शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

‘नफरत जीत गयी, आर्टिस्ट हार गया’

By संदीप प्रधान | Published: December 02, 2021 6:23 AM

स्टँडअप कॉमेडियन्सवर ट्रोलर्सच्या टोळ्या सोडून बेजार केले जाते आहे,व्यंगचित्रकारही हेटाळणी, मत्सर व छळवणूक याचे शिकार आहेत!!

- संदीप प्रधान(वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत) 

सर्वंकष सत्ताधीशांना, दुसरा पक्ष विचारातही न घेता केवळ आपलेच सदैव ऐकले जावे, असा हेकेखोर राक्षसी आग्रह असलेल्या  विचारांना  विनोदाचे वावडे असणे ही जणू पूर्वअटच असते. कारण राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक परिप्रेक्षात घडत  असलेल्या मनमानीतील अंतर्विरोध, असंवेदनशीलता यावर विनोदाच्या माध्यमातून बोट ठेवले तर ते लोकांना भावते. राज्यकर्त्यांनी आपल्या हडेलहप्पी कारभाराला दिलेला मुलामा विनोदामुळे खरवडला जातो. त्यामुळे जगातील सर्वच हुकूमशहा विनोद व विनोदवीर यांना आपला प्रथम क्रमांकाचा शत्रू मानतात. मुनवर फारुखी हे तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले स्टँडअप कॉमेडियन आहेत. फारुखी हे मूळचे गुजरातचे असून आता इंदूरमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे कर्नाटकातील जाहीर कार्यक्रम  उधळून लावण्याची धमकी बजरंग दलाने दिल्याने त्यांना हे कार्यक्रम रद्द करावे लागले. फारुखी हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत असल्याने त्यांच्या कार्यक्रमांना आपला विरोध असल्याचे बजरंग दलाने म्हटले आहे. मुंबई आणि गुजरातमधील मिळून दोन महिन्यांत त्यांचे १२ कार्यक्रम असेच धमक्यांमुळे त्यांना रद्द करावे लागले. सतत धमक्या व त्यामुळे रद्द होणाऱ्या कार्यक्रमांमुळे कंटाळलेला फारुखी यांनी ‘नफरत जीत गयी, आर्टिस्ट (कलाकार) हार गया’, अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकली. फारुखी यांच्या कार्यक्रमांना वेगवेगळ्या जाती-धर्मातील दर्शकांची पसंती लाभली आहे. जानेवारी महिन्यात फारुखी यांना इंदूरमधील कार्यक्रमामध्ये सत्ताधाऱ्यांविरुद्ध अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल अटक केली होती. तेव्हापासून फारुखी हे हिंदू धर्मांध शक्तींच्या हीट लिस्टवर आहेत.

गेल्या काही वर्षांत विनोद केल्यामुळे लक्ष्य झालेले फारुखी हे काही केवळ एकटे नाहीत. वीर दास यांनी अलीकडेच विदेशातील एका कार्यक्रमात ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ ही कविता सादर केल्यामुळे त्यांनाही कट्टरतावाद्यांकडून ‘देशद्रोही’ ठरवण्याचा प्रयत्न झाला. देशातील उन्मादाच्या लाटेवर स्वार झालेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांना विमानातील त्यांच्या आसनापाशी जाऊन खडे बोल सुनावणारे कुणाल कामरा हे स्टँडअप कॉमेडियन हेही सध्या उन्मादी टोळ्यांचे लक्ष्य आहेत. 

स्टँडअप कॉमेडियन्सना त्यांचे कार्यक्रम रद्द करून व त्यांच्यावर ट्रोलर्सच्या टोळ्या सोडून बेजार केले जाते, तसेच व्यंगचित्रकार हेही हेटाळणी, मत्सर व छळवणूक याचे शिकार आहेत. मंजूल हे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांच्या कुंचल्यांचे फटकारे विलक्षण असतात. त्यांच्या ट्विटरवरील व्यंगचित्रांमुळे भारतीय नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. अर्थात ट्विटरने याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. मात्र, यावरून मंजूल यांच्या व्यंगचित्रांची ताकद व लोकप्रियता नक्कीच अधोरेखित होते. देशात आणीबाणी लागू झाली होती तेव्हाही तत्कालीन व्यंगचित्रकार, लेखक, कवी यांना अशाच दमनशक्तीचा मुकाबला करावा लागला होता. १९४०-४१ मध्ये चार्ली चॅप्लीन यांनी ‘दी ग्रेट डिक्टेटर’ प्रदर्शित केला तेव्हा जर्मनीत या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. 

