अराजकाच्या मानसिकतेकडे...

By Admin | Updated: August 16, 2016 04:18 IST2016-08-16T04:18:55+5:302016-08-16T04:18:55+5:30

दे शात कायद्याचे राज्य आहे आणि कायद्याचा वापर करणे हा सरकार आणि त्याची पोलीस यंत्रणा यांचा अधिकार आहे. तो आपल्या हाती घेणारी माणसे कायद्याचे राज्यच विस्कळीत

At the heart of the irregular ... | अराजकाच्या मानसिकतेकडे...

अराजकाच्या मानसिकतेकडे...

दे शात कायद्याचे राज्य आहे आणि कायद्याचा वापर करणे हा सरकार आणि त्याची पोलीस यंत्रणा यांचा अधिकार आहे. तो आपल्या हाती घेणारी माणसे कायद्याचे राज्यच विस्कळीत करीत नाहीत, ती घटनेला आव्हान देतात आणि देशाला अराजकाच्या दिशेने नेतात. त्यातून सरकारचे दुबळेपण व दबलेपण उघड होते आणि कायदा हाती घेणाऱ्या गुंडांना सारे रान मोकळे होते. गुजरातमधील उना येथे चार दलित तरुणांना अमानुष मारहाण करणाऱ्या गोरक्षकांनी ज्या तऱ्हेच्या राजकारणाला देशात चालना दिली त्यातून त्याचा असा दिशाहीन प्रवास सुरू झाला आहे. कायदा हाती घेणारी आणि त्यांच्या त्या कृतीचे धार्मिक वा भावनिक कारणे पुढे करून समर्थन करणारी माणसे व माध्यमे या साऱ्यांचीच त्यांच्या संवैधानिक जबाबदारीच्या संदर्भात त्यासाठी सखोल तपासणी करण्याची वेळ आता आली आहे. दादरी कांडातील इकलाखच्या कुटुंबावर हल्ला करणारे लोक कायदा हाती घेऊनच त्याच्या घरावर चालून गेले होते. त्यांच्या समर्थकांचा भर मात्र या माणसांना कायदा हाती घेण्याचा अधिकार कोणी दिला या खऱ्या प्रश्नापेक्षा इकलाखच्या घरात सापडलेले मांसखंड गायीचे होते की बकऱ्याचे यावरच अधिक होता. समाजाची सरसकट दिशाभूल करण्याचा आपल्याकडचा हा पहिला व एकच प्रयत्न नव्हता. दिल्लीच्या पतियाळा हाऊस या न्यायालयाच्या परिसरात कन्हैय्याकुमारला मारहाण करणारे लोक व त्यांना साथ देणारे काळ््या कोटातले वकीलही तोच प्रकार करीत होते. कधी देशभक्तीचे तर कधी गोभक्तीचे नाव घेऊन कायद्याची मोडतोड करणारी ही माणसे प्रत्यक्षात देशाचीच मोडतोड करीत असतात हे वास्तव त्यांच्यावर बिंबवण्यासाठी सरकारी यंत्रणेनेच कठोर होण्याची आता गरज आहे. पण ज्या सरकारने हे करायचे त्याचेच हात या मोडतोडवाल्यांच्या संघटनांच्या वजनाखाली दबले असतील तर? उनामधील गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी ते लवकरच सुटतील असे त्यांचे समर्थक आताच सांगत आहेत. कन्हैय्याला कोर्टात मारणारे हल्लेखोर आणि वकील सीसीटीव्हीच्या चित्रफितीत दिसत असतानाही असेच बाहेर राहिले आहेत. दादरी प्रकरणातले आरोपीही सदैव आतबाहेर वावरले आहेत. सरकारची धमकीची भाषा आणि दुबळी कृती यांचा अचूक अंदाज असल्यामुळेच हे हल्लेखोर दबत नाहीत आणि प्रत्यक्ष पंतप्रधानांनी फटकारल्यानंतरही त्यांच्या व्यवहारात फरक पडत नाही. उलट ‘गोरक्षकांना