साहित्यिकांच्या पाठीचा कणा लवचीक कसा?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 01:26 AM2021-03-13T01:26:32+5:302021-03-13T01:27:20+5:30

अस्वस्थ काळाचे वर्तमान

How flexible is the backbone of a writer? | साहित्यिकांच्या पाठीचा कणा लवचीक कसा?

साहित्यिकांच्या पाठीचा कणा लवचीक कसा?

googlenewsNext

छोट्या वर्तुळात लेखकाला मान असतो; पण समाजात प्रतिष्ठा लाभतेच असं नाही. ही वाङ‌्मयीन अनास्था का? - याचं उत्तर आपल्या संस्कृतीमध्ये सापडेल!

डॉ. सुधीर रसाळ ( ज्येष्ठ समीक्षक)

संस्कृतीतून कलेची सामग्री मिळते असं तुम्ही म्हणता, ते कसं?
जगातल्या कुठल्याही भाषेचं वाङ‌्मय हे त्यांच्या संस्कृतीच्या सामग्रीतूनच निर्माण होतं. लेखक, कवी, कलावंताचं व्यक्तिमत्त्व त्या पुंजीतून घडतं. त्याची संवेदनशीलता, अनुभव घेण्याची पद्धत, त्याची मूल्यव्यवस्था, अनुभवांचा अर्थ लावण्याची पद्धत संस्कृतीनं त्याला दिलेली असते. संस्कृती टाळून कुणीही लिहू शकत नाही अन्यथा नकली व कृत्रिम उपज येते. ब्रिटिश राजवटीमध्ये एक समज निर्माण झाला की ‘आपल्यापेक्षा पाश्‍चात्त्य वाङ‌्मय हे अधिकच श्रेष्ठ आहे आणि  त्यांच्याबरोबरीनं यायचं तर त्यांच्या संवेदनशीलतेतून अनुभव घेतले पाहिजेत. त्यांच्या कवितेमध्ये, साहित्यामध्ये ज्या जाणिवा व्यक्त होतात त्या आपण आपल्या केल्या पाहिजेत. त्यांचं तत्त्वज्ञान स्वीकारून आपण जीवनाचा विचार केला पाहिजे.’ - यातून अस्तित्ववाद, आधुनिकतावाद, उत्तरआधुनिकतावाद, जादुई वास्तववाद अशी उचलेगिरी आपण करत आलो. मुळात हे समजून घ्यायला हवं की त्यांच्या ज्या वाङ‌्मयीन भूमिका असतात त्या त्यांच्या संस्कृतीनं घडवलेल्या असतात. त्यांच्याभवतीचा समाज, त्याचं स्वरूप यातून त्या तयार होतात. त्यांचा समाज आणि संस्कृती व आपला समाज आणि संस्कृती यात महदंतर आहे. त्या जाणिवांनी आपले अनुभव व वास्तव परिपूर्ण अर्थपूर्ण करता येत नाही. म्हणून आपल्या वाङ‌्मयात एक उपरेपण राहातं. अशा वाङ‌्मयाचा वाचकवर्ग अपुरा व शहरी आहे. खेडोपाड्यातून पदवीधर झालेल्यांना, साहित्यावर प्रेम करणाऱ्यांना या वाङ‌्मयात कसलंही आकर्षण वाटत नाही. आज ग्रामीण भागातून अस्सल जाणिवांसह जो नवा लेखकवर्ग येऊ लागलाय त्यांतून मला आशा वाटते. इथं वाङ्मयाला नवं वळण मिळेल असं वाटतं. एकीकडे स्वदेशी चळवळीत टिळकांचे सहकारी असणारे खाडिलकर नाटकात मात्र शेक्सपिअर आणतात, असं आपलं वाङ्मयीन वास्तव. एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांनी रुजवलेल्या न्यूनगंडातून बाहेर येऊन आपली माती आपल्याला निरखावी लागेल.

