गुलशन-ए-ब्लास्ट

By Admin | Updated: April 6, 2016 04:54 IST2016-04-06T04:54:11+5:302016-04-06T04:54:11+5:30

शेजाऱ्याच्याघरात आग लावण्याची स्वप्ने पाहावीत आणि शेजार पेटण्याच्या आधी स्वत:चेच घर रोज थोडे थोडे जळावे, अशी काही गत पाकिस्तानची झाली आहे

Gulshan-e-Blast | गुलशन-ए-ब्लास्ट

गुलशन-ए-ब्लास्ट

शेजाऱ्याच्याघरात आग लावण्याची स्वप्ने पाहावीत आणि शेजार पेटण्याच्या आधी स्वत:चेच घर रोज थोडे थोडे जळावे, अशी काही गत पाकिस्तानची झाली आहे. दहशतवाद्यांना पोसून भारताला कायम अस्थिर ठेवण्याचे मनसुबे बाळगणारा पाकिस्तान स्वत: मात्र अस्थिरतेतून बाहेर पडू शकलेला नाही. लाहोर शहराच्या पूर्व भागात असलेल्या गुलशन-ए-इक्बाल नावाच्या पार्कमध्ये रविवारी गर्दीच्या दिवशीच दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला; त्यातून पुन्हा एकदा हेच अधोरेखित झाले. या पार्कमध्ये घडविण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात तब्बल ७२ निष्पाप पाकिस्तानी नागरिकांचा बळी गेला आणि अडीचशेहून अधिक जण जखमी झाले. ज्यांनी हे दुष्कृत्य केले ते पाकिस्तानातच वाढलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते. गेल्या तीन महिन्यांमध्ये पाकिस्तानात एकूण १३ दहशतवादी हल्ले झाले असून, त्यात जवळपास दीडशे लोकांचा बळी गेला आहे. भारताला कायम धुमसत ठेवण्यासाठी पाळलेले दहशतवाद्यांच्या रूपातील साप पाकिस्तानलाच डंख करू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्य:स्थितीत पाकिस्तानात एकूण ४८ दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्यातल्या तब्बल १२ संघटना पाकिस्तानातच जन्माला आलेल्या आहेत. लाहोरमध्ये नुकताच झालेला हल्ला हा अशाच स्वगृही जन्मलेल्या ‘जमात-उल-अहरार’ या दहशतवादी संघटनेची ‘कृपा’ ठरली आहे. ‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या संघटनेपासून विभक्त झाल्यानंतर या संघटनेने अधिक क्रूरपणे हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया संघटनेसोबत अर्थात इसिससोबत ‘जमात-उल-अहरार’चा संबंध असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे पाकिस्तानवर किती मोठे संकट येऊ घातलेय, याची जाणीव एव्हाना नवाज शरीफ यांच्या सरकारला व्हायला हवी होती. इसिससोबत संबंध ठेवणाऱ्या संघटना जर पाकिस्तानात पोसल्या जाणार असतील तर इराक आणि सीरियामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे, तीच स्थिती पाकमध्येही उद्भवेल, यात तिळमात्र शंका नाही. इसिसने इराक-सीरियात घातलेला धुमाकूळ आणि इतर पश्चिमी देशांवर केलेले हल्ले नजरेसमोर आणले तर मुस्लीम राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानवर इसिसच्या रूपातील मोठे संकट येऊ घातले आहे हे निश्चित. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिकेकडून कोट्यवधी डॉलरचा निधी खिशात घालणारा पाकिस्तान असेच जर वागत राहिला तर तेथील जनतेला आपल्याच देशात राहणे नकोसे होईल आणि पाक म्हणजे कायम बॉम्बस्फोटांनी धुमसत राहणारे गुलशन-ए-ब्लास्ट’ होऊन जाईल.

Web Title: Gulshan-e-Blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.