आरोग्य आणि तारतम्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 12:43 AM2020-09-09T00:43:34+5:302020-09-09T00:43:39+5:30

उत्तम आरोग्य आणि उत्तम तारतम्य हे सर्वात मोठे आशीर्वाद आहेत! रोचक आणि बोधप्रद वाकप्रचारांसाठी प्रसिद्ध असलेले लॅटिन लेखक पब्लिअस ...

Health and distinction! | आरोग्य आणि तारतम्य!

आरोग्य आणि तारतम्य!

Next

उत्तम आरोग्य आणि उत्तम तारतम्य हे सर्वात मोठे आशीर्वाद आहेत! रोचक आणि बोधप्रद वाकप्रचारांसाठी प्रसिद्ध असलेले लॅटिन लेखक पब्लिअस सायरस यांच्या या वचनाचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे रघुराम राजन आणि पी. चिदम्बरम यांनी भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात केलेली ताजी वक्तव्ये ! रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर पद आणि देशाचे अर्थमंत्रिपद भूषविलेल्या या दोन्ही दिग्गजांच्या वक्तव्यांचा सार हा आहे, की देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे आणि ती दुरुस्त करण्यासाठी तारतम्य बाळगून पावले उचलण्याची नितांत गरज आहे.

जून-ऑगस्ट या आर्थिक तिमाहीत आर्थिक विकास दरात झालेली २३.९ टक्क्यांची घसरण धोक्याची घंटा वाजविणारी असून, सरकारने आत्ममग्न अवस्थेतून बाहेर पडून तातडीने अर्थपूर्ण उपाययोजना आखण्याची गरज आहे, असा इशारा राजन यांनी त्यांच्या ‘ब्लॉग’मधून दिला आहे. सध्याच्या कसोटीच्या काळात अधिक सक्रिय सरकारची आवश्यकता आहे; मात्र कोरोना संकटातील प्रारंभीच्या सक्रियतेनंतर सरकार आता जणू काही कोषातच गेले आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे. पी. चिदम्बरम यांनीही त्यांच्या ताज्या साप्ताहिक लेखात, अर्थव्यवस्थेची भीषण दशा आकडेवारीसह मांडली आहे. त्यांनी सरकारवर अत्यंत कठोर शब्दात प्रहार केले आहेत. विशेषत: अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या ‘देवाची करणी’ (अ‍ॅक्ट आॅफ गॉड) या शब्दप्रयोगाचा तर त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

सीतारामण यांनी काही दिवसांपूर्वी अर्थव्यवस्थेतील घसरण ही ‘देवाची करणी’ असल्याचे विधान करून, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला होता. तो धागा पकडून, देवावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करू नका, असा सज्जड इशाराच चिदम्बरम यांनी सरकारला दिला आहे. अर्थव्यवस्थेची सर्वदूर घसरण सुरू असताना, केवळ कृषी, वने आणि मत्स्योत्पादन या क्षेत्रानेच ३.४ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. रघुराम राजन आणि पी. चिदम्बरम हे दोघेही नावाजलेले अर्थतज्ज्ञ आहेत. दोघांनीही भारतीयअर्थव्यवस्था केवळ जवळून बघितलेलीच नाही, तर तिला दिशा देण्याचेही काम केलेले आहे. त्यामुळे त्यांची विधाने काही ‘उचलली जीभ अन् लावली टाळ्याला’ या प्रकारात मोडणारी नाहीत. त्यामागे सखोल अभ्यास, प्रदीर्घ अनुभव आणि वर्षानुवर्षाचे चिंतन आहे.

चिदम्बरम हे विद्यमान सरकारचे राजकीय विरोधक असले तरी राजन यांची संपूर्ण कारकीर्द तर उच्च शिक्षण आणि प्रशासनातच घडली आहे. त्यामुळे चिदम्बरम यांनी केलेल्या टीकेमागे राजकीय आकसबुद्धी असल्याचे एकदाचे मान्य करता येईल; पण राजन यांच्या टीकेसंदर्भात तसा आरोप कुणीही करू शकत नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची अवस्था अत्यंत हलाखीची असल्याचे सांगण्यासाठी अर्थतज्ज्ञ असण्याची अजिबात गरज नाही. चटके बसू लागले की आंधळाही आग लागल्याचे सांगू शकतो आणि चिदम्बरम यांनी म्हटल्याप्रमाणे आता सर्वसामान्य नागरिकांना अर्थव्यवस्थेच्या बिकट स्थितीच्या झळा पोहोचू लागल्या आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे आरोग्य चांगलेच ढासळले आहे, हे सरकारने आता मान्य केलेच पाहिजे. एखाद्यावर सूड उगवायचा असल्यास त्याच्या आजारपणासारखी अनुकूल स्थिती कोणतीच नसते. सध्या चीन सीमेवर त्याचाच प्रत्यय आणून देत आहे. पाकिस्तानही तापलेल्या तव्यावर पोळी शेकून घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. सीमांवरील तणाव एवढा चरणसीमेला पोहोचला आहे, की युद्धाला कधीही तोंड फुटू शकते !

दुर्दैवाने तसे घडल्यास, आधीच कमजोर झालेल्या अर्थव्यवस्थेला तो भार पेलवेल का? सरकारमधील धुरिणांनी त्यावर विचार करणे गरजेचे आहे. कोरोना संकटामुळे जर्जर झालेली अर्थव्यवस्था आणि त्यातच सीमांवर निर्माण झालेले युद्धाचे ढग ही स्थिती राष्ट्रीय आपातकालासारखीच आहे. अशा संकटकाळी पुढारलेल्या देशांनीही राष्ट्रीय सरकारचे प्रयोग केले आहेत. आपण राष्ट्रीय सरकार जरी नव्हे, तरी देशात उपलब्ध तज्ज्ञ मनुष्यबळाच्या सल्ल्याचा, देशाच्या भल्यासाठी उपयोग करून घेण्यास हरकत काय?

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सध्याच्या घडीला अर्थव्यवस्थेची अवस्था अत्यंत हलाखीची असल्याचे सांगण्यासाठी अर्थतज्ज्ञ असण्याची अजिबात गरज नाही. चटके बसू लागले की आंधळाही आग लागल्याचे सांगू शकतो !

Web Title: Health and distinction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.