संथारा (सल्लेखणा) ही आत्महत्त्या कशी?

By Admin | Updated: September 12, 2015 03:40 IST2015-09-12T03:40:31+5:302015-09-12T03:40:31+5:30

संथारा (सल्लेखणा) म्हणजे काय, हे समजल्याशिवाय ती आत्महत्त्या आहे, असे विधान करणे म्हणजे त्याविषयीचे अज्ञान प्रकट केल्यासारखच आहे. मृत्यू हा कितीही वाईट असला तरी तो

How does suicide (literary) be suicide? | संथारा (सल्लेखणा) ही आत्महत्त्या कशी?

संथारा (सल्लेखणा) ही आत्महत्त्या कशी?

- रविन्द्रकुमार बानाईत (जैन), नागपूर

संथारा (सल्लेखणा) म्हणजे काय, हे समजल्याशिवाय ती आत्महत्त्या आहे, असे विधान करणे म्हणजे त्याविषयीचे अज्ञान प्रकट केल्यासारखच आहे. मृत्यू हा कितीही वाईट असला तरी तो कोणालाच चुकलेला नाही व चुकणारही नाही. त्यामुळे संथारा कशी घेतली जाते याचा शोध घेणे आवश्यक आहे.
जैन धर्मात श्रावकाला बारा व्रते पाळण्याचा उपदेश आहे. परंतु त्या व्रताचे शिखर म्हणजे संथारा होय. त्याशिवाय मुनिधर्माची किंवा श्रावक धर्माची पूर्तता होत नाही. सल्लेखणा यात दोन शब्द आहे. सत्+लेखणा अर्थात विधिपूर्वक शरीर व कषायाचा त्याग करणे आहे.
आदरणीय समंतभद्राचार्यांनी रत्नकरंड श्रावकाचार या ग्रंथात म्हटले आहे की,
उपसर्गे दुर्भिक्षे जरसि सजायांच निष्प्रतिकारे !
धर्माय तनुविमोचन माहु: सल्लेखन मार्या:!!
धर्माकरिता शरीराचा त्याग करताना त्याची योग्य वेळ पाहावी लागते. ज्या वेळी उपसर्गापासून बचाव होत नाही, ज्यावर उपायाची मात्रा चालत नाही असे म्हातारपण किंवा रोगी असेल त्यांनाच समाधिमरण साधण्याकरिता योग्य वेळ सांगितली आहे. शरीराच्या त्यागापेक्षा कषायाचा त्याग हा त्यामागील खरा उद्देश असतो. त्यामुळे मानसिक तयारी करण्याचे समाधी साधकाचे आद्य कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे परिजनाविषयी आसक्ती, शत्रूबाबत वैर, परिगृहावरील मोह सोडून मनाची शुद्धता करणे अनिवार्य आहे. परंतु आज या पवित्र क्रियेला आत्महत्त्या म्हटले जाते, हीच खरी शोकांतिका आहे. वास्तविक पाहता प्रत्येक व्यक्ती नित्य मरणाचा अनुभव घेत असते. प्रत्येकाचे आयुष्य प्रतिपळ कमी कमी होत असते. यालाच नित्यमरण म्हटले जाते. तसेच अंतसमयी तद्भव मरणापूर्वी सल्लेखणा स्वीकारून वीरमरण साधावे हेच श्रेयस्कर ठरते.
संथारा व आत्महत्त्या यात महदंतर आहे.
सल्लेखणेत जीवन-मरणाची इच्छा नसते. तसेच ती स्वीकारताना अनुमती घेतली जाते. त्यात आशा, निराशा नसते. शांती व विवेक असतो. मनावर ताबा मिळवून सल्लेखणा करण्यात येते. याउलट आत्महत्त्येत मरणाची इच्छा असते. ती विनाअनुमती केली जाते. जैन संप्रदायात एखाद्या कुटुंबात आत्महत्त्या झाली तर सहा महिन्यांचे सुतक असते.
