किती चौकशा?
By Admin | Updated: July 9, 2016 03:09 IST2016-07-09T03:09:07+5:302016-07-09T03:09:07+5:30
बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका उपाहारगृहात गेल्या सप्ताहात ज्या सहा आततायी तरुणांनी अतिरेकी हल्ला करुन २८जणांची हत्त्या केली, त्या सहापैकी दोघानी त्यांच्यावर

किती चौकशा?
बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका उपाहारगृहात गेल्या सप्ताहात ज्या सहा आततायी तरुणांनी अतिरेकी हल्ला करुन २८जणांची हत्त्या केली, त्या सहापैकी दोघानी त्यांच्यावर डॉ.झाकीर नाईक यांच्या प्रवचनांचा प्रभाव असल्याचे सांगितल्यावरुन आता भारत सरकारने नाईक यांच्या भाषणांची आणि प्रवचनांची चौकशी सुरु केली आहे. पण कोणत्या व कोणकोणत्या भाषणांची चौकशी करणार हा प्रश्नच आहे. त्यातल्या त्यात जहाल आणि धर्माधर्मात तेढ उत्पन्न होईल अशी भाषणे हुडकून कदाचित नाईक यांच्यावर संपूर्ण देशातच भाषणबंदी लागूही केली जाईल पण त्यातून काय निष्पन्न होणार? डॉ.झाकीर नाईक यांची अनेक भाषणे आणि सवाल-जबाब यू ट्यूबवर आजही उपलब्ध आहेत व ती तशीच राहाणार आहेत. त्यांची पारायणे करणारे लोकही आहेत. परिणामी कॅनडा आणि इंग्लंडप्रमाणे उद्या भारतातही त्यांच्यावर भाषणबंदी लागू केली तर नाईक आणि त्यांच्या चाहत्यांवर काही फरक पडेल असे समजणे वास्तवाला सोडून होईल. शिक्षणाने वैद्यकीय पदवीधर असलेल्या नाईक यांची ‘पीस’ नावाची एक स्वतंत्र खासगी वाहिनी आहे पण तिच्यावरुन ते ‘पीस’ म्हणजे शांततेची शिकवण देण्याऐवजी तेढ निर्माण करणारी शिकवण देतात असा त्यांच्यावर वहीम आहे. मुंबईतील डोंगरी भागात त्यांनी १९९१सालीच इस्लामीक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेची स्थापना केली असून तिच्यामार्फत ते इस्लामचा प्रचर करतात. पण विलक्षण बाब म्हणजे मुंबई आणि देशतील इस्लाम धर्मातील शिया आणि सुन्नी या दोन्ही पंथातील धर्मगुरु नाईक यांना इस्लामविरोधी मानतात तर नाईक यांचे चाहते या दोन्ही पंथातील धर्मगुरुंवर टीका करतात. खुद्द नाईक इसिस या संघटनेला इस्लामविरोधी मानतात. सामान्यत: मूलतत्त्ववादी हिन्दू आणि मुस्लिम परस्परांच्या धर्मावर टीका करतात पण डॉ.नाईक मात्र इस्लामखेरीज अन्य कोणत्याही धर्माला जगात अस्तित्वच नाही अशी मांडणी करतात व त्यामुळेच त्यांच्यावर बंदी लागू करण्यासाठी काही देश पुढे आले आहेत. ते आपल्या प्रवचनांमधून बायबल आणि हिन्दू धर्मग्रंथांबरोबरच बौद्ध, जैन आदि धर्मातील काही दाखले देत असतात पण तो एकूण प्रकार श्रोत्यांना ‘मेस्मराईज’ म्हणजे मंत्रमुग्ध करणारा असतो. साहजिकच ज्यांचा या कोणत्याही धर्माच्या तत्वज्ञानाशी परिचय नसतो, ते चटकन प्रभावाखाली येतात. सध्या ते परदेश दौऱ्यावर असून पुढील सप्ताहात परतल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा त्यांची चौकशी करणार आहे. ढाक्यात अतिरेकी हल्ला केलेल्या तरुणांनी त्यांच्यावर आपल्या विचारसरणीचा प्रभाव असल्याचे जरी म्हटले असले तरी आपण हत्त्या करण्यासाठी कोणालाही प्रवृत्त करीत नाही असे नाईक यांचे म्हणणे आहे. तथापि जेव्हां जगाच्या पाठीवर इस्लामखेरीज अन्य कोणत्याही धर्माला अस्तित्वच नाही असे म्हटले जाते तेव्हां त्याचा अविवेकी आणि अविचारी तरुणांवर जो परिणाम घडून येऊ शकतो त्याची जबाबदारी मात्र झाकीर नाईक स्वीकारु इच्छित नाहीत. नाईक यांच्या वाहिनीवर संपुआ सरकारने बंदी लागू केली असता ती मोदी सरकारने का उठवली असा प्रश्न आता काँग्रेसने या संदर्भात विचारला आहे.