ग्रामपंचायतींची दंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 01:40 AM2017-10-21T01:40:52+5:302017-10-21T01:41:55+5:30

विदर्भातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका अलीकडेच पार पडल्या. प्रथमच थेट सरपंच निवडीची पद्धत स्वीकारण्यात आल्यामुळे या निवडणुकांकडे या देशाच्या पंतप्रधानांचेही लक्ष लागले होते.

 Gram Panchayats' Election & Results | ग्रामपंचायतींची दंगल

ग्रामपंचायतींची दंगल

Next

विदर्भातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका अलीकडेच पार पडल्या. प्रथमच थेट सरपंच निवडीची पद्धत स्वीकारण्यात आल्यामुळे या निवडणुकांकडे या देशाच्या पंतप्रधानांचेही लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांपासून तर विविध राजकीय पक्षांच्या सर्वच बड्या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा यात पणास लावली. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर ग्रामीण भागातील मतदार विशेषत: तरुण वर्ग कमालीचा खूश असल्याने तो आपल्यालाच मतदान करेल व या निमित्ताने ग्रामीण भागातील आपले स्थान अधिक बळकट करता येईल, हा राज्यातील फडणवीस सरकारचा होरा होता. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमागील गणित हेच होते. मुख्यमंत्री फडणवीस यात बºयाचअंशी यशस्वीदेखील ठरले. एरवी शहरी भागापुरता मर्यादित असलेला भाजप आता ग्रामीण भागातही अधिक मजबूत झाला आहे. या पक्षाचा मतदार वर्ग वाढला आहे, हे या निवडणुकीतून दिसून आले. पण, त्याचवेळी मागील तीन वर्षांपासून गर्भगळीत अवस्थेत असलेली काँग्रेस पुन्हा नव्या जोमाने उभी राहत आहे, किंबहुना गमावलेला जनाधार या राष्ट्रीय पक्षाकडे वळत आहे हे वास्तवही या निवडणुकीतून समोर आले. पण, ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाबद्दलचे ठोकताळे बांधणे धाडसाचे असते. या निवडणुका वैयक्तिक पातळीवरच अधिक लढल्या जातात. जातीपेक्षा पोटजाती आणि गणगोतांच्या मतांचा आधार महत्त्वाचा असतो. हे गणगोत राजकीय पक्षांच्या भिंती तोडून मतदान करीत असतात. या निवडणुकीच्या निकालातून आपला पक्ष मजबूत झाला आहे, असे कोणत्याही राजकीय पक्षाने समजू नये. याचे कारण असे की ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांची कधी चर्चा होत नाही. इथे देवाच्या आणि धर्माचेही वाद-विवाद रंगविले जात नाहीत. धार्मिक दंगली उफाळल्या तर त्याचा आपल्याला फायदा मिळेल, असे कटकारस्थान कुणाला रचताही येत नाही. फार काय तर ज्या गावात ही निवडणूक होते त्या गावातील नागरी समस्यांचीही चर्चा सबंध निवडणुकीच्या काळात होताना दिसत नाही. गटातटाच्या राजकारणातून निर्माण झालेल्या स्थानिक आघाड्यांपुरता हा रागरंग असतो. निवडणुकीनंतर मात्र राजकीय पक्ष आणि त्यातल्यात्यात सत्ताधारी पक्ष गावाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करून पुढचे राजकारण खेळू शकतात. निवडणूक निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी केलेले दावे म्हणूनच हास्यास्पद ठरतात. कुरघोडीच्या राजकारणाचा भाग म्हणून हे समजून घेता येईल. पण, दीर्घ राजकारणाच्या दृष्टीने या गोष्टी या पक्षांसाठीच घातक ठरू शकतात.

Web Title:  Gram Panchayats' Election & Results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.