वाढत्या टोकाच्या सामाजिक संवेदनशीलतेमुळे आणि सोशल मीडियावरील तीव्र प्रतिक्रियांमुळे विनोदाचा आवाका संकुचित होत चालला असून, आता कुणाच्या भावना दुखावण्यापेक्षा स्वतःवरच विनोद करण्याचा मार्ग स्वीकारावा लागतो, अशी मार्मिक टिप्पणी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे लेखक-दिग्दर्शक-निर्माते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांनी केली.
अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी गोस्वामी आणि मोटे यांच्याशी खुमासदार शैलीत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी साहित्य, वाचन संस्कृती, मराठी भाषा या विषयांसह बदलत्या समाजमानसावर मार्मिक भाष्य केले.
गोस्वामी म्हणाले, विनोद हा समाज किती निरोगी आहे, हे मोजण्याचं परिमाण आहे. जो समाज विनोदाला आत्मीयतेने स्वीकारतो तो निरोगी असतो. मात्र, आज समाज अधिक संवेदनशील झाला आहे. कुठलीही गोष्ट मांडताना त्यावर काय प्रतिक्रिया येईल, हा विचार आधी करावा लागतो. यातूनच विनोद संकुचित होत चाललाय, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. त्यावर मोटे म्हणाले की, आज काल आम्ही कुणाच्या भावना दुखवायलाच जात नाही. स्वतःच्याच भावना दुखावून घेतो, स्वतःवरच विनोद करतो. सोशल मीडियामुळे या बदलाला वेग आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. "पूर्वी आक्षेप असले, तरी ते व्यक्त करण्याची साधनं नव्हती. आता एका पोस्टमधून समविचारी गट तयार होतो आणि वाद वाढतो," असे ते म्हणाले.
सख्याची भीती निर्माण झाली!
पूर्वी लोकनाट्यात कृष्ण हा आमचा सखा होता. ज्याची गवळणींकडून चेष्टाही केली जायची, पण त्यावेळचा समाज विनोदाच्या बाबतीत इतका सजग होता की, त्याला कृष्णाची चेष्टा आणि नंतर कृष्णाने दिलेला संदेश यात फरक करता यायचा. आता त्या सख्याची भीती निर्माण झाली. मित्रावर बोलताना घाबरायला लागलो आणि लोककलेतील प्रबोधन करणारा एक बाज हळूहळू संपत आला. भावनेच्या उद्रेकामुळे प्रबोधन थांबले, असे मत गोस्वामी यांनी मांडले.
एकूण समाजच थोडा भित्रा झालाय...
मोटे म्हणाले, "आमच्याकडे एमएचजे पोलिस आहेत, एमएचजे न्यायालय आहे, एमएचजोबा नावाचा देवही आहे. आडनावंही आम्ही तयार करून वापरतो. कुणाच्या भावना दुखावण्यापेक्षा स्वतःच्या भावना दुखावून घेतो. आम्ही स्वतःवरच एवढे विनोद करतो की, आपणच आपल्यावर हसूया. आम्ही दोघं पडद्यामागे असतो, पण कलाकारांना फेसबुक, इन्स्टावर ट्रोल केले जाते. एकूण समाजच थोडा भित्रा झालाय. तो लगेच चिडतो!"
'रविवारची जत्रा'च्या वाचनातून असा झाला 'हास्यजत्रा'चा जन्म...
दोघांनीही आपल्या लेखनप्रवासात वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. लहानपणी 'रविवारची जत्रा' वाचायला खूप आवडायचं. 'कॉमेडीची बुलेट ट्रेन'मध्ये बुधवारी स्पेशल एपिसोड करायचो. तेव्हा त्याचं नाव 'बुधवारची जत्रा' ठेवूया असं डोक्यात आलं. त्यानंतर, सोनी मराठीसाठी शो करायचा ठरलं, तेव्हा 'हास्यजत्रा' करूया म्हटलं. अजय भाळवणकरांनी त्याचं नाव 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' केलं, असा किस्सा मोटे यांनी सांगितला.
नेत्यांना कोपरखळी
मुलाखत सुरू असतानाच सभागृहात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आगमन झाले. तो धागा पकडून अनासपुरे यांनी राजकीय आणि सामाजिक परिस्थितीबद्दल काय भाष्य कराल असे विचारले. त्यावर गोस्वामी म्हणाले, राजकीय नेत्यांना विनंती आहे की, विनोदाचा प्रांत आमच्याकडेच ठेवा. आम्हीही हास्यजत्रा करतो, असं नेतेमंडळी म्हणतात. रोज इतक्या प्रमाणात विनोद झाला, तर तो आम्हाला करणं अवघड होईल, अशी कोपरखळी या जोडगोळीने मारली, तेव्हा एकच हंशा पिकला. महाराष्ट्रात राजकीय विनोद स्वीकारण्याची परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले; मात्र कार्यकर्त्यांची टोकाची संवेदनशीलता हीच खरी अडचण असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
Web Summary : Social media trolling and sensitivity are shrinking humor's scope, say 'Maharashtrachi Hasyajatra' makers. They now focus on self-deprecating humor to avoid offense, noting society's increased sensitivity and fear of backlash stifle creative expression and satire.
Web Summary : 'महाराष्ट्रची हास्यजत्रा' के निर्माताओं का कहना है कि सोशल मीडिया ट्रोलिंग और संवेदनशीलता हास्य के दायरे को कम कर रही है। अब वे अपराध से बचने के लिए आत्म-अवमूल्यन हास्य पर ध्यान केंद्रित करते हैं, यह देखते हुए कि समाज की बढ़ती संवेदनशीलता और प्रतिक्रिया का डर रचनात्मक अभिव्यक्ति और व्यंग्य को दबा देता है।