‘हार्दिक’ शापवाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2016 03:44 IST2016-01-30T03:44:20+5:302016-01-30T03:44:20+5:30
‘असेच वागाल आणि स्वत:च्या फायद्यासाठी पटेल समाजाचा वापर करीत राहाल तर पुढची पंचवीस वर्षे तुम्ही गुजरातच्या सत्तेत येऊ शकणार नाही’, अशी अत्यंत उग्र शापवाणी पटेल

‘हार्दिक’ शापवाणी
‘असेच वागाल आणि स्वत:च्या फायद्यासाठी पटेल समाजाचा वापर करीत राहाल तर पुढची पंचवीस वर्षे तुम्ही गुजरातच्या सत्तेत येऊ शकणार नाही’, अशी अत्यंत उग्र शापवाणी पटेल समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन उभे करणाऱ्या आणि सध्या सूरतच्या कारागृहातील एक बंदीवान बनलेल्या हार्दिक पटेलने उच्चारली आहे. हार्दिकवर विद्यमान सरकारने थेट देशद्रोहाचा ठपका ठेवला असून कारागृहातूनच त्याने गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष भरतसिंह सोळंकी यांना लेखी पत्र पाठवून या शापवाणीचा उच्चार केला आहे. अलीकडच्या काळात त्या राज्यातील ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने जो सपाटून मार खाल्ला आणि त्याचा लाभ काँग्रेसला झाला, त्याला आपले आंदोलन आणि काँग्रेसने पटेल समाजाच्या भावनांचा केलेला राजकीय वापर कारणीभूत असल्याचे हार्दिकला वाटते. यातून आपल्या चुकीच्या धोरणांमुळे नव्हे तर पटेल समाजाच्या आंदोलनाने मतदार आपल्यापासून दूर गेला असे लटके का होईना समाधान यातून भाजपाला मिळू शकते. काँग्रेस गेली एकवीस वर्षे गुजरातच्या सत्तेत नाही व पुढील पंचवीस वर्षे सत्तेत येऊ शकणार नाही याचा अर्थ आम्ही पुन्हा भाजपाला सत्तेत आणू असेही नाही, असा खुलासाही हार्दिकने केला आहे व निवडणुकीत तिसऱ्या पर्यायाचा विचार करु असे म्हटले आहे. त्याच्या या विधानामुळे मुलायम-लालू-नितीश यांच्यापासून थेट शरद पवारांपर्यंत साऱ्यांचे डोळे लकाकून जायला हरकत नाही. आजवर त्यांना गुजरातेत कधीही फारसा थारा मिळालेला नाही. तो आता मिळेल आणि हार्दिक तो मिळवून देईल असा याचा अर्थ. पण तसे करताना त्यांनाही पटेल समाजाची आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा उचलून धरावी लागेल. तसे झाल्यास तो निवडणुकीतील विजयासाठी तथाकथित तिसऱ्या आघाडीने पटेल समाजाचा गैरवापर ठरेल किंवा कसे हे हार्दिकच सांगू शकेल. आंदोलने आणि त्या माध्यमातून गर्दी जमा करणे यातून सत्ता मिळते असे हार्दिकला खरोखरी वाटत असेल तर ते त्याच्या बाल्यावस्थेचेच द्योतक आहे.