जिही उदंड कष्ट केले
By Admin | Updated: August 6, 2016 04:38 IST2016-08-06T04:38:03+5:302016-08-06T04:38:03+5:30
रामदास स्वामींनी ‘जिही उदंड कष्ट केले’ या पंक्तीद्वारे अथक कष्ट करणाऱ्यांचा जो गौरव केला आहे

जिही उदंड कष्ट केले
रामदास स्वामींनी ‘जिही उदंड कष्ट केले’ या पंक्तीद्वारे अथक कष्ट करणाऱ्यांचा जो गौरव केला आहे तो, लोकमान्य टिळकांना तंतोतंत लागू पडतो. त्यांनी ब्रह्मदेशातील मंडालेच्या म्हणजे आताच्या म्यानमारमधील कठोर तुरुंगवासात इ.स. १९०८ ते १९१४ या सहा वर्षांत ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ लिहिला व १०१ वर्षांपूर्वी १९१५ साली तो प्रसिद्ध झाला. त्याच वर्षी तेव्हाच्या मॉरिस कॉलेजचे (आताचे नागपूर महाविद्यालय) प्रिन्सिपॉल महामहोपाध्याय बापूजी ताम्हण यांच्या अध्यक्षतेखाली व्यंकटेश थिएटरात श्रोत्यांच्या गर्दीसमोर ‘गीतारहस्य’ ग्रंथाची मूळ संकल्पना त्यांनी प्रगट केली. गीतेतील कर्म शब्दाचा अर्थ लौकिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य असा होतो असे त्यांचे विवरण होते. गीतारहस्याच्या अर्पण पत्रिकेत, संस्कृत श्लोकात ‘श्रीशायजनतात्मने’ म्हणजे जनताजनार्दनाला अर्पण असे म्हटले आहे.
राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांनी स्वत:च आठ दिवस ओजस्वी असे भाषण न्यायासनापुढे केले, त्याचा परिणाम अटळ होता. मधुमेहाने पोखरलेले आणि पन्नाशी उलटून गेलेले टिळक अत्यंत शांतपणे मंडालेला शिक्षा भोगायला निघाले. त्यांना कोलकातामार्गे रेल्वेने नेण्यासाठी पोलिसांनी मुंबईला मेलमध्ये बसवले. टिळकांचे हात बेड्यांमध्ये जखडलेले होते. गाडी सुटायला अवकाश असल्याने पोलीस त्यांना बाकावर बसवून चहा प्यायला निघून गेले. पोलीस परतले तेव्हां टिळक आपल्या जागेवर निश्चिंतपणे झोपले होते. स्थितप्रज्ञ याहून वेगळा असतो का?
न.चिं. केळकरांनी एका ठिकाणी नमूद केले आहे की, टिळकांच्या धकाधकीच्या जीवनात राज्यकर्त्यांनी त्यांना दिलेली सहा वर्षांची शिक्षा ग्रंथलेखनासाठी मोलाची ठरली असे दिसते. जेव्हा ही कारावासाची शिक्षा त्यांना झाली तेव्हा जर्मन पंडित मॅक्समुल्लर यांनाही राहावले नाही. ‘अशा महापंडिताला तुरुंगात कुजवणे योग्य नव्हे. त्याला ही शिक्षा करू नये’ असा अर्ज काही विवेकी व्यक्तींनी महाराणी व्हिक्टोरियाकडे दिला. त्यावर पहिली सही प्रो. मॅक्समुल्लर यांची होती.
सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत दिवसभर कर्मरत असणाऱ्या टिळकांविषयी वाचनातून स्मरलेल्या या अमूल्य आठवणी आहेत. निष्क्रियता आणि कर्मसंन्यासाचा मार्ग त्याज्य आहे हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले. ओरायन, आॅर्क्टिक होम इन वेदाज आणि गीतारहस्य अशी ग्रंथ निर्मिती करणाऱ्या लोकोत्तर व्यक्तीविषयी कवी गोविंद लिहितात, ‘मुक्या मनाने किती उधळावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातिल पुढती तोफांचे चौघडे.’
-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे