सर्व क्षेत्रांसाठी ‘हॅपी हेल्थ इयर’च्या शुभेच्छा!

By विजय दर्डा | Published: January 4, 2021 05:38 AM2021-01-04T05:38:45+5:302021-01-04T05:40:31+5:30

Corona Virus: कोरोनाने गतवर्षी सर्वांनाच हवालदिल करून सोडले. नव्या वर्षात आपल्याला व्यक्तिगत आरोग्याबरोबरच उद्योग-व्यवसायांचे आरोग्यही सांभाळावे लागेल!

Happy Healthy Year to all sector after corona Virus Pandemic | सर्व क्षेत्रांसाठी ‘हॅपी हेल्थ इयर’च्या शुभेच्छा!

सर्व क्षेत्रांसाठी ‘हॅपी हेल्थ इयर’च्या शुभेच्छा!

Next

-  विजय दर्डा, 
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

सर्वप्रथम आपणा सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा आणि उज्ज्वल भविष्यासाठीच्या शुभकामना. २०२० हे सरले वर्ष आजवर कधी वर्तमान पिढ्यांच्या वाट्याला आले नाही अशा आव्हानांचे, आपल्या धैर्याची परीक्षा पाहणारे वर्ष होते. या परीक्षेत आपण पुष्कळशा प्रमाणात यशस्वी झालो असलो, तरी आपल्यापुढील आव्हानांची मालिका अद्याप सरलेली नाही, असे निरीक्षण गेल्या सप्ताहातील माझ्या स्तंभातून मी नोंदविले होते. कोरोना इतक्या सहजपणे आपल्याला मोकळे सोडणार नाही. या संसर्ग साथीने सर्वत्र दंश करून हरेक  क्षेत्राची इतकी  हानी करून ठेवली आहे की, सारे सांभाळून, उसवलेल्याला टाके घालून सारे पूर्वपदावर आणायला आपल्याला आणखी बराच वेळ लागणार आहे, हे निश्चित! बराच वेळही लागेल आणि त्यासाठी संघटितपणे कष्टही उपसावे लागतील. कोरोनाचा कहर आता ओसरू लागला आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब, पण तो विषाणू अद्यापही आपल्यामध्ये ठाण मांडून बसला असून, आता बहुरूप्याप्रमाणे रूप बदलून नव्या स्वरूपात समोर येण्याचे खेळ (म्युटेशन )  त्याने सुरू केले आहेत. त्याचे हे नवे स्वरूप विघातक सिद्ध होण्याआधीच प्रतिबंधात्मक लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, अशी आशा मी बाळगून आहे. लसीकरणासाठीची सिद्धता आपल्या देशात झालेली आहे. तिच्या यशाविषयी कोणाच्याही मनात कोणताही किंतु असता कामा नये, कारण लसीकरणाची जगातली सर्वांत मोठी मोहीम चालविण्याचा अनुभव आपल्या देशाच्या गाठीशी आहे.  त्यासाठी लागणारी सर्व प्रकारची संसाधनेही आपल्या दिमतीला आहेत. लस आपणा सर्वांपर्यंत पोहोचायला अधिक काळ लागणार नाही, अशी अपेक्षा आपण बाळगू या. ही लस निर्माण करणाऱ्या आणि ती तमाम जनतेपर्यंत पोहोचावी, म्हणून कार्यप्रवण असलेल्या सर्व वैज्ञानिकांचे, सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील अन्य लोकांचे मन:पूर्वक अभिनंदन.


कोरोना विरुद्धच्या लढाईत आपण गेले वर्षभर अतिशय धीरोदात्त असा ठाम निर्धार दाखविला आहे. हा निर्धार यापुढेही तसाच कायम राहाणे  अगत्याचे आहे, याचे विस्मरण होता कामा नये. जोपर्यंत कोरोनाची श्रृंखला तुटत नाही, तोपर्यंत थोडेसे शैथिल्यही आपल्याला महागात पडू शकते. मी धैर्याचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की, संधीचा फायदा घेऊन  लुच्चेगिरी करणाऱ्यांचे पेवही आता फुटले आहे. लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर त्या मागोमाग नकली लसीही बाजारात  येतील, अशी शंका व्यक्त होत आहे. आपल्याकडे नकली औषधांची फार मोठी बाजारपेठ असून, या व्यापारातून आपल्या तुंबड्या भरायला सोकावलेले लोक  ही संधी दवडणार नाहीत, याची मला पक्की खात्री आहे. अशा लोकांपासून आपल्याला सावध राहायला हवे.  या संधीचा लाभ उठविण्यासाठी चोरांच्या फौजाही सरसावल्या आहेत. लसीकरणाची मोहीम सुरू झाल्यावर अनेक तऱ्हेने लोक फसवणुकीचे धंदे सुरू करू शकतात. लसीच्या संदर्भात माहिती जमा केली जात आहे, असे सांगून, सर्वसामान्य लोकांना गंडा घालणे आणि आपले खिसे साफ करणे फार अवघड नाही. आपला आधार क्रमांक आणि ओटीपी द्या, असे सांगून आपल्या बँक खात्यातली जमा रोकड हे लुच्चे लोक  साफ करू शकतात. या संदर्भात अलीकडेच रिझर्व्ह बँकेने लोकाना सावधगिरीचा इशारा दिलेला आहे, शिवाय अन्य वित्तसंस्थाही  आता जनतेला सावध करू लागल्या आहेतच. आपणही याबाबत पुरेसे भान बाळगले पाहिजे. सावधानतेने आपले व्यवहार करायला शिकले पाहिजे. 


