सिरोंचाची सुवार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 12:38 AM2018-04-06T00:38:01+5:302018-04-06T00:38:01+5:30

आदिवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल, अशा शब्दात हजारो वंचितांची डोकी भडकवून त्यांच्या हातात बंदूक देणाऱ्या नक्षलवादाने या देशाला वेठीस धरले आहे.

 Good News of Sironchha | सिरोंचाची सुवार्ता

सिरोंचाची सुवार्ता

Next

आदिवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल, अशा शब्दात हजारो वंचितांची डोकी भडकवून त्यांच्या हातात बंदूक देणाऱ्या नक्षलवादाने या देशाला वेठीस धरले आहे. या नक्षल्यांनी गडचिरोली जिल्हयात तर नुसता हैदोस घातला आहे. जिल्ह्याच्या टोकावरील सिरोंचा तालुका तर नक्षल्यांचे आवडते ठिकाण. या ठिकाणावरूनच नक्षल्यांनी आधी महाराष्ट्र आणि नंतर छत्तीसगडमध्ये प्रवेश करून दहशतीचा विस्तार केला. परंतु आता याच सिरोंचातून एक सुवार्ता कानी येत आहे. मंगळवारच्या चकमकीत पोलिसांनी नक्षल नेता सुनील कुळमेथे व त्याची पत्नी स्वरूपा यांचे एन्काउंटर केल्यानंतर नक्षल्यांना मोठा हादरा बसला बसून ३५ वर्षांपासून येथे सुरू असलेल्या लाल दहशतीचे पर्व आता संपल्यात जमा आहे. नक्षल चळवळीच्या उदयानंतर जेव्हा या चळवळीतल्या धुरीनांनी आपला कार्यविस्तार करण्याचे ठरवले तेव्हा सर्वप्रथम त्यांची नजर महाराष्टÑ, छत्तीसगडमधील जंगलाकडे गेली. हा प्रदेश नक्षल चळवळ फोफावण्यासाठी पोषक असल्याचे हेरून तत्कालीन आंध्र प्रदेशात येणाºया करीमनगर जिल्ह्यातून गोदावरी पार करून नक्षल्यांनी गडचिरोली जिल्हयात प्रवेश केला आणि गडचिरोलीत जिल्ह्याचा बहुतांश भाग व्यापत छत्तीसगडच्या जगदलपूर, बस्तर, राजनांदगाव व इतर जिल्ह्यांमध्ये पाय पसरत आपला जम बसविला. सिरोंचा तालुका तर नक्षल्यांच्या लेखी आवडते ठिकाण होते. परंतु पोलिसांच्या चौफेर अन् काटेकोर नियोजनामुळे येथे हिंसक कारवाया कमी व्हायला लागल्या होत्या. परंंतु ‘रेस्ट झोन’ म्हणून या तालुक्याला नक्षली अजूनही सुरक्षित ठिकाण समजत होते. पण, गेल्या ६ डिसेंबरला कल्लेडच्या जंगलात पोलिसांनी एकावेळी ७ नक्षलींचा बळी घेतला. ३ एप्रिलला पुन्हा चकमकीत तिघांना टिपले. या मोठया हानीनंतर सिरोंचा तालुक्यातूच आता नक्षल चळवळ हद्दपार होण्यास सुरूवात झाली आहे. पण, म्हणून लगेच हुरळून जाणे योग्य होणार नाही. ज्या कारणामुळे येथील तरुणांनी बंदुका हाती घेतल्या ती कारणे आजही कायम आहेत. ही संपत आलेली चळवळ पुन्हा डोके वर काढू नये असे सरकारला वाटत असेल तर आधी ही कारणे संपवावी लागतील. हा जिल्हा अजूनही उद्योगरहित आहे. हजारो आदिवासी आजही जंगलावर निर्भर आहेत. आजही येथे रुग्णांना खाटेवर लोटवून रुग्णालयात आणले जाते. सरकारी अधिकारी येथे काम करायला तयार नाहीत. येथे राहणारे मागसलेले असले तरी शेवटी माणसे आहेत. त्यांनाही भावना-अपेक्षा आहेत आणि अपेक्षाभंग हे विद्रोहाचे पहिले कारण असते. म्हणून सरकारने या भागात त्वरित पायाभूत सुविधांचे जाळे उभारावे. येथील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले तर ते बंदुकीकडे वळणार नाहीत आणि आज केवळ सिरोंच्याहून आलेली ही सुवार्ता उद्या अवघा गडचिरोली जिल्हा व्यापून उरेल.

Web Title:  Good News of Sironchha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.