विकासाच्या नावानं चांगभलं !
By Admin | Updated: January 5, 2015 02:11 IST2015-01-05T02:11:17+5:302015-01-05T02:11:17+5:30
मुंबईत लोकल रेल्वे विस्कळीत झाली आणि दिवा स्टेशनवर प्रवाशांच्या भावनांचा उद्रेक झाला. नव्या वर्षाच्या आरंभी झालेल्या या घटनेनंतरचे कवित्व आता सुरू झाले आहे

विकासाच्या नावानं चांगभलं !
अतुल कुलकर्णी -
मुंबईत लोकल रेल्वे विस्कळीत झाली आणि दिवा स्टेशनवर प्रवाशांच्या भावनांचा उद्रेक झाला. नव्या वर्षाच्या आरंभी झालेल्या या घटनेनंतरचे कवित्व आता सुरू झाले आहे. देशाच्या तिजोरीत लक्षावधी कोटींचा महसूल मुंबई देते़ त्या बदल्यात मुंबईकरांना साध्या सोयी मिळत नाहीत, या सनातन प्रश्नापासून ते आदळणारे लोंढे कधी थांबणार, इथपर्यंतचे सगळे विषय आता या ना त्या निमित्ताने चर्चेला येतील. दुसरा एखादा नवा विषय मिळेपर्यंत ती चर्चा अशीच चालू राहील. मुंबईकरांना सगळ्या सोयी मिळतात, बाकी विभागाने काय घोडे मारले, असाही सूर निघेल. मात्र दूरगामी परिणामांसाठी कोणीच पुढे येणार नाही.
मुंबईतल्या वाढत्या लोंढ्यांचे प्रत्येक पक्षाने आपापल्या सोयीने राजकारण करून घेतले. मतांच्या राजकारणापलीकडे त्यांना चार सोयीसुविधा द्याव्या लागतात, यावर मात्र कोणाचेही एकमत नाही. बोरीवली ते वरळी या मार्गावर साधे टॉयलेट नाही. एखाद्या मधुमेही व्यक्तीला लघुशंका करायची झाली तर त्याला कोठेही सोय नाही आणि हा सगळा प्रवास कमीत कमी दीड आणि जास्तीत जास्त किती तासांचा होईल, हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. एवढी साधी सोय वर्षानुवर्षे महापालिकेचा गाडा सांभाळणारे करू शकलेले नाहीत तर दूरवर दिल्लीत बसणारे सरकार लोकल रेल्वेसाठी कोठून सुविधा देणार? चर्चगेट ते विलेपार्ले आणि सीएसटी-चेंबूर या मार्गावर सरकारने साधे हॉस्पिटल सुरू करायचे ठरवले तरीही त्यांच्याकडे जागा शिल्लक उरलेली नाही. आहे त्या शासकीय जागा मोठमोठ्या बिल्डरांनी तरी घेतल्या आहेत किंवा सरकारने तरी बार्टरमध्ये देण्याचे प्रस्ताव करून ठेवले आहेत. विविध ठिकाणी कामं करणारे चाकरमानी सकाळी ठाणे, डोंबीवली, कल्याणहून मुंबईत येतात आणि रात्री पुन्हा परत जातात. बाहेर गेलेली व्यक्ती घरी सुखरूप येईल की नाही, याची खात्री कोणीही देऊ शकत नाही, एवढी अस्थिरता या शहरात आहे. कितीही भयंकर संकट आले तर मुंबईकर पुन्हा उठून कामाला लागतो, याला मुंबईकरांची दिलेरी म्हणून कौतुक केले जातो; मात्र तो मजबुरीतून पुन्हा कामाला लागतो, हे कोणीच पाहात नाही. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातून चाकरमानी मंडळी मुंबईत येतात. त्यांच्यासाठीही मुंबईत कसल्या सोयी नाहीत आणि कुटुंब कबिला ज्या कोकणात सोडून ते येथे आले त्यांच्यासाठीही काहीच नाही, असे वास्तव आज सभोवताली आहे. साधा पनवेल ते गोवा महामार्ग. कोकणातले १६ तालुके या महामार्गावर आहेत. बहुतांश पर्यटनस्थळे देखील याच मार्गावर आहेत. यामुळे संपूर्ण कोकणात क्रांती घडेल़ तो मार्ग पूर्ण होण्यासाठी गेली पाच वर्षे पत्रकार आंदोलन करीत आहेत. कोकणातले लोकप्रतिनिधी मात्र यासाठी टोकाचे उदासीन आहेत.
पर्यटनाच्या शेकडो शक्यता या भागात असतानाही त्याचा वापर केला जात नाही. नुसता समुद्र पाहून पर्यटक काय करणार? पण त्याला पुरक सोयी देण्याची मानसिकता कोणाचीही नाही. तारकर्लीला डॉल्फीन दिसतात, कोरल्स आहेत; पण तेथे जाण्यासाठी खड्डेयुक्त रस्ते पार पाडत आठ ते दहा तास लागत असतील तर पर्यटक कसा कोकणात जाणार? तारकर्लीपर्यंत चांगला रस्ता पाच वर्षे मागच्या सरकारने केला नाही. जगभरातले पर्यटक मुंबईत येतात आणि विमानतळावरूनच दुसऱ्या राज्यात जातात. मुंबईचा वापर केवळ प्लॅटफॉर्मसारखा होत असताना त्याचा आम्हाला खेद ना खंत.
येणारा पर्यटक मुंबईत एक दिवस थांबावा, असे एकही काम आम्ही विकसित केलेले नाही आणि मुंबईच्या नावाखाली कोकणाकडेही कायम दुर्लक्षच केले आहे. मुंबईत नवीन उद्योगांसाठी जागा नाही आणि कोकणात जागा असून कोणी घ्यायला येत नाही. सिंधुदुर्ग, रत्नागिरीत आहे त्या जागादेखील उद्योजकांना देण्यात एमआयडीसीचे अधिकारी आडकाठी करतानाचे चित्र आहे. तुम्हाला जागा मिळेल, आमचे काय, असा सवाल ते विचारत असल्याची तक्रार मुंबई एमआयडीसीतले उद्योजक करताना दिसतात. अशा परिस्थितीत नवे वर्ष सुरु झाले आहे. वर्षअखेरीस हे चित्र बदललेले दिसेल, अशी आशा करण्यापलीकडे आपण काय करू शकतो?
जाता जाता
मध्यरात्रीपर्यंत दारू पिऊन, डिस्कोत डान्स करून नववर्ष साजरे करताना जास्ती पिलेल्यांना घरी सोडण्याची जबाबदारी बारमालकांवर घातली गेली. त्याच नववर्षाच्या रात्री १ ते पहाटे ५ वाजेपर्यंत पं. हृदयनाथ मंगेशकरांनी अवीट गोडीची मराठी गाणी दीनानाथ नाट्यगृहात सादर केली. नववर्षाची सुरुवात तरी चांगली झाली; सगळचं काही वाईट नाही, हे खरे.