‘मथळ्यांवर चालणारे सरकार’

By Admin | Updated: October 27, 2015 23:04 IST2015-10-27T23:04:15+5:302015-10-27T23:04:15+5:30

नरेंद्र मोदींनी सरकारचे सर्व अधिकार त्यांच्या (म्हणजे पंतप्रधानांच्या) कार्यालयात केंद्रित केले असले तरी ते आजवरचे सर्वात दुबळे पंतप्रधान कार्यालय आहे

'Headline Government' | ‘मथळ्यांवर चालणारे सरकार’

‘मथळ्यांवर चालणारे सरकार’

नरेंद्र मोदींनी सरकारचे सर्व अधिकार त्यांच्या (म्हणजे पंतप्रधानांच्या) कार्यालयात केंद्रित केले असले तरी ते आजवरचे सर्वात दुबळे पंतप्रधान कार्यालय आहे, अशी टीका काँग्रेस वा अन्य कोणत्या विरोधी पक्षाने वा नेत्याने केली नसून ती त्यांच्याच पक्षातील अरुण शौरी या ज्येष्ठ, अनुभवी व जाणत्या नेत्याने केली आहे. अरुण शौरी हे काहीसे वादग्रस्त असले तरी देशातले एक ज्येष्ठ व आदरणीय पत्रकार आहेत. त्यांच्या लेखणीच्या अस्त्राने राजीव गांधींच्या सरकारला त्याच्या अखेरच्या काळात सळो की पळो करून सोडले होते हा इतिहास आहे. पुढे १९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे भाजपाप्रणीत आघाडी सरकार केंद्रात सत्तारुढ झाले तेव्हा शौरींना त्यात निर्गुंतवणूक खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून महत्त्वाचे स्थान दिले गेले. पत्रकारिता आणि राजकारणाएवढाच त्यांना असलेला प्रशासनाचा अनुभव मोठा आहे. शिवाय जनतेचे मन जाणणारा संपादक अशी त्यांची देशात ख्याती आहे. त्याचमुळे ‘मोदींनी सरकारचे सर्वाधिकार आपल्या कार्यालयात एकवटल्यानंतरही ते कार्यालय कमालीचे दुबळे राहिले आहे’ असे त्यांनी म्हणणे हे सध्याच्या सरकारचे खरे व आतले दर्शन घडविणारे प्रकरण आहे. आपले म्हणणे आणखी स्पष्ट करताना शौरी म्हणतात, सध्या दिसते ते अधिकारांचेही केंद्रीकरण नाही, ते कामांचे व निर्णयांचे केंद्रीकरण आहे. परिणामी निर्णय थांबले आहेत आणि प्रशासन ठप्प झाले आहे. करपद्धतीतील सुधारणा लांबल्या आणि बँकांच्या व्यवहारांचे नूतनीकरणही अडले. आपल्या या अभिप्रायातील जळजळीतपण व्यक्त करताना शौरी म्हणतात, ‘हे सरकार हा हळू चालणारा कासव नाही. तो झोपलेला कासव आहे.’ काँग्रेसचे सरकार आणि मोदींचे सरकार यात फरक असलाच तर तो गायीचा आहे. काँग्रेस अधिक गाय म्हणजे मोदी सरकार असे ते म्हणाले आहेत. पंतप्रधानांच्या कार्यालयात पूर्वीच्या ब्रजेश मिश्र वा लक्ष्मीकांत झा यांच्यासारखे कार्यक्षम, तडफदार व जाणकार अधिकारी नाहीत. त्यामुळे निर्णय थांबतात, कामे तुंबतात आणि मग केवळ वर्तमानपत्रात मोठाले मथळे छापून आणण्याची कसरतच या कार्यालयाला करावी लागते. प्रत्यक्षात ‘काम थांबलेले व प्रसिद्धी धावणारी’ अशी या सरकारची सध्याची स्थिती आहे. डॉ. मनमोहन सिंग यांचे आधीचे सरकार याहून गतीमान व निर्णय घेणारे म्हणून त्याची जनतेला आता आठवण होऊ लागली आहे असे सांगून शौरी म्हणतात, हे प्रसिद्धीवर जगणारे सरकार आहे. पंतप्रधानांना