आपल्या वैयक्तिक आरोग्याच्या रक्षणासाठीही यापुढे आपल्याला सदैव सजग राहावे लागेल. गेल्या वर्षी कोरोनामुळे आपण अनेक सुहृदांना गमावून बसलो.  नव्या वर्षात त्याची पुनरावृत्ती टाळायची असेल, तर आपल्या आरोग्याची काळजी घेतानाच इतरांच्या क्षेम कुशलतेवरही आपल्याला लक्ष ठेवावे लागेल. आपल्या आरोग्याकडे आपण मुद्दाम केलेले, अजाणतेपणी झालेले दुर्लक्ष कसे महागात पडू शकते, हे  कोरोनाने आपल्याला दाखवून दिलेले आहेच. यापुढे कोणत्याही विषाणूच्या प्रतिकारार्थ आपले शरीर सज्ज ठेवण्यासाठी आरोग्यदायी आहार घेण्याकडे आपला कटाक्ष असायला हवा. व्यायाम आणि योगासनांबरोबरच पारंपरिक घरगुती उपाययोजनाही प्रभावी ठरतात. आपले शरीर जितके सक्रिय असेल, तितकीच आपली प्रतिकारशक्ती सक्षम राहील, हे अनुभवाने सिद्ध झालेले आहे.


आपल्या देशाची प्रतिकारशक्तीही आपल्याला वाढवायची असून, त्यासाठी आपल्या उद्योगधंद्याना पूर्ववत ऊर्जितावस्था प्राप्त व्हायला हवी. भविष्यातल्या  गंभीर संकटांचा लिलया सामना करू शकेल, अशा प्रकारे उद्योगविश्वाने विकसित व्हायला हवे. ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सचा ताजा अहवाल आपल्याला या संदर्भात काहीसा सचिंत करणारा आहे. या अहवालात नमूद केले आहे की, २०२५ पर्यंत देशाचे सकल घरेलू उत्पन्न कोरोनापूर्व उत्पन्नाच्या तुलनेत १२ टक्क्यांनी कमी झालेले असेल. आपली अर्थव्यवस्था आकाराने प्रचंड असल्याने, या संसर्ग साथीने केलेले तिचे नुकसानही प्रचंडच असेल. मात्र, अशा अहवालांमुळे आपण विचलित होऊ नये, असे मला वाटते. संकटसमयी नव्या ताकदीने आणि निर्धाराने उभे राहाणे हे आम्हा भारतीयांचे वैशिष्ट्य राहिलेले आहे. उद्योग-व्यवसायांना शीघ्रगतीने विकसित करण्याचा निर्धार आपण केला, तर आपल्या देशाचे सकल घरेलू उत्पन्नही गतीने सुदृढ होईल.

उद्योग-व्यवसायांसाठी सरकारने मदतीची घोषणा केली असून, तिचा परिणामही आता दिसू लागला आहे. भारतीय अर्थव्यवस्था मागणी आणि पुरवठ्यावर निर्भर असते, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. जोपर्यंत मागणी क्षीण असेल, तोपर्यंत परिस्थितीत विशेष फरक पडण्याची शक्यता नाही. मागणी वाढवायची असेल, तर जनसामान्यांच्या हातात पैसा खेळायला हवा. त्याचबरोबर, निर्मिती क्षेत्राला लागणाऱ्या संसाधनांच्या किमती कमी करून त्या क्षेत्राला बाळसे आणावे लागेल. म्हणजे, अधिकाधिक लोकाना रोजगार मिळेल. कोरोनाच्या काळाच्या आघातातून सावरलेल्या उद्योग व्यवसायांच्या, विशेषत: नव्याने सुरू झालेल्या एमएसएमईंच्या आरोग्याकडे लक्ष देणेही अत्यावश्यक आहे. आतापर्यंत सरकारने दिलेली मदत पुरेशी नाही. उद्योग व्यवसायांचे आरोग्य जर सुधारणार नसेल, तर सुदृढ देशाची कल्पनाही आपण करू शकणार नाही.
तेव्हा २०२१च्या शुभेच्छा एकामेकांना  देताना आपण म्हणू या, ‘हॅपी हेल्थ इयर.’
-vijaydarda@lokmat.com

Web Title: Happy Healthy Year to all sector after corona Virus Pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.