दिनकर रायकर, समूह संपादक, लोकमत‘मी अलीकडे पत्रकारांना फारसे भेटत नाही किंबहुना त्यांना टाळण्याचीच माझी भूमिका असते’, हे वाक्य अलीकडच्या काळात शरद पवार यांना वारंवार उच्चारताना मी ऐकतो तेव्हां केवळ मलाच नाही तर माझ्या पिढीतल्या पत्रकाराना त्याचे आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही. कारण आम्ही पत्रकारांना टाळणारे नव्हे, तर त्यांच्याशी अत्यंत मित्रत्वाचे आणि सौहार्दाचे संबंध राखणारे पवार पाहात आलो आहोत. पण पत्रकारांना टाळण्यामागची त्यांची जी भूमिका ते सांगतात ती योग्य असल्याचेही आम्हाला जाणवते. कारण कोणताही अभ्यास नसताना हाती लेखणी वा माईक आहे म्हणून समोरच्या व्यक्तीचा अधिक्षेप होईल, असे प्रश्न विचारणे व ते विचारताना हेत्वारोप करणे आणि बऱ्याचदा कळ लावण्याचे काम करणे असे उद्योग अलीकडच्या काळात सुरु झाले आहेत. परिणामी राजकीय नेते आणि पत्रकार यांच्यातील विश्वासाचे नातेच बहुधा नष्ट होत चालले आहे. पवार पहिल्यांदा वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात गृह राज्यमंत्री म्हणून राज्याच्या सत्ताकारणात आले, तेव्हांपासून अगदी दशकभरापूर्वीपर्यंत त्यांचे पत्रकारांशी आणि व्यक्तिश: माझ्याशी अगदी निकटचे संबंध होते. वृत्तपत्रांचे समाजातील महत्व आणि विशेषत: राजकारण करणाऱ्यांच्या दृष्टीने पत्रकारितेची असलेली अपरिहार्यता पवार इतक्या नीटपणाने जाणून होते की कोणत्या दैनिकात कोण बातमीदार आहे, रात्रपाळीला कोण आहे इथपर्यंतची खडा न खडा माहिती त्यांच्यापाशी असे. कधी मंत्रालयाच्या प्रेस रुममध्ये, कधी स्वत:च्या दालनात, कधी आपल्या बंगल्यावर तर कधी सहली आयोजित करुन पत्रकारांशी अत्यंत मनमोकळ्या चर्चा करण्याची त्यांना मनापासून आवड होती. अनेकदा त्यांनी स्वत:च्या बंगल्यावर आम्हाला खास बोलावून काही चांगल्या इंग्रजी सिनेमांचे शोदेखील आयोजित केले होते. पत्रकारांना तसेही ‘जॅक आॅफ आॅल ट्रेड’ म्हटले जात असल्याने जगाच्या पाठीवरील कोणत्याही विषयांवरील चर्चा अगदी दिलखुलास रंगत असत. परवाच्या दिल्लीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी पवारांचे अगदी अचूक वर्णन केले. शेतकऱ्याला जसा हवामानाचा अचूक अंदाज अगोदरच येतो तसा पवारांना राजकीय हवामानाचा अंदाज येतो असे मोदी म्हणाले. पण पवारांना माध्यमांमधील बदलत्या हवामानाचाही अचूक अंदाज पूर्वीच आल्याने की काय त्यांनी हल्ली पत्रकारांना टाळण्याची भूमिका घेतली असावी. माझ्या व्यक्तिगत जीवनात मला शरदरावांनी त्यांना स्वत:ला आलेले जे काही अनुभव आवर्जून सांगितले, ते तर अत्यंत मनोज्ञ असेच आहेत. संजय गांधी यांचे अपघाती निधन झाले, तेव्हां पवार काँग्रेस पक्षात नव्हते. पण तरीही माणुसकीच्या नात्याने त्यांनी दिल्लीत जाऊन संजय यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यावेळी इंदिरा गांधींनी त्यांना ‘तुम्ही दिल्लीतच होता का’ असे विचारले. पवार म्हणाले ‘मुंबईहून आलो.’ त्यावर इंदिराजी उद्गारल्या ‘आय विल नेव्हर फर्गेट धिस मोमेन्ट’ ! काही वर्षांनी खुद्द इंदिरा गांधी यांचीच अत्यंत निर्घृण हत्त्या झाली. तेव्हांही पवार काँग्रेसमध्ये नव्हते. त्यांनी दिल्लीत जाऊ इंदिराजींचे अन्त्यदर्शन घेतले. बाजूला राजीव गांधी होते. पवारांना एका बाजूला घेऊन ते म्हणाले, ‘दिल्लीतच थांबा. परत जाऊ नका. दंगे पेटले आहेत. मला तुमच्या सल्ल्याची आणि मदतीची गरज आहे’पवार काँग्रेस पक्षावर नाराज असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या पक्षातील लोकशाहीचा अभाव. त्याला सर्वस्वी कारणीभूत इंदिरा गांधी, ही पवारांची धारणा. त्यामुळे आता त्याच राहिल्या नाहीत तेव्हां पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतू शकतात, असे वृत्त मी तेव्हां ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये दिले. पवार भयानक संतापले. या बातमीमुळे माझ्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उगारले गेल्याचे ते म्हणाले. ही बातमी म्हणजे माझे सद्यस्थितीचे अवलोकन आहे वगैरे मी सांगू लागलो, पण त्यांनी काहीही न ऐकता फोन ठेवूनही दिला. हा प्रकार घडून गेल्यानंतर काही दिवसांनी एकदा तेच हसतहसत म्हणाले ‘प्रतिभाने मला बजावले आहे. हिमालयात जा. पण काँग्रेसमध्ये परत जाऊ नका.’मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची मोहीम अगदी शिगेला पोहोचली असतानाच्या काळात एकदा ते व आम्ही काही पत्रकार औरंगाबादला गेलो होतो. तिथल्या सुभेदारी गेस्ट हाऊसवर त्यांनी केवळ दलित कवींचे संमेलन आयोजित केले होते. पहाटे दोनपर्यंत ते चालले. नंतरच्या गप्पात या कवींच्या कवितांना प्रकाशक मिळत नाही अशी तक्रार त्यांच्या कानी घातली गेली आणि तत्काळ त्यांनी तशी व्यवस्था करुन दिली.माणसं उगीच मोठी होत नसतात. पण मोठ्या माणसांचं मोठेपण जाणून आणि जाणवून घ्यायलादेखील अंगी वकूब असावा लागतो. तोच जर आजच्या माध्यम सृष्टीत लोप पावत चालला असेल तर त्यात राजकारण्यांपेक्षा पत्रकारितेचेच अधिक नुकसान आहे. बहुश्रुतता हा मोठा गुण मानला जातो. त्याचाच अभाव निर्माण झाल्याने पवारांसारखे नेते जर श्रोतेही नको आणि त्यांचा सहवासही नको या भूमिकेप्रत येऊन पोहोचले असतीस तर त्यात दोष कोणाचा मानायचा?
‘माणसं उगीच मोठी होत नसतात’!
By admin | Updated: December 12, 2015 00:05 IST