केला होता. पण ही कल्पना प्रत्यक्षात आणणं हे महाकठीण काम होतं. सुरुवातीला या कॅप्सुल्स पुढे ढकलण्याकरिता मोठ-मोठे पंखे एका टोकाला बसवण्याचा विचार झाला होता. इतक्या मोठ्या कॅप्सुल्सना लांबलचक (जवळपास ५५० किलोमीटर) ट्यूबमधून वेगात एकीकडून दुसरीकडे सरकवण्यासाठी प्रचंड मोठे पंखे लागतील. बरं, या ट्यूब्जमध्ये या पंख्यांमुळे मोठ्या प्रमाणावर फिरणाऱ्या वाऱ्यामुळे घर्षण निर्माण होईल आणि त्यामुळे उलट या कॅप्सुल्सच्या वेगात अडथळा बसेल. त्यामुळे मस्कनं पंख्याची कल्पना सरळ खोडून काढली. दुसरा पर्याय  म्हणजे या ट्यूब्जमध्ये इलेक्ट्रॉमॅग्नेटिक सस्पेन्शनच्या मदतीनं पोकळी निर्माण करून कॅप्सुल्सना खेचण्याचा; पण दररोज हजारोंच्या संख्येनं या ट्यूब्जमध्ये कॅप्सुल्सची ये-जा होणार, याचा विचार केला, तर अशा पोकळीमुळे या ॲल्युमिनियम ट्यूबजमध्ये चरे पडण्याची शक्यताच जास्त प्रमाणात निर्माण होईल, असं वाटल्यामुळे हा पर्यायही खोडला गेला.
मग पोकळीयुक्त स्टीलच्या पाईप्सच्या टोकाला इलेक्ट्रिक पंखे बसवण्याचा पर्याय समोर आला. हे पंखे या पॉड्सना गती देतील. त्यासाठी सोलर पॅनल्सचा विचार झाला. सोलर पॅनल्समुळे दिवसा ऊर्जेचा पुरवठा होईल, पण रात्रीचं काय? - सोलर पॅनल्समुळे संपूर्ण सिस्टिम सूर्यप्रकाशादरम्यान तर  चालेलच शिवाय रात्री किंवा ढगाळ वातावरणातही ती चालू शकेल, इतकी ऊर्जा या बॅटरीजमध्ये साठवली जाईल, असा मस्कनं दावा केला.
अमेरिकेतल्या लास वेगासमध्ये २०१४ मध्ये ‘व्हर्जिन हायपरलूप’ नावाच्या कंपनीचे पॉड्स दरताशी १०८ किलोमीटर वेगात ५०० मीटरपर्यंत धावले ! हे पॉड्स तब्बल १६४० फुटांवरून धावत होते. २०२० मधील नोव्हेंबर महिन्यात ‘व्हर्जिन  हायपरलूप’च्या ‘हायपरलूप पॉड’ची 
चाचणी घेण्यात आली. या कंपनीत काम करणाऱ्या पुण्याच्या तनय मांजरेकरनं या चाचणीदरम्यान या पॉडमधून प्रवास केला. ‘हायपर लूप पॉड’मधून प्रवास करणारा हा पहिला भारतीय ठरला. आज अनेक शहरांमध्ये ‘हायपर लूप’साठीचे प्रकल्प चालू आहेत. भारतानंही ‘हायपर लूप’ प्रकल्पांना हिरवा कंदील दिला आहे. एकूणच काही वर्षांतच ही वाहनं  आपल्याला सेवा द्यायला लागतील, यात शंका नाही !
godbole.nifadkar@gmail.com

Web Title: Hyper loop: The superfast journey of the peanuts sitting in the peanuts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.