जगाची सुटका हिलरी क्लिंटन यांच्या विजयाहाती!
By Admin | Updated: November 8, 2016 03:59 IST2016-11-08T03:59:31+5:302016-11-08T03:59:31+5:30
थोड्याच वेळात अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल हाती येईल. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले तर केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगच बदलून जाईल

जगाची सुटका हिलरी क्लिंटन यांच्या विजयाहाती!
हरिष गुप्ता, (‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर )
थोड्याच वेळात अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल हाती येईल. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले तर केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगच बदलून जाईल. आजवर कधीही जाणवला नाही एवढा प्रभाव यंदाच्या निवडणुकीने संपूर्ण जगावर निर्माण केला आहे. ‘अमेरिकेला पुन्हा महान बनवू’ या पालुपदासह ट्रम्प यांनी त्यांचा प्रचार केला. या पालुपदात एक भयंकर गंभीर धोरण लपलेले आहे. हे धोरण मुस्लीमांना अमेरिकेत प्रवेशबंदी लागू करणारे आहे, स्थलांतर रोखण्यासाठी मेक्सिकोच्या सीमा बंद करणारे आहे आणि ज्यांना आजवर मोफत अमेरिकेचे संरक्षण लाभले, त्यांच्याकडून या संरक्षणाची किंमत मागणारेही आहे.
भारताच्या संदर्भात बोलायचे तर जेव्हां जेव्हां ट्रम्प यांना भारतीयांकडून निवडणूक निधी मिळाला, तेव्हांच ते भारताविषयी बरे बोलले आहेत. अशाच एका कार्यक्रमात त्यांनी स्वत:स भारताचा मोठा चाहता म्हणून घोषित करुन घेतले होते. पण ट्रम्प दोन तोंडाने बोलतात, हे एव्हाना जगाने ओळखले आहे. त्यामुळे ते मधूनच भारताची प्रशंसा करतात आणि त्याच वेळी भारतीय बाजारपेठेला आशादायी न म्हणता बुचकळ्यात टाकणारी बाजारपेठ म्हणून मोकळे होतात. भारत आणि चीन हे दोन्ही देश अन्य काही राष्ट्रांच्या जोडीने अमेरिकेतील रोजगार हिरावून घेत असल्याबद्दल ते दु:ख आणि संतापही व्यक्त करतात. भारत अमेरिकेकडून आपला फायदा करून घेत असतानाच अमेरिकेचा तेजोभंग करीत असल्याने भारत हे अमेरिकेसाठी आव्हान आहे, असेही ते म्हणून जातात. समोरच्या व्यक्तीवर प्रसंगी बेभान टीका करायची आणि प्रसंगी तिची बेफाट प्रशंसाही करायची, हा ट्रम्प यांचा स्वभावच आहे. एकदा तर त्यांनी जाहीरपणे भारतीय कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांची नक्कल केली आणि दुसऱ्याच क्षणी भारत हे महान राष्ट्र आहे आणि म्हणून तिथे मोठा रोजगार जात आहे, असेही म्हटले.
पण ट्रम्प केवळ भारत-चीन आणि तत्सम देशांवरच टीका करीत आले, असे नाही. त्यांनी मध्य अमेरिकेतील अल्प-शिक्षित श्वेतवर्णीयांनाही सोडले नाही. याचा अर्थ ट्रम्प यांच्याकडे कुठलेही ठोस धोरण असो किंवा नसो, ते श्रोत्यांना व देणगीदारांना खुश ठेवत आले आहेत. अर्थात हे सारे बाजूला ठेवले तरी ट्रम्प यांच्याकडे भावी काळात करायच्या कामांची एक भलीमोठी यादी तयार आहे आणि या यादीतील काही कामांमध्ये संपूर्ण जागतिक व्यवस्थेला हादरे देण्याची क्षमता आहे.
