सुखाचा शोध
By Admin | Updated: January 14, 2017 01:03 IST2017-01-14T01:03:25+5:302017-01-14T01:03:25+5:30
सतत सुखाचा शोध घेण्याची ओढ माणसाला कधी स्वस्थ बसू देत नसते. खरे तर ‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे’ हे संत तुकारामांनी

सुखाचा शोध
सतत सुखाचा शोध घेण्याची ओढ माणसाला कधी स्वस्थ बसू देत नसते. खरे तर ‘सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे’ हे संत तुकारामांनी बजावून ठेवले आहे. संत ज्ञानदेवांचे ‘ज्या लोकीचा चंद्रु क्षयरोगी। जेथे उदयू होय अस्तालागी। दु:ख लेवून सुखाची अंगी। सळित जगाते’ हे शब्द आणि ‘चक्रवत् परिवर्तंते सुखानीच, दु:खानिच’ हे प्राचीन वाङ्मयातले बोल कसे विसरावेत? सुख-दु:ख, निंदा-स्तुती, मऊ-कठीण, सुंदर-कुरूप, सुगंध-दुर्गंध हे चक्र अविरत असूनही सुखद तेवढेच हवे यासाठी आमची घालमेल असते. धन, मान, सत्ता, तारुण्य, आरोग्य, प्रतिष्ठा, प्रसिद्धी यातच सुख दडले आहे असा आमचा पक्का समज असतो.
क्रीडा कौशल्याने चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झालेले खेळाडू सुखाच्या अत्युच्च शिखरावर असतात. मात्र सामना जिंकण्यात ते जर अपयशी ठरले तर त्याच लोकांकडून झालेल्या अपमानाचा दु:खद अनुभव त्यांच्या जिव्हारी लागतो. अपार धनसंपदा असणाऱ्याला ही संपत्ती कायम राहील ना, ही चिंता जाळत असते. म्हणून हात लावीन तिथे सोने अशी मिडास स्पर्शाची हाव त्याला भुलवते. हात धुवून पाठी लागलेला काळ तारुण्याचे सुख हिरावून नेतो. दबा धरून बसलेले रोग धडधाकट शरीराला जर्जर करतात. सत्तेच्या सिंहासनावर काटेरी गादी असते. हिटलरला खऱ्या अर्थाने सुख लाभले असे म्हणता येईल का? सुखाची कल्पना सापेक्ष असते. कोणाला म्युन्सिपालिटीने चोवीस तास मुबलक पाणी दिले तरी सुख लाभते. दोन वेळ भरपेट जेवण म्हणजे कोणाला सुखाची परमावधी वाटते. बुकं शिकण्याची संधी कोणाला भाग्याची वाटते. स्वत:चे शानदार घर, पार्किंगची प्रशस्त जागा पण मुलांना खेळण्यासाठी अंगणाचे सुख नसते. दूरदर्शन, इंटरनेटच्या आभासी सुखाच्या जाळ्यात फसलेल्या मुलांमुळे वस्तीतील क्रीडांगणे ओस पडली आहेत. अभ्यासाचे सुख हरवले, त्या जागी गळेकापू स्पर्धा आली. खूप शिक्षण, लठ्ठ पगार यामागे धावण्यात मानसिक सुखे सुटत चालली.
या संदर्भात रशियन बालकथांमधल्या ‘देनिसच्या गोष्टीं’ची मला तीव्रतेने आठवण येते. देनिसचे घर राजवाड्यासारखे. शाळेतून परतल्यावर तो कामावरून परतणाऱ्या आई-बाबांची कुलूपबंद दाराशी रोज वाट पाहातो. तेव्हा शेजारचा मित्र त्याला सोबत करतो. देनिसची किल्लीने धावणारी निर्जीव खेळणी मित्राला आवडतात तर मित्राची सोबत त्याला खूप भावते.
एक दिवस परतल्यावर आईला सुखानी फुललेला देनिस दिसतो. उजेडाची उघडझाप करणारा मुठीतला जिवंत काजवा तो आईला दाखवतो. त्याचे धपापणे, उघडणे, मिटणे पाहण्यासाठी आपली महागडी खेळणी त्याने मित्राला दिली असतात!
सुखामागे धावताना आम्ही जगण्याला मुकतो आहोत हे सांगणारी ही अर्थपूर्ण कथा आहे.
-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे