हृदय प्रवास सुलभ कसा होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 05:52 IST2016-11-02T05:52:38+5:302016-11-02T05:52:38+5:30

दोन उमद्या तरुणांच्या बहाद्दर कुटुंबियांनी घेतलेल्या धीरोदत्त निर्णयामुळे अवयवदान प्रचार-प्रसार मोहिमेला गती मिळणार आहे़

How will heart travel be handy? | हृदय प्रवास सुलभ कसा होईल?

हृदय प्रवास सुलभ कसा होईल?


नांदेडमधील सुधीर रावळकर अन् संतोष मोरे या दोन उमद्या तरुणांच्या बहाद्दर कुटुंबियांनी घेतलेल्या धीरोदत्त निर्णयामुळे अवयवदान प्रचार-प्रसार मोहिमेला गती मिळणार आहे़ त्याचवेळी दातृत्वाचा हा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी शासनाने धोरण निश्चित करण्याची गरज आहे़
हृदय मुंबईला, यकृत पुण्याला, किडन्या औरंगाबादला, नेत्रदान नांदेडला़़़ अवयवदानाचा हा अद्भूत प्रवास आयुष्य फुलविणारा होता़ सुधीर रावळकर, संतोष मोरे या दोन उमद्या तरुणांच्या बहाद्दर कुटुंबियांनी घेतलेला धीरोदत्त निर्णय अवयवदान प्रचार-प्रसार मोहिमेला गती देणारा ठरला आहे़ नांदेडसारख्या ठिकाणी १० दिवसांत दोन वेळा ग्रीन कॉरिडॉर यशस्वी ठरल्याने येणाऱ्या काळात जिल्ह्यांच्या ठिकाणाहूनही अवयवदानाची कैक उदाहरणे समोर येतील़
एकीकडे अवयवदानाचा विषय सर्वमान्य होत असताना त्यातील अडचणी व अडथळ्यांचा विचार शासनस्तरावर होण्याची आवश्यकता आहे़ नांदेडमध्ये ग्रीन कॉरिडॉरचा दुसरा प्रयोग यशस्वी होताना एका विमान कंपनीचा चर्चेत आलेला आडमुठेपणा नव्या प्रश्नाकडे लक्ष वेधणारा आहे़ एकूणच अवयवदानाच्या मोहिमेसाठी शासन व यंत्रणेला स्वतंत्र धोरण आखण्याची गरज आहे़ 'ब्रेन डेड' झालेल्या रुग्णाचे अवदान करण्याची संमती कुटुंबियांनी दिल्यानंतर सदर अवयव कोणाला दान करायचे याबाबतचा निर्णय शासन नियुक्त समिती घेते़ सदरील प्रत्यारोपण समन्वय समितीकडून संबंधित रुग्णालयाला कळविले जाते़ त्यानंतर ब्रेन डेड झालेल्या रुग्णाचे हृदय, यकृत, मुत्रपिंड, नेत्र हे अवयव शस्त्रक्रियेद्वारे काढून विनाविलंब गरजू रुग्णांपर्यंत पोहचविणे आवश्यक असते़ त्यासाठी वेळ हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे़ दाता नांदेडला अन् स्वीकारणारा मुंबई, पुण्यात असेल तेव्हा कमी वेळेत रुग्णापर्यंत पोहचविण्यासाठी विमान सेवेशिवाय पर्याय उरत नाही़ नांदेडमधील पहिल्या ग्रीन कॉरिडॉरला कुठलाही अडथळा आला नाही़ परंतु दुसऱ्या प्रयोगाच्या वेळी ज्या रुग्णालयाने हृदयासाठी सहमती दर्शविली, त्यांनी दुसऱ्या दिवशी विमान सेवेचे कारण सांगून हृदय नेण्यासाठी असमर्थता व्यक्त केली़ त्याचवेळी अन्य एका रुग्णालयाने यकृतासाठी एक नव्हे, तर दोन विमानांची व्यवस्था केली़ किडनी प्रत्यारोपणासाठी जास्तीचा वेळ मिळतो़ त्यामुळे दोन्ही वेळा औरंगाबादला रुग्णवाहिकेद्वारे साडेतीन तासात मुत्रपिंड पोहचले़
सदर प्रक्रिया अत्यंत वेगाने व तितक्याच जबाबदारीने हाताळली जाते, त्यामुळे दुसऱ्यावेळी हृदयासाठी मुंबईहून दर्शविण्यात आलेली असमर्थता गंभीर बाब आहे़ याउपरही नांदेड येथील युवक दात्यांच्या दातृत्वामुळे पहिल्या वेळी सहा जणांचे व दुसऱ्या वेळी पाच जणांचे आयुष्य फुलले़
अवयवदान प्रक्रियेसाठी विमान कंपन्यांना नियमावलीने बांधण्याचे काम शासनाने केले पाहिजे़ अर्थातच रुग्णालय वा गरजू रुग्ण खर्च करत असला तरी शासन विमानतळ तसेच विमान कंपनीकडून घेत असलेल्या सेवाकर व इतर करांमध्ये सवलत देवून ही प्रक्रिया अधिक सुलभ करू शकते़
अवयवदान नांदेडसारख्या प्रत्येक जिल्ह्यातून होवू शकते, परंतु हृदय, यकृत, किडनी प्रत्यारोपण महानगरांशिवाय होत नाही़ नेत्र नांदेडला देता येतात, किडनी औरंगाबादला देता येते, परंतु हृदयासाठी मुंबई, पुण्याकडील रुग्णाचाच शोध घ्यावा लागतो़ शेवटी दाता बनणाऱ्या ग्रामीण भागाला या सेवेचा लाभ कधी मिळणार हाही प्रश्न आहे़ नेहमी शासनकर्ते सुपरस्पेशालिटीची भाषा करतात, परंतु जिल्ह्यांच्या ठिकाणी किडनी प्रत्यारोपणही होत नाही़ रावळकर, मोरे कुटुंबियांनी दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही घेतलेला निर्णय अनेकांची हृदय स्पंदणे प्रेरणेने फुलविणारा आहे़ त्यामुळे यापुढेही दाते निर्माण होतील, यात शंका नाही़ गाऱ्हाणे एकच आहे, मराठवाड्याच्या मातीतील माणसांनाही या उच्च दर्जाच्या सेवांचा लाभ पुढील काळात व्हावा, जिथे दाता आहे तिथेच प्रत्यारोपण करणे शक्य झाले तर मध्यमवर्गालाही हा उपचार परवडू शकेल़ शेवटी या मोहिमेतील उणिवांपेक्षाही दातृत्वाची जाणीव आभाळाएवढी मोठी आहे, हे निश्चित़
- धर्मराज हल्लाळे

Web Title: How will heart travel be handy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.