ट्रम्प यांचे आर्थिक धोरण जरी संपूर्ण जगासाठी आणि भारतासाठी निराशाजनक असले तरी अमेरिकेसाठी मात्र ते फायद्याचे आहे. त्यांना अमेरिकेतील सध्याचा कॉर्पोरेशन कर ३५ टक्क्यांवरून १५ टक्क्यांवर आणायचा आहे. जर प्रत्यक्षात तसे घडले तर गेल्या अर्ध्या शतकापासून अमेरिकेतील उद्योगांनी चोखाळलेल्या जागतिकीकरणाच्या वाटेतील तो एक अभूतपूर्व पण सुखद धक्का असेल. करांचा भार मोठा असल्यामुळेच आजवर अमेरिकन उद्योगांनी सीमा ओलांडत स्वस्तातले मजूर आणि निकटच्या विदेशी बाजारपेठा शोधल्या आहेत. फोर्ड मोटार इंडिया हे त्याचे उत्तम उदाहरण. भारताने फोर्डला जरी अल्प करलाभ दिला असला तरी फोर्डला भारतात स्वस्त दरात मनुष्यबळ मिळाले आणि भारत तसेच संपूर्ण आशिया खंडात भक्कम बाजारपेठ मिळाली. फोर्डची ६७ टक्के वाहने चेन्नई येथील प्रकल्पात तयार होतात व तेथूनच निर्यातही केली जातात. जर अमेरिकेतील करच कमी झाले तर फोर्ड आणि अन्य कंपन्यांना परत जाण्यापासून थांबवणे अवघड जाईल व त्याचा गंभीर परिणाम भारतातील रोजगारावर, विदेशी चलन प्राप्तीवर आणि ग्राहक मूल्यावर होईल. करकपातीचा परिणाम अमेरिकेतील बड्या रसायन तसेच औषधनिर्माण कंपन्या आणि दूरसंचार व सॉफ्टवेअर कंपन्यांवर होऊन, त्यांचे भारतातील काम थांबवले जाईल. ही सर्व प्रक्रिया भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमास अपशकून करणारी तर ठरेलच शिवाय नव्याने औद्योगिक प्रगती करु लागलेल्या राष्ट्रांसाठी ती औद्योगिक ऱ्हासाची पूर्वसूचना असेल.
ट्रम्प दीर्घकाळापासून चीनकडे बोट दाखवून त्या देशाने अमेरिकेचे चलन नियंत्रित केल्याचा आरोप करीत आहेत. चीनवर त्यांचे इतरही काही खरे-खोटे आरोप असल्याने उभय देशांदरम्यानच्या व्यापारास मागील वर्षी तब्बल ३६५ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. लाच देण्याचा प्रयत्न करणे, व्यापारविषयक गुपिते चोरणे, आयातीत मालावर मोठे कर लावणे असेही काही आरोप त्यांनी चीनवर केले आहेत. याचा कदाचित भारताला लाभ होऊ शकतो. अमेरिकेच्या बाजारपेठेतील चीनची जागा मिळवण्याची भारताच्या दृष्टीने ही नामी संधी आहे. विशेषत: संगणक, दूरसंचार साहित्य, औषधनिर्माण आणि वस्त्रनिर्मिती क्षेत्रात ही संधी मिळू शकते. चीनमधील मोठे औद्योगिक केंद्र समजल्या जाणाऱ्या शेंझेनचे स्थान हैदराबादने रातोरात मिळवायचे तर त्यासाठी चीनवर रुष्ट असलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षाची गरज नसून त्यासाठी दृढ निश्चयाची गरज आहे आणि भारत नेमका येथेच कमी पडत आहे.
ट्रम्प सातत्याने स्थलांतरणाविरोधी जी भूमिका मांडीत आहेत, ती मात्र भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी चांगली नाही. या क्षेत्रातील अनेक भारतीय कंपन्या तुलनेने अल्प-वेतनावरच्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत पाठवत असतात. या माध्यमातून भारताला १०० अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळत असते. आजच्या घडीला तीस लाखांहून अधिक भारतीय अमेरिकेत काम करीत आहेत.
ट्रम्प यांनी मुस्लीम समाज आणि दहशतवादी यांच्यात भेद केलेला नाही. दहशतवादविरोधी लढ्यासाठी त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्यापुढे मदतीचा हात धरला आहे. ही बाब पाकिस्तानला अस्वस्थ करणारी नसेल. कारण एकाच वेळी दहशतवाद्यांसोबत राहायचे आणि अमेरिकेची मर्जाीदेखील सांभाळायची याचे कौशल्य पाकला प्राप्त झाले आहे. पाकची केवळ एकच अडचण आहे. ती म्हणजे आपण अल-कायदाशी लढत आहोत असा दावा करणे पाकला अवघड आहे.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या नव्या अध्यक्ष म्हणून हिलरी क्लिंटन विजयी झाल्या तर तो संपूर्ण जगाच्या दृष्टीने सुटकेचा नि:श्वास असेल!