पुतीन यांचे गायब होणे कैसे दिसे...

By Admin | Updated: March 20, 2015 23:16 IST2015-03-20T23:16:20+5:302015-03-20T23:16:20+5:30

देशाचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय नेत्यांकडे सगळ्या समाजाचे सततच लक्ष असते. कधी नेत्यावरच्या प्रेमापोटी तर कधी नेत्याबद्दल येत असलेल्या शंकांमुळे.

How Putin's disappearance shows ... | पुतीन यांचे गायब होणे कैसे दिसे...

पुतीन यांचे गायब होणे कैसे दिसे...

देशाचे नेतृत्व करणाऱ्या राजकीय नेत्यांकडे सगळ्या समाजाचे सततच लक्ष असते. कधी नेत्यावरच्या प्रेमापोटी तर कधी नेत्याबद्दल येत असलेल्या शंकांमुळे. नेत्यावर सगळ्यांचेच नेहमी बारकाईने लक्ष असते. तशातच जर तो नेता अचानक गायब झाला, लोकाना दिसेनासा झाला आणि त्याच्या गायब होण्याचे कोणतेही सयुक्तिक कारण लोकाना मिळेनासे झाले तर त्याची चर्चा तर होणारच. ती चर्चा फक्त सर्वसाधारण लोकच करतात असे नाही. देश-विदेशातल्या प्रसारमाध्यमांना हा तर तयार मसालेदार विषयच मिळत असतो. मग हा नेता कुठे गेला असावा, कशासाठी गेला असावा याबद्दल उलटसुलट बोलले जाते. कधीकधी त्या नेत्याचे समर्थक त्याची प्रायव्हसी जपण्याची भाषाही करतात. एकूणच एखाद्या नेत्याचे असे अचानक गायब होणे सनसनाटी निर्माण करणारे ठरते. आपल्याकडे अचानक सट्टी घेऊन गायब झालेल्या राहुल गांधींच्याबद्दल मी हे सारे लिहितो आहे असा समज करून घेऊ नका.
अनेक बातम्या पसरल्या, अफवा पसरविल्या गेल्या, लोकांनी टवाळी केली आणि आता दोन आठवड्यानंतर आता ‘ते’ परतले आहेत ! पण मधल्या काळात जगातल्या सर्वच प्रसारमाध्यमांनी पुतीन गायब झाले याची तिखटमीठ लावून खूप चर्चा केली. अजूनही त्याबद्दल चर्चा सुरू आहे.
वॉशिंग्टन पोस्टने ‘पुतीन कुठे आहेत’, असे शीर्षक असणारा अ‍ॅडम टेलर यांचा लेख प्रकाशित केला आहे. पुतीन यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक अफवा उठत आहेत, असे सांगून टेलर त्या लेखात म्हणतात की प्रत्येकालाच थोडीशी विश्रांती घेण्याची इच्छा होऊ शकते, पण जेव्हा अशी व्यक्ती जागतिक पातळीवरची एक महत्त्वाची व्यक्ती असते आणि तिच्या गैरहजेरीचे कोणतेही सयुक्तिक कारण दिले जात नाही, अशा वेळी अफवा उठणे अगदी क्र मप्राप्त असते. मग पुतीन यांच्या गायब होण्याच्या संदर्भात अशाच अफवा उठायला लागल्या. त्यांना कॅन्सर झाला आहे किंवा अगदी ते मरण पावले आहेत, अशाही वावड्या उठल्या. हुकूमशाही व्यवस्थेत अनपेक्षितरीत्या एखादा नेता गायब
झाला तर अशा अफवा नेहमीच उठत असतात असे सांगतानाच मधल्या काळात त्यांची जी छायाचित्रे प्रकाशित झाली आहेत ती जुनी आहेत आणि त्यामुळे गोंधळ वाढलेला आहे असे त्यांनी नमूद केले आहे.
इकॉनॉमिस्ट या नियतकालिकाने या संदर्भात ‘जेव्हा झार दिसेनासा होतो’, अशा शीर्षकाचा एक लेख प्रकाशित केला आहे. त्यात सोळाव्या शतकातला झार चौथा इव्हान असाच अचानक गायब झाला होता, याची कथा देऊन त्या गायब होण्याने त्याचाच कसा लाभ झाला याची मनोरंजक कहाणी दिली आहे. पुतीन यांचे एकेकाळचे सल्लागार आंद्रे इल्लरिओनोव यांनी आपल्या ब्लॉगवर क्रेमलीनमध्ये एखादा कट शिजलेला असावा अशी शक्यता वर्तवली असून, ब्लिक नावाच्या एका स्वीडिश टॅब्लॉईडने यापुढची पायरी गाठली आहे. अलीना काबाईवा या आॅलिंपिकपटू असणाऱ्या जिमनॅस्टशी पुतीन यांचे प्रेमसंबंध आहेत अशी खुलेआम चर्चा आहे. पुतीन यांची ही प्रेयसी स्वित्झर्लंडमधल्या सेंट अ‍ॅना या रुग्णालयात प्रसूत होऊन तिला मुलगी झाली व तिच्या बाळंतपणाच्या काळात तिच्याजवळ राहण्यासाठी पुतीन गायब झाले होते, अशी सनसनाटीची बातमी त्या टॅब्लॉईडने प्रकाशित केली आहे. स्ट्रॅटेजिक फोरकास्टिंग (स्ट्रॅटफॉर) या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या ‘पुतीन यांच्या गायब होण्याबद्दलचे प्रश्न’, या शीर्षकाच्या लेखात त्यांच्या विरोधात एखादा कट शिजलेला असावा, अशा शक्यतेची चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या गायब होण्याचा संबंध चेचन्याच्या समस्येशी आणि विरोधी नेते बोरिस नेमत्सोव्ह यांच्या हत्त्येशी जोडण्याचा प्रयत्नही केलेला पाहायला मिळतो.
तब्बल दहा दिवस लुप्त असलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन अखेर पुन्हा अवतरले. पण ते का गायब झाले होते आणि या काळात ते कुठे होते, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. कुजबुज वा चर्चा होत नसेल तर आयुष्यात मौज नाही, असे मोघम उडते उत्तर देऊन त्यांनी विषय कसा बाजूला सारला, याचा वृत्तांत रॉयटरने दिला आहे.
त्यांच्या गायब होण्यामागचे गूढ स्पष्ट होईल अथवा नाही. मात्र, त्यांचा हा सस्पेन्स ड्रामा देशात वादग्रस्त आणि चिंताजनक स्थिती असताना घडलेला आहे, असे सांगून मॉस्को टाइम्समधल्या आपल्या वार्तापत्रात जोर्गी बोव्त यांनी लिहिले आहे की, यापूर्वीही काहीवेळा पुतीन असेच गायब झाले होते. पण या वेळी त्याबद्दल बरीच जास्त चर्चा झाली. पुतीन यांचा कोणीही राजकीय वारस नाही. त्यामुळे त्यांचे गायब होणे चर्चेचा विषय ठरते. आपल्या वार्तापत्रात जोर्गी बोव्त लिहितात की, आजवर क्रेमलीनमध्ये आलेली अनेक संकटे किंवा अनेक राज्यक्रांत्या व झालेले सत्ताबदल कोणतीही पूर्वसूचना न देता झाले आहेत. त्यामुळेच पुतीन यांचे गायब होणे लक्षवेधी ठरले होते.
- प्रा़ दिलीप फडके

Web Title: How Putin's disappearance shows ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.