श्रद्धा नि मूल्य यांची स्पष्टता न राहिल्यामुळं माणसांचा गोंधळ उडतोय असं वाटतं का?
श्रद्धा व मूल्यं या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. मूल्य ही गोष्ट वस्तुनिष्ठ आहे. ती सर्वांना समान आहे. श्रद्धा ही वैयक्तिक बाब आहे. श्रद्धा मूल्यात्मक असेल असं नाही.  मूल्य ही गोष्ट माणूस डोळसपणे स्वीकारतो, त्यात श्रद्धेचा भाग येत नाही. एकतर माणसाचं जीवन श्रद्धेनं नियंत्रित होईल किंवा मूल्यांनी. ते मूल्यांनी नियंत्रित व्हावं असं आधुनिक काळात आपण म्हणतो. धर्मामध्ये एक मूल्यसरणी आहे, तिच्यामध्ये अनेक श्रद्धाही येतात. सामान्यपणे मूल्यसरणी विसरून माणसं श्रद्धेकडे जातात. ‘तू तुझं कर्म करत राहा, फलाची अपेक्षा बाळगू नकोस’ असं गीतेनं सांगितलं. गीतेसारखा ग्रंथ मूल्यसरणी देतो. मात्र “गीतेचा बारावा व पंधरावा अध्याय रोज सकाळी एकदा म्हणा, पुण्य लाभतं,” हे जे आहे ती श्रद्धा. आचरणापेक्षा पुण्य मिळवण्याचं आकर्षण मोठं होतं. असे फरक आपण आपल्या वर्तनातून तपासायला हवेत. जगभरच्या धर्मांमध्ये हे घडताना दिसतं.  मी श्रद्धा नि अंधश्रद्धा यात फरक करत नाही. माझ्या मते बुद्धीच्या आधारे एखाद्या गोष्टीचं सत्यत्व न पारखता ती स्वीकारणं म्हणजे श्रद्धा.

लेखक जन्मावा लागतो, समीक्षक घडवावा लागतो असंही तुम्ही म्हणता?
कुठलाही ज्ञानव्यवहार मनुष्य आत्मसात करू शकतो, अट एकच- त्याला त्यात रस हवा. तुम्ही जगत असताना विशिष्ट ज्ञानक्षेत्राशी जोडले जाता. शिक्षण घेताना हे घडतं. इतिहास, वाङ्मय, गणित आवडतं, तुम्ही हळूहळू स्वत:हून अभ्यास करायला लागता, अधिकचं वाचन करत राहाता.  लेखक, कवी नि कलावंत यांची प्रतिभा ही दैवी देणगी म्हणेन मी, त्यामुळं ते जन्मावेच लागतात. समीक्षेबाबतीत वाङ्मय व संबंधित कलाप्रकार कळण्याची तुमची अभिरुची तुम्हाला घडवावी लागले. डोळसपणे वाचन करण्याची सवय जडवून घ्यावी लागते. कुठल्याही ज्ञानव्यवहाराबाबतीत हेच खरं.

साहित्यिकांमध्ये पाठीचे कणे दुर्मीळ होण्याची काय कारणं असावीत?
या प्रश्‍नाचा एकूण संबंध भारतीय परिस्थितीतल्या ‘अर्था’शी जोडावा, असं मला वाटतं. आपल्याकडच्या साहित्यिकांना साहित्यावर जगताच येत नाही. लेखक सामान्यपणे शहरी मध्यमवर्गातून आलेले, ते  फार सधन सुखवस्तू असणं अपवादात्मक. त्यामुळं धनप्राप्तीसाठी ते कुठंतरी नमतं घेतात, काही गोष्टी करून जातात. एकूण समाजात लेखनाला गौण स्थान देणारी परिस्थिती आहे. सर्वसामान्य माणसाच्या अग्रक्रमात तर वाङ्मय खालून पहिलं असेल. छोट्या वर्तुळात लेखकाला मान असतो; पण समाजात प्रतिष्ठा लाभतेच असं नाही. पाश्‍चात्त्य शहरांत, गावांत लेखकांचे मोठेमोठे पुतळे दिसतात; कारण त्यांना ते मानचिन्ह वाटतं. आपल्याकडे केशवसुतांचं स्मारक कसंबसं तयार होऊ शकलं; पण मर्ढेकर नि कोलटकरांबाबतीत संबंधित शहरांत काय दिसतं? काम ठप्प! अशा वातावरणात लेखक, कवी पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करतात असं कानावर येतं; पण, हे दुर्दैव आपल्याकडच्या वाङ्मयीन अनास्थेमुळं आहे. ती का? याचं उत्तर स्वत:च्या संस्कृतीकडं पाहाण्यातून येईल! 

मुलाखत : सोनाली नवांगुळ  

Web Title: How flexible is the backbone of a writer?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.