धमकी देऊन पंतप्रधानांनीच आमच्या पाठिशी खंजीर खुपसला असल्याची’ भाषा ते बोलतात. पुढे जाऊन पंतप्रधान मोदी हेच हिंदूविरोधी असल्याचे त्यांचे म्हणणे असते. अशा माणसांना त्यांच्या परिवारातून चांगले पाठिराखेही मिळतात. गोविंदाचार्य नावाचे संघाने एकेकाळी नावाजलेले व नंतर टाकून दिलेले गृहस्थ कधीकधी राजकारणात दिसतात. ‘अटल बिहारी वाजपेयी हा संघाचा मुखवटा असल्याचे’ सांगण्याचा पराक्रम या अर्धसाधूच्या नावावर आहे. (त्याला अर्धसाधू म्हणण्याचे कारण त्या आचार्याने मध्यंतरी आपल्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन लालकृष्ण अडवाणींची भेट घेतली होती. अडवाणींनी त्याला थांबविले नसते तर त्याचे आचार्य असणे आणि कोणा एका महिलेचे साध्वी असणे तेव्हाच संपले असते. असो.) या गोविंदाचार्याने आता पन्नास हजार गोरक्षकांची सेना उभारून तिचे दिल्लीत एक मोठे संमेलन घेण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान गोरक्षणाच्या या व्यवहारात किती हजार कोटींचा आर्थिक व औद्योगिक व्यवहार दडला आहे याची साद्यंत माहिती एका राष्ट्रीय नियतकालिकाने सप्रमाण प्रकाशीत केली आहे. गुरांच्या मृतदेहातून मिळणाऱ्या किती गोष्टी कोणकोणत्या उद्योगांत नित्य वापरल्या जातात आणि त्या गोष्टींखेरीज ते उद्योग कसे बंद पडण्याची शक्यता आहे याची विस्तृत माहिती या नियतकालिकाने दिली आहे. गोरक्षकांचा एक नेत्र या उद्योगांवरही असल्याचे या नियतकालिकाने म्हटले आहे. धर्मकारण, राजकारण, अर्थकारण, सामाजिक दुहीकरण आणि संविधान व कायदा यांचा विरोध एवढ्या सगळ््या गोष्टी एकाच कामाने साध्य होत असतील तर ते हवे असणाऱ्या राजकारण्यांचाही एक मोठा पण उथळ वाणाचा वर्ग आपल्यात आहे. त्याला अशा सनसनाटी गोष्टी करून प्रसिद्धी व जमलेच तर पैसा मिळविण्यात रस आहे. दुर्दैव याचे की या राजकारणामुळे आपल्या पक्षाचे वा संघटनेचे भले होते असे समजणारी माणसे काही पक्षांत व त्यांच्या सल्लागार संस्थांत आहेत. कायद्याचे हत्यार आपण गुंडांच्या हाती देत आहोत आणि सामाजिक शांततेएवढाच सुरक्षिततेचाही विनाश करीत आहोत याची साधी भ्रांत नसणाऱ्या या माणसांना आवर घालण्यासाठी केंद्र सरकारने अजूनही जागे होणे गरजेचे आहे. कारण या तथाकथित गोरक्षकांची गुंडागर्दी गुजरातमध्ये दलितांवर केलेल्या अत्याचारानंतर थांबली नाही. आंध्रप्रदेश, तेलंगण व कर्नाटकासह दक्षिणेतील इतर राज्यांत ती साथीच्या रोगासारखी पसरतच राहिली आहे. त्याहून मोठी समस्या आपण कायदा हाती घेऊन तो हवा तसा वाकवू शकतो व तसे केले तरी आपल्याला काहीएक होत नाही या मानसिकतेची व तिच्या वाढीची आहे. ही मानसिकताच समाजाला अराजकाकडे नेणारी आहे.

Web Title: At the heart of the irregular ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.