भारतातील वाढते श्रीमंत आणि श्रीमंती
By Admin | Updated: October 23, 2014 01:52 IST2014-10-23T01:52:18+5:302014-10-23T01:52:18+5:30
गेल्या ६४ वर्षांत भारतासारख्या खंडप्राय देशाची प्रगती व विकास लक्षणीय प्रमाणात झाला आहे. १९५० च्या दशकात काँग्रेस पक्षाने व शासनाने समाजवादी समाजरचना आणण्याचे धोरण स्वीकारले

भारतातील वाढते श्रीमंत आणि श्रीमंती
ज. शं. आपटे
लोकसंख्या अभ्यासक
गेल्या ६४ वर्षांत भारतासारख्या खंडप्राय देशाची प्रगती व विकास लक्षणीय प्रमाणात झाला आहे. १९५० च्या दशकात काँग्रेस पक्षाने व शासनाने समाजवादी समाजरचना आणण्याचे धोरण स्वीकारले. ६४ वर्षांनंतर आपल्या देशाची प्रगती व विकास औद्योगिक, वैद्यकीय, अभियांत्रिकी, विज्ञान, शिक्षण व आरोग्य आदी क्षेत्रांत विशेष चांगल्या प्रकारे झाला आहे. या विकसित, प्रगतीत नियोजन मंडळाचे व त्याने आखलेल्या व अमलात आणलेल्या ११ पंचवार्षिक योजनांचे योगदान व कामगिरी महत्त्वपूर्ण व विशेष महत्त्वाची ठरली आहे, हे नाकारून चालणार नाही. भाक्रा-नानगलची धरणे, वैज्ञानिक प्रयोगशाळा, साक्षरता व शिक्षण प्रसार, वाढलेले आयुर्मान, प्रशिक्षित श्रमशक्ती ही त्या विकासाची काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. यादी खूप लांबविता येईल. औद्योगिकीकरण, शहरीकरण, आधुनिकीकरण हे तीन प्रमुख घटक भारताच्या विकासासाठी व प्रगतीसाठी कारणीभूत आहेत.
औद्योगिक क्षेत्रात टाटा, वाडिया, गोदरेज, बिर्ला, बजाज, अंबानी आदी कंपन्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यापैकी काही उद्योगसमूहांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच औद्योगिकीकरण क्षेत्रात कार्यरत होत्या व त्या आजही आहेत. जुलै १९६९ मध्ये भारतातील १९ बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर छोट्या-छोट्या उद्योगांना भांडवल उपलब्धता सुलभ झाली. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली. १९८० च्या दशकात पंतप्रधान राजीव गांधी यांनी संगणक साक्षरतेस प्रोत्साहन दिल्यामुळे कॉम्प्युटर क्रांतीची बीजे रोवली गेली. १९९०च्या दशकातील आर्थिक सुधारणांमुळे खासगीकरण, उदारीकरण जागतिकीकरणाचा नवा कालखंड सुरू झाला आणि त्यामुळे एक नवा नवश्रीमंत मध्यमवर्ग उदयास येण्याचा प्रारंभ झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर २५-३० वर्षे महाराष्ट्रात जिल्हा, तालुका, मोठी गावे पातळीवर जनसामान्यांचे दुचाकी-सायकल हे वाहन सर्वत्र दिसत होते. १९८० च्या दशकानंतर टू व्हीलर-स्कूटर- स्कुटी, मोटर बाईक हे वाहन रस्त्यावर दिसू लागले. पुणे शहर पूर्वी सायकलींचे शहर मानले जात असे. आता ते टू व्हीलरचे शहर झाले आहे. नवश्रीमंत झालेल्या कनिष्ठ, मध्यमवर्गीयांना हे वाहन विशेष उपयुक्त ठरले आहे. ज्या घरात आईवडील, भाऊ, बहिणी आदी तीन-चार माणसे नोकरीसाठी बाहेर पडतात, त्या घरात प्रत्येकास एक टू व्हीलर घेण्याची आर्थिक क्षमता, परिस्थिती निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती थोड्याफार फरकाने जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे. पूर्वी टू व्हीलरसाठी आधी नोंदणी करून ती ८-१० महिन्यांनी कधी वर्षांनी मिळत असे. आता एखादी वस्तू दुकानातून खरीदावी तशी टू व्हीलर खरीदता येते. १९८५च्या दशकात सुरू झालेली कॉम्प्युटर क्रांती १९९० च्या दशकात नवी गती, वेग, दिशा घेऊन अनेकांना आकर्षित करीत आहे. अभियांत्रिकी, विज्ञान,
इतर शिक्षण क्षेत्रातील पदवीधर, आयटी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील लोक देशी-विदेशी कंपन्यांत मोठ्या संख्येत नोकरी करू लागले आहेत. पगार संस्कृतीतून ते पॅकेज संस्कृतीत स्थिरावलेत. पाच, सहा, सात आकडी रकमेचे हे पॅकेज असते. या क्षेत्रातील नोकरदार दोन-तीन वर्षांत आपली नोकरी बदलतात. नोकरी बदलली नाही तर त्यांच्यात काही कमी आहे असे मानले जाते. या क्षेत्रातील अनेक विदेशात विशेषत: अमेरिकेत नोकरी पत्करतात अथवा अमेरिकन कंपनीचे काम भारतात राहून करतात. नवश्रीमंत संख्येत यांची खूप भर पडली आहे. नोकरी बदलल्याचे कारण असते मुख्यत: टङ्मल्ली८ २ं३्र२ा्रूं३्रङ्मल्ल, जॉब सॅटिफॅक्शन नव्हे! १९९५ नंतर मोबाईल फोनचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. मोबाईल फोनने दूर वा जवळच्या संवाद क्षेत्रात फार मोठी क्रांती केली आहे. त्यामुळे निर्णयतत्परता, माहिती देण्या-घेण्याची गती वाढली आहे. कामाचा उरक वाढला आहे. सारे जण मोबाईलमुळे खूप जवळ आले आहेत. नवश्रीमंत वर्गाने या मोबाईलचा तातडीने तत्परतेने स्वीकार केला व भारीतील
भारी मोबाईल खरीदण्यास सुरुवात केली. नवश्रीमंत वर्गाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे आधुनिक फोर व्हीलर, स्मार्ट
फोन, ऐसपैस घरातील विशेष सजावट, घरातील कार्यक्रम, साखरपुडा, विवाह, बारसे, आतिथ्य नजरेत भरण्याजोगे असते. या नवश्रीमंत वर्गात भर पडली आहे, ती पाचव्या, सहाव्या वेतना आयोगामुळे भरगच्च पगारवाढ झालेल्या केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांची. सर्वच क्षेत्रांतील या भरमसाठ पगारवाढीमुळे साऱ्यांचे आर्थिक स्तर, दर्जा, स्थान वाढले आहे. भौतिक सुखातील वाढीमुळे आत्ममग्न, आत्मकेंद्रित जीवनशैलीतच सुख मानण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल. जसे दारिद्र्याचे प्रश्न आहेत, तसेच अतिसमृद्धीचे प्रश्न आहेत. महात्मा गांधी म्हणाले, ‘तळागाळातील शेवटच्या माणसाच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याची तयारी ठेवा. वृत्ती असू द्या, हे अगदी खरे आहे. त्यांच्या जीवनात स्थैर्य, स्वास्थ्य, सौख्यसमाधान आणणे यातच नवश्रीमंत वर्गाच्या जीवनाचे सार्थक आहे.