जेव्हा सत्ताधारी पक्षाची प्रतिमा त्याच्या भक्तांनी ‘लार्जर दॅन लाइफ’ केलेली असते तेव्हा विनोदाचा एक छोटासा दगड ती खळकन फोडून सत्तेच्या खुर्चीवरील शक्ती प्रत्यक्षात कशा खुज्या आहेत, हे दाखवून देते. त्यामुळे सत्ताधीश शक्ती व  मूर्तीपूजनाकरिता नेमलेले भक्त हे मूर्तिभंजन होऊ नये याचा आटापिटा करीत असतात. सत्ता धारण करणाऱ्या शक्ती, विचार हेच कसे तारणहार आहेत, त्यांच्यामुळेच समाजाचे कसे हित साधले जात आहे आणि असे असूनही या शक्तींना/ विचारांना विरोध करणारे विनोदवीर, व्यंगचित्रकार हेच कसे देशद्रोही आहेत हे भासवण्याचा, ठसवण्याचा प्रयत्न केला जातो. पु. ल. देशपांडे यांनी हुकूमशाही राज्यव्यवस्थेवर  काही वर्षांपूर्वी हल्ला केला गेला तेव्हा त्यांच्याबद्दल जनमानसात असलेली आपुलकी विसरून त्यांना लक्ष्य केले गेले होते. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून  हुकूमशाही प्रवृत्तीची निर्भर्त्सना करणारा ठराव केला जाणार होता तेव्हा साहित्य संमेलनाचा उल्लेख बैलबाजार असा केला गेला होता. कलाकार, व्यंगचित्रकार यांनी हुकूमशाही विरोधात ब्र जरी काढला तरी त्यांना दिलेले पुरस्कार, शिष्यवृत्त्या वगैरे काढून घेण्याच्या धमक्या नेहमीच दिल्या जातात.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दोऱ्या ज्यांच्या हाती असतात त्यांच्यावर विनोद होणार, व्यंगचित्रे काढली जाणार, वेळप्रसंगी त्यांची रेवडी उडवली जाणार हे सत्य आहे; परंतु जेव्हा लोकांचे विचार, भावना, अभिव्यक्ती यावर पोलिसी कारवाईचा बडगा उगारला जातो तेव्हा मग लोकही हेतुत: विनोद सांगण्याकरिता, करण्याकरिता उभे राहतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सेन्सॉरच्या टाचेखाली ठेवणारे आपल्याला जे नैतिकदृष्ट्या योग्य वाटते तेच समाजाकरिता नैतिकदृष्ट्या योग्य असल्याचा जावईशोध लावून आपल्या नैतिकतेच्या कल्पना इतरांवर लादतात. त्याला विरोध करण्याकरिता विनोद हेच प्रभावी अस्त्र असल्याचे मानणारे त्या लादलेल्या नैतिकतेवर विनोदाचे प्रहार करतात. त्याचवेळी सत्ताधारी व त्यांचे समर्थक हेही हिणकस विनोदाचा आधार घेत टीकाकारांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. 

मुनावर फारुखी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या विनोदी कार्यक्रमात भेंडीबाजारात स्कूटर कशी चालवली जाते, यावर कार्यक्रम सादर केला होता. त्यांच्या इतर राजकीय शेरेबाजीच्या व्हिडिओतही पराकोटीचे आक्षेपार्ह  असे काहीच दिसत नाही. तरुण पिढीचा त्यांना लाभणारा भरभरून प्रतिसाद हीच कदाचित मोठी अडचण असू शकेल. कारण तरुण पिढीने सत्ताधीशांकडे पाठ फिरवल्यावर ते इवलेसे शून्य होऊन राहतात, हेही खरेच आहे!

टॅग्स :Politicsराजकारण