विद्यापीठाची इभ्रत वेळूकरांच्या हाती
By Admin | Updated: March 8, 2015 23:51 IST2015-03-08T23:51:57+5:302015-03-08T23:51:57+5:30
समाजकारणातील आणि विशेषत: शैक्षणिक क्षेत्रातील महानुभावांच्या मते जगाच्या पाठीवरील सर्वाधिक निलट असा कोणी प्राणी असेल तर तो राजकारणी.

विद्यापीठाची इभ्रत वेळूकरांच्या हाती
समाजकारणातील आणि विशेषत: शैक्षणिक क्षेत्रातील महानुभावांच्या मते जगाच्या पाठीवरील सर्वाधिक निलट असा कोणी प्राणी असेल तर तो राजकारणी. सत्ता मिळवण्यासाठी, ती कायम राखण्यासाठी आणि चुकून हातून निसटलीच तर ती पुन्हा प्राप्त करण्यासाठी राजकारणी वाट्टेल त्या थराला जाऊ शकतो, असा या लोकांचा अभिप्राय असतो. तो फार चुकीचा असतो, असे अजिबात नाही; परंतु राजकारण्यांच्या लोचटपणावर आणि त्यांच्या सत्ताकांक्षेवर आघात करीत असताना, आम्ही मात्र त्यातले नाही, असे सांगण्याचा आणि समाजावर तेच बिंबविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण त्यांचा हा प्रयत्न किती केविलवाणा असतो, हे अलीकडच्या काळात वारंवार प्रत्ययास येते आहे. शिक्षणासारख्या पवित्र मानल्या जाणाऱ्या क्षेत्राला कोणे एकेकाळी समाजात निश्चितच एक वरचढ स्थान होते आणि ‘सीझरची पत्नी संशयातीतच असली पाहिजे’ या इंग्रजीमधील वेदवाक्यानुसारच या क्षेत्रातील लोकांचे आचरण राहत आले आहे. परंतु मुंबई विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू राजन वेळूकर यांच्याकडे पाहिले असता, समाजाचे एकूणच स्खलन किती खोलपर्यंत जाऊन पोहोचले आहे, याची कल्पना करता येते. वास्तविक पाहता, मुंबई विद्यापीठाकडे बघण्याची देशातील आणि परदेशातीलही लोकांची दृष्टी तशी वेगळी व आदराचीच राहत आली आहे. दीर्घकाळ या विद्यापीठाने राखलेला आपला दर्जा आणि गुणवत्ता यामुळे केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशातील बहुतेक विद्यापीठांच्या स्नातकांच्या तुलनेत मुंबई विद्यापीठाच्या स्नातकांना वेगळे स्थान प्राप्त होत होते. पण ही स्थिती फार काळ टिकून राहिली नाही वा विद्यापीठाच्या कारभाऱ्यांनीच जणू चंग बांधून या स्थितीचे दु:स्थितीत रूपांतर करण्यास प्रारंभ केला. महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कन्येचे गुण वाढवून देण्याची घटना उघडकीस आली आणि तेथूनच बहुधा मुंबई विद्यापीठाचे गुणांकन घसरण्यास सुरुवात झाली. याच विद्यापीठाचे कुलगुरु राहिलेले शशिकांत कर्णिक यांनी राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असताना जे कथित घोटाळे केले, त्यात विद्यापीठाचा काहीही संबंध नसला तरी बदनामी विद्यापीठाचीच झाली. आणि आता हे विद्यापीठ गाजते आहे, ते राजन वेळूकर यांच्यामुळे. अर्थात ते गाजण्यास प्रारंभ तसा खूप आधी म्हणजे वेळूकर कुलगुरुपदाच्या आसनात स्थानापन्न झाले, त्याच दिवसापासून झाला. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुुरुपदासाठी जी किमान गुणवत्ता अनिवार्य आहे, तिचाच वेळूकरांपाशी पत्ता नसल्याचा आक्षेप घेऊन त्यांची नियुक्ती विखंडित केली जावी अशी याचिका विद्यापीठाचेच एक माजी प्र-कुलगुरूए. डी. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केली. तब्बल साडेचार वर्षांचा काळ उलटून गेल्यानंतर न्यायालयाने सदर याचिकेवर आपला निवाडा जाहीर केला आणि वेळूकर यांची गुणवत्ता नव्याने तपासण्यासाठी शोध समिती नियुक्त करावी आणि तोवर वेळूकरांनी विद्यापीठात जाऊ नये, असे म्हटले. उच्च न्यायालयाच्या या आदेशाची दखल घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलसचिव सी. विद्यासागर राव यांनी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू नरेशचन्द्र यांना प्रभारी कुलगुरूम्हणून नेमूनही टाकले. खरे तर उच्च न्यायालयाने सरळसरळ वेळूकरांना अपात्र घोषित केले, तिथेच आत्मसन्मानाची चिंता वा चाड बाळगणाऱ्या कोणीही राजीनामा देऊन मोकळे झाले असते. पण वेळूकर सर्वोच्च न्यायालयात गेले. या वरिष्ठ न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निवाड्यातील दोन्ही बाबींना तूर्तातूर्त स्थगिती दिली. त्यावर कुलपतींनीही चपळाई करून वेळूकरांनी पुन्हा कारभार पाहण्यास सुरुवात करावी असा आदेश जारी केला. सर्वोच्च न्यायालयातील वेळूकरांच्या दाव्याचा अंतिम निकाल येईपर्यंत कुलपतींनी धीर धरला असता, तर आकाश कोसळणार नव्हते. तसे झाले असते आणि सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निवाडा खारीज करून टाकला असता, तर तावून सुलाखून बाहेर पडलेले वेळूकर आपला येत्या जुलैपर्यंतचा कार्यकाळ सुखेनैव पार पाडू शकले असते. वेळूकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यापूर्वी संबंधित निवड समितीने किमान अर्हता तपासली नसावी वा वेळूकर त्याआधीच कुलगुरुपद उपभोगून मोकळे झाले असल्याचे बघून समितीने अन्य बाबींकडे डोळेझाक केली असावी. मुंबई विद्यापीठात नेमले जाण्यापूर्वी वेळूकर नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू होते. पण आश्चर्य म्हणजे, तेथेही त्यांच्या गुणवत्ता आणि शैक्षणिक पात्रता याविषयी आक्षेप घेतले होते. तरीही त्यांनी नाशकातील कार्यकाळ पूर्ण केला. याचा अर्थ मुक्त विद्यापीठातील त्यांची कारकीर्द अगदी धवल होती, असे अजिबातच नाही. मुक्त वा विमुक्त अशा कोणत्याही शिक्षणाच्या भानगडीत न पडता त्यांनी शिक्षणबाह्य बाबींवरच अधिकचा जोर दिला. विद्यापीठाच्या आवारात प्रशस्त इमारती उभारण्याखेरीज फुलपाखरू उद्यान वा बिबट्या पार्क यांसारख्या अव्यवहार्य योजनांमध्येच त्यांनी जास्तीचा रस घेतला. कुलगुरुपदाची दुहेरी सत्ता उपभोगूनही त्यांचे अद्याप समाधान झाले नसले तरी आज विद्यापीठाची इभ्रत त्यांच्याच हाती असून, ती आता तरी त्यांनी वाचवावी.