शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खिदमतगार!

By admin | Updated: December 29, 2015 02:39 IST

हुजरेगिरी करणारे खुशमस्करे समाजात सर्वत्र असतात. सत्तेच्या अवतीभवती ते दाटीवाटीने आढळतात. त्यांना कुठलेही क्षेत्र वर्ज्य नसते. साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात ते जसे दिसतात

- गजानन जानभोरहुजरेगिरी करणारे खुशमस्करे समाजात सर्वत्र असतात. सत्तेच्या अवतीभवती ते दाटीवाटीने आढळतात. त्यांना कुठलेही क्षेत्र वर्ज्य नसते. साहित्य-सांस्कृतिक क्षेत्रात ते जसे दिसतात तसाच त्यांचा माध्यमातही मुक्तसंचार असतो. राजकारणात तर त्यांचे वारुळ असते. चापलुसीच्या मार्गाने आपला मतलब साध्य करणे हीच त्यांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा नागपुरातील राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात या चाटुगारांचे कान टोचले हे एका अर्थाने चांगलेच झाले. ‘साहित्यिकांनी राजसत्तेचे कधीही खिदमतगार होऊ नये, ज्या दिवशी साहित्यिक सत्तेची खिदमत करतील, त्या दिवशी साहित्य संपून जाईल’, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या या विधानामागे कुठलीतरी पार्श्वभूमी असावी. पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांना आलेले असे काही तऱ्हेवाईक अनुभव बहुधा त्यांच्याही वाट्याला आले असावेत. मुख्यमंत्री सभ्य आणि सुसंस्कृत आहेत. आपली ‘एकनाथी’ व्याधीही स्मितहास्यातून व्यक्त करण्याचा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे असेल कदाचित, त्यांनी ‘हुजरेगिरी, खुशमस्करी’ असे कठोर शब्द न वापरता ‘खिदमत’ या आतिथ्यशील शब्दाचा वापर केला. साहित्यिक मात्र ‘खिदमत’ या शब्दाचा अर्थ आपापल्या कुवती आणि मतलबानुसार लावत आहेत. खरे तर या शब्दाचा अन्वयार्थ शब्दकोशातच लावायला हवा. पण तसे न करता ते आपल्या सग्यासोयऱ्यांच्या खिदमती वर्तनात तो शोधत आहेत.‘खिदमत’ (मुख्यमंत्र्यांनी ध्वनीत केलेला अर्थ) अर्थात खुशमस्करी, चाटुगिरी हे शब्द आता मराठी साहित्यिकांच्या वर्तुळात परवलीचे मानले जातात. काही साहित्यिकांच्या पोटापाण्याची ती सोय आहे. पुरस्कार मिळविण्यासाठी साहित्य सेवेपेक्षा सत्ताधाऱ्यांची चापलुसी म्हणजेच खिदमत करण्याकडे यातील काहींची चढाओढ असते. या खिदमतीच्या वळणवाटा थेट साहित्य अकादमीपर्यंत जाऊन पोहोचतात. यावर्षी महाराष्ट्र सरकारच्या साहित्य-संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झालेल्या सदस्यांपैकी काहीजण पूर्णवेळ खिदमतगार आहेत. त्यांचा साहित्याशी संबंध शालेय अभ्यासक्रमातील धडे गिरवताना आला तेवढाच मर्यादित. भाजपा-संघ परिवाराची वर्षानुवर्षांपासून ते इमाने-इतबारे खिदमत करीत आहेत, हीच त्यांची गुणवत्ता आणि पात्रताही. काँग्रेसच्या काळातही असे खिदमती साहित्यिक होते. परंतु अशा नियुक्त्या करताना साहित्यमूल्य हा किमान निकष तरी असायचा. पूर्वी साहित्य संमेलनात सारे राजकारणी श्रोत्यांमध्ये बसायचे. पण आता ते संमेलनांच्या व्यासपीठावर, विशेष आसनावर दिसतात. त्यांनी स्वागताध्यक्षपद स्वीकारुन संमेलनाचा आर्थिक भार उचलावा यासाठी हे खिदमतगार त्यांच्यासमोर लाचारासारखे हात जोडून उभे असतात. विश्व साहित्य संंमेलनाच्या विमान प्रवासाचे अनुदान मिळविण्यासाठी साहित्य महामंडळाने सरकारपुढे घातलेले लोटांगण मग त्यातलाच एक घृणास्पद भाग ठरतो. काही राजकारणी साहित्यिकांकडून स्वत:चे चरित्र लिहून घेतात. पीएच.डी. लिहून देणे हे तर काहींच्या उदरनिर्वाहाचे साधन झाले आहे. ज्या नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्यातील प्राध्यापक साहित्यिकांच्या खिदमतीला बारोमास पीक आलेले असते. असहिष्णुतेच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांची निंदानालस्ती करणे हाही काहींच्या सरकारी खिदमतीचा अलीकडचा उद्योग. ‘मी पुरस्कार परत करणार नाही’ असे ते उगाच जाहीरपणे पीळ देऊन ओरडून सांगतात, तेव्हा त्या खिदमतीचे अर्थ भविष्यातील सरकारी नियुक्त्यांमध्ये दडलेले असतात. मराठी सारस्वतात खिदमतगारांचा पंथ पूर्वीही होता, पण आता त्याच्या झुंडी झाल्या आहेत. त्या एकदा संघटित झाल्या की अधिक आक्रस्ताळ्या होतात. सरकारी पुरस्कार आणि सरकारी समित्या, मंडळांवरील नियुक्त्यांमुळे त्यांना चिथावणी मिळत असते. मराठी साहित्य सृष्टीला खरा धोका या टोळीबाज खिदमतगारांकडून आहे. मुख्यमंत्र्यांनाही कदाचित तेच सांगायचे असावे!