चांगली व्याख्याने देता येतात, लोक ती ऐकतात आणि त्यावर संतुष्टही होतात. पण त्यांचे म्हणणे ना त्यांचे मंत्री ऐकत, ना पक्ष आणि ना त्यांचा संघ परिवार. देशातील प्रमुख राष्ट्रीय वृत्तपत्रांनीही शौरींच्या सुरात सूर मिसळून मंत्र्यांकडून पंतप्रधानांची होत असलेली अवज्ञा अनेक उदाहरणांनिशी प्रकाशीत करणे सुरू केले आहे. गिरिराज सिंह या उठवळ मंत्र्याने पंतप्रधान आणि भाजपाध्यक्ष या दोघांनीही त्याला दिलेली तंबी ऐकून न ऐकल्यासारखी केली आहे. समाजात दुही निर्माण होईल अशी वक्तव्ये (निदान बिहारची निवडणूक होत असताना तरी) टाळा असे बजावल्यानंतरही या गिरिराजांनी ‘बिहारात नितीशकुमार विजयी झाले तर तेथील हिंदूंना गायीचे मांस खावे लागेल’ असे तद्दन बालीश उद्गार काढले आणि एका नव्या वादंगाला जन्म दिला. गिरिराज सिंहांच्या आजवरच्या अनेक उद््गारांना आणि उपद््व्यापांना बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली असल्यामुळे ते गृहस्थही आता त्या क्षेत्रात आणखी मोठेपण मिळविण्याच्या मागे लागले असावेत अशी चिन्हे दिसत आहेत. त्यांच्या जोडीला प्राची, निरंजना, आदित्यनाथ, महेश शर्मा, संगीत सोम आणि त्यांच्यासारखेच इतर अनेक मंत्री आपण मोदींच्या आज्ञेला फारसा मान देत नसल्याचेच देशाला दाखवीत आहेत. माध्यमांमधील एक वर्ग मोदी हे कमालीचे कणखर प्रशासक व नेते असल्याचे चित्र निर्माण करीत आहे. प्रशासन, सरकार व पक्षासह साऱ्याच गोष्टींमधील तपशीलांवर त्यांची पकड असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील त्यांची व्याख्यानेही तशीच जोरकस आणि दमदार दिसत आहेत. प्रत्यक्षात या सरकारच्या कामाचे स्वरुप मात्र शौरींनी रंगविले तसे आहे. प्रवीण तोगडिया हे गृहस्थ मंत्री वा खासदार नाहीत. पण विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस म्हणून संघ परिवारातले ते एक बडे पण उठवळ प्रस्थ आहे. ‘मोदी सरकारचे सांगणे (आम्हाला वाटते तशा) हिंदूहिताविरुद्ध जाणार असेल तर ते आम्ही अजिबात ऐकणार नाही’ असे या तोगडियांनी जाहीरपणेच सांगून टाकले आहे. तात्पर्य, कार्यालयावर ताबा नाही, मंत्र्यांवर नियंत्रण नाही, पक्ष मुठीत नाही आणि परिवारातल्या इतर संघटना मन:पूत वागणाऱ्या आहेत. या साऱ्या प्रकाराचे वर्णन त्याचमुळे ‘मथळ््यांवर चालणारे सरकार’ असे अरुण शौरींनी केले आहे. येत्या काही दिवसांत भाजपाचे नेते व प्रवक्ते शौरींवर ‘ते कृतघ्न झाल्याची’ टीका करतील. आपल्याविरुद्ध वा आपल्या प्रसिद्धीपुरुषाविरुद्ध जो बोलेल वा लिहील त्याची तशी संभावना करण्याची त्या परिवाराची परंपराही आहे. मात्र त्यामुळे शौरींचे आजवर देशाला दिसलेले सरळ साधे व पारदर्शी स्वरुप गढूळ होणार नाही. गेल्या ४० वर्षांत त्या जाणत्या राजकीय भाष्यकाराने तेवढी पुण्याई मिळविलीही आहे.

Web Title: 'Headline Government'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.