मर्मस्थानी आघात!

By Admin | Updated: July 16, 2016 02:25 IST2016-07-16T02:25:36+5:302016-07-16T02:25:36+5:30

दिवसेंदिवस संपूर्ण जगच कसे असुरक्षित, भयभीत आणि कुंठित होत चालले आहे, याचा आणखी एक पुरावा गुरुवारी रात्री फ्रान्समधील नीस नावाच्या शहरात कोणा अज्ञाताने

Heart attack! | मर्मस्थानी आघात!

मर्मस्थानी आघात!

दिवसेंदिवस संपूर्ण जगच कसे असुरक्षित, भयभीत आणि कुंठित होत चालले आहे, याचा आणखी एक पुरावा गुरुवारी रात्री फ्रान्समधील नीस नावाच्या शहरात कोणा अज्ञाताने घडवून आणलेल्या घातपाती कृत्याने जगासमोर आला आहे. गेल्या नोव्हेंबरात फ्रान्सच्या राजधानीत केल्या गेलेल्या अतिरेकी हल्ल्यात १३० जण मृत्युमुखी पडले तर नीस शहरातील घातपाती कृत्यातील मृतांची संख्यादेखील शंभराच्या जवळपास जाण्याची भीती आहे. गुरुवारी संपूर्ण फ्रान्स राष्ट्र आपला राष्ट्रीय सण साजरा करीत होते. समुद्रकाठी वसलेल्या नीस शहरात शोभेच्या दारुची आतषबाजी सुरु होती. तशातच रात्री नवाच्या सुमारास एक भलामोठा ट्रक भरधाव वेगात आनंदोत्सवात रममाण नागरिकांच्या जमावात घुसला. तब्बल ऐंशी लोकाना चिरडून ठार मारीत व शंभराहून अधिकांना जखमी करीत तो ट्रक सुसाट चालत होता आणि त्याचा चालक त्याच्याकडील पिस्तुलातून त्याच वेळी गोळीबारदेखील करीत होता. पोलिसांनी त्या ट्रकचा पाठलाग करुन चालकाला ठार मारेपर्यंत व ट्रक थांबवेपर्यंत ट्रकने दोन किलोमीटरचा टप्पा पारदेखील केला होता. या ट्रकमध्ये हत्त्यारे आणि मोठ्या प्रमाणावर दारुगोळा होता. सुदैवाने त्याचा स्फोट झाला नाही. तो झाला असता तर काय झाले असते याची कल्पना करणेदेखील कठीणच आहे. झाला तो प्रकार घातपाताचाच होता यात शंका नाही. पण तो कोणी घडवून आणला याला तसे फार महत्व नाही. कारण अगदी अलीकडेच बांगला देशात जो घातपाती प्रकार घडला त्याची जबाबदारी (?) स्वीकारीत असल्याचे इसिसने भले जाहीर केले होते पण तो प्रकार घडवून आणणारे अतिरेकी खुद्द बांगलादेशी तरुणच होते आणि सुशिक्षित होते व या हल्ल्याचा आणि इसिसचा काहीही संबंध नसल्याचे त्या देशाच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांनी जाहीर केले होते. नीस शहरातील संबंधित ट्रकचा चालक त्याच शहरातील भुरटा बदमाष असल्याचे पोलिसाना प्राथमिक तपासात आढळून आल्याचे जाहीर झाले आहे. गेल्या नोव्हेंबरातील हल्ल्यानंतर संपूर्ण फ्रान्समध्ये जाहीर झालेली व या महिनाअखेर संपुष्टात येणारी अंतर्गत आणीबाणीची स्थिती आणखी काही काळ सुरु ठेवण्याचे फ्रान्सचे अध्यक्ष होलान्दे यांनी जाहीर केले असून राष्ट्रीय सणाच्या दिवशी झालेला हा हल्ला म्हणजे आमच्या मर्मस्थानावरील आघात असल्याचे म्हटले आहे. जगभरातील बहुतेक राष्ट्रप्रमुखांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करताना मृतांच्या नातलगांच्या प्रती समवेदना प्रकट केल्या आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी इराक आणि सिरीया या इसिसच्या प्रमुख ठाण्यांवर हल्ला बोल करण्याची सूचना अमेरिकी संसदेला केली आहे. होलान्दे यांनीही इसिसविरोधी मोहीम तीव्र करण्याचे म्हटले आहे. तथापि इसिसमध्ये जी काही भरती झाली आहे त्या भरतीमध्ये खुद्द फ्रान्समधून गेलेल्या हजारभर तरुणांचा समावेश आहे. फ्रान्स आणि इस्लाम यांच्यातील संघर्ष अलीकडचा नसून त्याला शतकाहून अधिकच्या काळाची पार्श्वभूमी आहे.

 

Web Title: Heart attack!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.