सन्माननीय स्मारक

By Admin | Updated: July 12, 2014 10:46 IST2014-07-12T10:46:23+5:302014-07-12T10:46:55+5:30

इंग्लंडच्या पार्लमेंटसमोरील चौकात म. गांधींचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्या देशाचे चॅन्सेलर ऑफ एक्सचेकर (अर्थमंत्री) जॉर्ज ओस्बोर्न यांनी आपल्या भारतभेटीत परवा केली.

Honorable monument | सन्माननीय स्मारक

सन्माननीय स्मारक

>इंग्लंडच्या पार्लमेंटसमोरील चौकात म. गांधींचा पुतळा उभारण्यात येणार असल्याची घोषणा त्या देशाचे चॅन्सेलर ऑफ एक्सचेकर (अर्थमंत्री) जॉर्ज ओस्बोर्न यांनी आपल्या भारतभेटीत परवा केली. या चौकाच्या पुढील भागात इंग्लंडच्या राणीचे वास्तव्य असलेला वेस्ट मिन्स्टर पॅलेस असून या चौकात विन्स्टन चर्चिल यांचाही पुतळा उभा आहे. म. गांधींनी भारतातील इंग्रजांचे राज्य जावे व हा देश स्वतंत्र व्हावा म्हणून इंग्लंडशी ३२ वर्षे अहिंसक झुंज दिली. त्या आधी द. आफ्रिकेतील आपल्या २१ वर्षांच्या आयुष्यात तेथील ब्रिटिश राजवटीशीही त्यांनी तेवढाच उग्र पण नि:शस्त्र लढा दिला. गांधीजींच्या संघर्षात जशी हिंसा नव्हती तसे वैरही नव्हते. माझा लढा इंग्रज सत्तेशी आहे, इंग्रजी माणसांशी नाही, हे ते नेहमी म्हणत. त्यांच्या लढय़ाने इंग्रजांचे भारतावरील राज्यच केवळ संपविले नाही. त्या लढय़ापासून प्रेरणा घेतलेली अनेक राष्ट्रे नंतर स्वतंत्र झाली आणि ज्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नव्हता ते ब्रिटिश साम्राज्य पार संकोचून लहानसे झाले. गांधीजींना ‘अर्धनग्न फकीर’ म्हणून हिणविणारे आणि त्यांचा आयुष्यभर राग धरणारे विन्स्टन चर्चिल हे त्या देशाच्या नाविक दलाचे मंत्री असताना तेव्हा द. आफ्रिकेचे हाय कमिशनर असलेल्या जनरल स्मट्स यांना म्हणाले, ‘हा गांधी तुमच्या तुरुंगात असताना त्याला तुम्ही मारला असता तर आपले साम्राज्य आणखी काही दशके या जगावर राहिले असते,’ तेवढय़ावर न थांबता गांधीजी हे त्यांच्या अनेक उपवासांपैकी एखाद्या उपवासात आपली जीवनयात्रा संपवतील, अशीही आशा चर्चिल यांनी बाळगली होती. दुसरे महायुद्ध जिंकून दाखविणार्‍या व हिटलरचा पराभव करणार्‍या चर्चिल या महापराक्रमी माणसाने गांधी या नि:शस्त्र माणसाची केवढी धास्ती घेतली होती, हे यावरून लक्षात यावे. ऑर्थर हर्मन यांनी लिहिलेल्या ‘गांधी अँन्ड चर्चिल’ या अभ्यासपूर्ण ग्रंथात गांधीजींचे सार्मथ्य चर्चिलएवढे दुसर्‍या कोणीही ओळखले नव्हते, असे म्हटले आहे. आता इंग्लंडच्या पार्लमेंटसमोरील चौकात चर्चिलच्या शेजारी चर्चिल यांचाच देश गांधीजींचा पुतळा उभारणार असेल तर त्याएवढा मोठा गांधीजींच्या थोरवीला मिळालेला सन्मान व न्याय दुसरा असणार नाही, ही बाब इंग्लंडच्या राजकीय थोरवीचा पुरावा ठरावी, अशीही आहे. गांधीजी आयुष्यभर इंग्लंडच्या राजवटीविरुद्ध लढले आणि ती त्यांनी संपविली. आपली सत्ता घालविणार्‍या व एकेकाळी आपणच ‘दहशतवादी व वैरी’ ठरविलेल्या माणसाचे महात्म्य ओळखण्याएवढी थोर मानसिकता त्या देशात आहे, याचेही ते प्रतीक आहे. गांधीजींचा इंग्लंडच्या पार्लमेंटसमोर पुतळा उभा होणे, ही घटना मोठय़ा उंचीची व भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांचा सन्मान वाढविणारी आहे. इंग्लंडशी राजकीय वैर राखणे; पण इंग्रज माणसाशी मैत्री कायम ठेवणे, या गांधीजींच्या धोरणाचा परिणाम हा, की भारत स्वतंत्र झाल्यानंतरही त्याचे इंग्लंडशी मैत्रीचे संबंध कायम राहिले. भारताने राष्ट्रकुलाचे सदस्यत्वही कायम टिकविले. परिणामी भारत आणि इंग्लंड यांचे राजकीय व आर्थिक संबंध दिवसेंदिवस दृढ होत गेले व आजही ते कमालीचे निकटवर्ती आहेत. एखाद्या देशाने आपल्या मित्र देशाच्या नेत्याचा पुतळा वा स्मारक उभारल्याची अनेक उदाहरणे आहेत. सार्‍या अमेरिकेत तिच्या मित्र राष्ट्रांच्या नेत्यांची स्मारके आहेत. रशियातही त्या देशाचे मित्र असणार्‍या राष्ट्रनेत्यांचे पुतळे जागोजागी उभे आहेत. सगळ्या सुसंस्कृत व प्रगत राष्ट्रांची मानसिकताही अशीच आहे. मात्र, इंग्लंडचे वेगळेपण याहून वेगळे आणि अधिक वरच्या दर्जाचे आहे. गांधी इंग्लंडचे मित्र नव्हते. ते भारताच्या स्वातंत्र्यलढय़ाचे सर्वोच्च सेनापती म्हणून इंग्लंडविरुद्ध लढा देत होते. एका अर्थाने नि:शस्त्र व अहिंसक असले तरी गांधी हे इंग्लंडच्या राजवटीचे शत्रूच होते. आपल्या देशाशी व त्याच्या राजकीय हुकूमतीशी लढत देणार्‍या शत्रूचे स्मारक आपल्या येथे सन्मानपूर्वक उभे करावे, ही घटनाच सार्‍या सुसंस्कृत जगाला नम्र व अंतर्मुख करणारी आहे. अर्थात, हा सन्मान वाट्याला यायला माणूस गांधीजींसारखा महात्माच असावा लागतो. गांधीजींचा जन्मदिवस आता जगभर ‘शांती दिन’ म्हणून पाळला जातो आणि तशी मान्यता त्याला संयुक्त राष्ट्र संघटनेने दिली आहे. गांधीजींच्या विचारांची, भूमिकांची व मूल्यांची कदर सारे जग अशा तर्‍हेने करीत असताना त्यांची भारतातही नव्याने व जोमाने उजळणी होणे आवश्यक आहे. अखेर महात्मे वारंवार जन्म घेत नाहीत. गांधी या देशात जन्मले, हे या देशाचे महत्भाग्य आहे. 

Web Title: Honorable monument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.