संथारास आत्महत्त्या मानले तर पुढील प्रश्न उपस्थित होतात. व्यसन मृत्यूला आमंत्रण असते, हे सर्वांना माहीत आहे. परंतु व्यसनी व्यक्तीला आत्महत्त्येचा अपराधी का मानीत नाहीत? एकदा भूकंप झाल्यावर एका मातेने आपल्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकून मृत्यूच्या मुखात प्रवेश करून आपल्या मुलाला वाचविले, मात्र तिचा प्राण त्यात जातो. त्यामुळे त्या मातेने आत्महत्त्या केली असे म्हणावे काय?
आचार्य विनोबांनी अंतसमयी विवेकपूर्ण अन्न आहाराचा त्याग केला होता. त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी आचार्य विनोबांना विनंती केली, आपली गरज देशाला आहे. त्यामुळे आपण आहार सुरू करावा. परंतु विनोबांनी दिलेले उत्तर मार्मिक होते. आता वेळ संपत आहे. माझा संवाद परमात्म्याशी सुरू आहे. त्यांनी विवेकपूर्ण निर्णय घेतला होता, असेच म्हणावे लागेल.
जैन आगमात मुलाचार, सर्वार्थसिद्धी, रत्नकरंड श्रावकाचार, भगवती आराधना इत्यादी ग्रंथात सल्लेखणेचे महत्त्व विषद केले आहे. संथारा व्रताचे पालन प्राचीन काळापासून सुरू आहे. सम्राट चंद्रगुप्ताने श्रवणबेळगोळ येथे सल्लेखणा (संथारा) घेतल्याचा उल्लेख शिलालेखात आढळून येतो.
जैन धर्माचा आधार साधना आहे. साधनेशिवाय सिद्धी नाही. अचानक मृत्यू आल्यास चांगल्या मृत्यूपासून मनुष्य वंंचित होतो. परंतु जिवंत असलेल्यांनी योग्य वेळी सल्लेखणा (संथारा) प्राप्त करणे सर्वश्रेष्ठ आहे. जीवनभर व्रत, तप केले पण सल्लेखणा (संथारा) साधता आली नाही तर सर्व व्यर्थ आहे. भारतीय परंपरेत स्वेच्छेला स्थान आहे व त्यातच जीवनाची धन्यता आहे, हे विसरता येत नाही.
राजस्थान उच्च न्यायालयाने सल्लेखणा (संथारा) यास आत्महत्त्येचे रूप म्हटले आहे. त्यामुळे सर्वच जैन बांधवांवर आघात झाल्याचे दिसून आले आहे. याचा निषेध म्हणून २४ आॅगस्ट २0१५ ला सर्व भारतभर मौन मोर्चाचे आयोजन झाले. जवळजवळ ५0 लाख लोकांनी मौन मोर्चात सहभाग घेतला. आता सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाचा निवाडा स्थागित ठेवला आहे. त्याचा अंतिम निर्णय येईल तेव्हां येईल. पण सरकारने यात मध्यस्थी करुन संथारासारख्या अत्यंत पवित्र व्रताचे पावित्र्य अबाधित ठेवावे, अशी जैन धर्मियांची प्रार्थना आहे.
थोडक्यात जोपर्यंत शरीर कार्यक्षम आहे तोपर्यंत उत्तम चारित्र्य धारण करावे, शरीर दुर्बल झाल्यास सल्लेखणा (संथारा) साधावा. या वेळी जिवंत राहण्याची इच्छा करणे, मरण्याची इच्छा करणे, आप्तावर प्रीती करणे, भोगलेल्या सुखाचे स्मरण करणे वर्ज्य आहे. संयमपूर्वक कषायांना कृश करणे ही एकमात्र क्रिया सुरू असते. यालाच समाधीमरण म्हणतात. या क्रियेला आत्महत्त्या म्हणणे चूक आहे असे स्पष्ट होते.

 

Web Title: How does suicide (literary) be suicide?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.