देवच रक्षणकर्ता!
By Admin | Updated: August 18, 2016 06:24 IST2016-08-18T06:24:33+5:302016-08-18T06:24:33+5:30
कोलंबसाला अमेरिकेचा किंवा वास्को-द-गामाला भारताचा शोध लागल्यानंतरही जितका उत्साह आणि आनंद आसमंतात पसरला नसेल त्याहून अंमळ अधिकच उत्साह आणि आनंद महाराष्ट्राचे

देवच रक्षणकर्ता!
कोलंबसाला अमेरिकेचा किंवा वास्को-द-गामाला भारताचा शोध लागल्यानंतरही जितका उत्साह आणि आनंद आसमंतात पसरला नसेल त्याहून अंमळ अधिकच उत्साह आणि आनंद महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव यांना मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी म्हणजे राजभवनात लागलेल्या भुयाराच्या शोधाने पसरला असावा असे दिसते. हे भुयार तब्बल पाच हजार चौरस फुटांचे असून सुमारे पाचशे फूट लांब असलेल्या या भुयारात एक-दोन नव्हे तेरा खोल्या आहेत आणि सांडपाण्याच्या निचऱ्याची आणि वायूविजन होण्याचीही चोख व्यवस्था आहे. हे भुयार नेमके पोर्तुगीजांनी बांधले की ब्रिटिशांनी हे कोणालाही ठाऊक नाही. पण या भुयारावरील इमारतीत म्हणजे राजभवनात गेल्या कित्येक वर्षांपासून बड्या सरकारी अंमलदारांचा वास आहे. आज इतक्या वर्षानंतर या भुयाराचा शोध कसा लागला याची कथाही तशी मजेशीरच. राजभवनात काम करणाऱ्या एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याकडून विद्यमान राज्यपालांना या भुयाराविषयी व त्याचे तोंड एका कच्च्या भिंतीने बंद करण्यात आल्याविषयी समजले. या कर्मचाऱ्याचे वडिलदेखील तिथेच कर्मचारी होते. त्याने दाखवलेली सदरहू भिंत ढासळविण्यात आली आणि भुयार समोर आले. याचा अर्थ आजवर तिथे राहून गेलेल्या एकाही राज्यपालास या कर्मचाऱ्याने जे सांगितले ते सांगितले नाही वा त्यांनीही कर्मचाऱ्यांना कधी विश्वासात घेतले नाही. पण प्रश्न तो नाहीच. राजभवनापासून सर्व सरकारी इमारतींची देखभाल सार्वजनिक बांधकाम खाते करते. राजभवन पोर्तुगीजांनी बांधलेले असो वा ब्रिटिशांनी, बांधकामाचे नकाशे नक्कीच उपलब्ध असणार. सत्तर वर्षांपूर्वीच ब्रिटीश भारत सोडून गेले पण आजही त्यांच्याकडे भारतात त्यांनी निर्माण केलेले पूल आणि इमारती यांचे नकाशे उपलब्ध आहेत आणि त्यांच्या आयुर्मानाविषयी तेच अजूनही भारताला कळवीत असतात. मग एकाही भारतीय अभियंत्यास वा वास्तुकारास राजभवनाचे नकाशे पाहाण्याची वा वास्तुकलेसंबंधी जाणून घेण्याची इच्छा झाली नाही असा याचा अर्थ होतो. एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास जे ज्ञात असते, ते अन्य कोणालाही ठाऊक नसते ही बाब एकूणच सरकारी अनास्थेवर पुरेसा प्रकाश टाकते. तथापि जी बाब एका कर्मचाऱ्याला ठाऊक असते ती बाब चुकून का होईना कुणा परक्याला ज्ञात झाली असती तर काय झाले असते? इतक्या मोठ्या भुयारात छुपेपणाने कुणी अतिरेकी घुसून बसले असते तर त्यातून कोणते अरिष्ट ओढवू शकले असते याचा साधा विचारच कापरे भरविणारा आहे. त्यामुळेच म्हणायचे, देवच रक्षणकर्ता आहे म्हणून बरे, एरवी काही खरे नाही!