जागतिक परिप्रेक्षात - डॉ़ आंबेडकर
By Admin | Updated: April 13, 2016 21:36 IST2016-04-13T21:36:21+5:302016-04-13T21:36:21+5:30
जागतिक पातळीवरसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास होताना दिसतो़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांचे वैशिष्ट्यच हे आहे

जागतिक परिप्रेक्षात - डॉ़ आंबेडकर
- अविनाश महातेकर
आपल्या देशात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना स्व[कारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जागतिक पातळीवरसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास होताना दिसतो़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांचे वैशिष्ट्यच हे आहे की, ते महानिर्वाणोत्तर वाढत जाताना दिसतात़ एखाद्या वटवृक्षाप्रमाणे ते वाढत जाताना दिसतात़ याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डॉ़ आंबेडकरांनी मांडलेला मानवमुक्तीचा जाहीरनामा हे होय़ त्यांनी समस्या नष्ट करण्याचा उपाय सुचवला़ अस्तित्वात असलेल्या व अनेक देशांना भुरळ पडलेल्या शोषणव्यवस्थेविरूद्धच्या कार्यक्रमातला धोका त्यांनी हेरला़ त्या विचारधारेच्या मोहापासून त्यांनी जगाला सावध केले़ जो जो नवी पिढी तयार होत जाईल आणि ज्ञानाच्या कक्षा रुंदावत जातील तो तो डॉ़ आंबेडकर तत्वज्ञानाच्या पातळीवर, कर्तृत्वाच्या पातळीवर दिग्विजयी ठरत जातील व त्यांना स्वीकारायची प्रक्रिया गतीमान होताना दिसेल! अशावेळी डॉ़ आंबेडकरांचे अनुयायी असणाऱ्यांवर व त्यांच्या विचारांचे प्रचारक असणाऱ्यांवर एक मोठी जबाबदारी येऊन पडते़ आपण जरी डॉ़ आंबेडकरांच्या ऋणात असलो आणि त्यांच्याशी निष्ठावान असलो तरी डॉ़ आंबेडकरांना योग्यरित्या सादर करणेही आपल्यावरची जबाबदारी आहे़ जगाची व्यापकता ही आपण समजून घेतली पाहिजे व त्याच व्यापक परिप्रेक्षातील नेता म्हणून डॉ. आंबेडकरांचे आकलन केले पाहिजे. त्याच व्यापक स्तरावर डॉ. आंबेडकरांना मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे़ आंबेडकरी चळवळ असे आपण म्हणतो, तेव्हा ती आपल्यावरची जबाबदारी आहे. बाबासाहेब काम करीत होते, तेव्हा त्यांना महाराष्ट्रातूनच मोठा पाठिंबा होता यात शंका नाही. पण त्यांच्या हयातीतच भारतातल्या विविध राज्यांतून त्यांना पाठबळ उभे राहात गेले, हीदेखील वास्तुस्थिती आहे़ डॉ़ आंबेडकरांचे विचारधन समग्ररित्या व इंग्रजी या महत्त्वाच्या भाषेत उपलब्ध झाल्यामुळे त्यातील विचारांचा प्रसार होऊ शकला़ डॉ़ आंबेडकरांविषयी असलेले गैरसमज दूर होण्यास मदत झाली़ जो जो विज्ञाननिष्ठ वास्तवाकडे आपण जात जाऊ तो तो आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करण्याशिवाय दुसरा पर्याय सापडणार नाही़ म्हणूनच, गेल्या साठ वर्षांत डॉ़ आंबेडकरांचा भारतभर प्रचार झालाय़ पण देशाच्या सीमा ओलांडून डॉ़ आंबेडकर नावाचा वारा वाहत आहे़ अनेक देशांनी डॉ़ आंबेडकरांशी त्यांचे नाते अधोरेखित करण्यासाठी मार्ग खुला केला आहे़ डॉ़ आंबेडकर हे एकमेव असे नेते आहेत की, ज्या घरात वास्तव्य करून त्यांनी अभ्यास केला त्या घराचे, तेही लंडनसारख्या शहरात, स्मारकात रूपांतर झाले आहे़ कोलंबिया विद्यापीठाच्या आवारात त्यांचा पुतळा बसवण्यात आला आहे़ तसेच त्या विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासनसुद्धा आहे़ अलिकडेच जपानमध्येही त्यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण झाले आहे़ एकाचवेळी अमेरिका, युरोप, आफ्रिकन देश व आशियायी देश या ठिकाणच्या लोकांचे लक्ष डॉ़ आंबेडकरांकडे वेधले गेले आहे़ प्रत्येक देशांचे प्रश्न, सांस्कृतिक वाद, राजकारण व धार्मिक प्रभाव वेगवेगळा असूनही त्यांच्यापलिकडे डॉ़ आंबेडकरांच्या विचारांचे आकर्षण त्यांना वाटू लागते, ही गोष्ट खूप मोठी आहे़ ढोबळमानाने चार प्रमुख मुद्द्यांवर जागतिक परिप्रेक्षातील डॉ़ आंबेडकर मांडता येतील़ डॉ़ आंबेडकर यांनी त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण करीत असताना अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, कायदा या विषयांचा अभ्यास केला होता़ त्यांच्या सामाजिक चळवळीची सुरुवात त्यांनी अस्पृश्यतेवर घणाघाती हल्ला चढवून केली़ भारतात अस्तित्वात असलीेली जातीव्यवस्था, त्यातून होणारे जातीय शोषण आणि अस्पृश्यता नावाची गुलामगिरी याविरुद्ध त्यांनी संघर्षाला सुरुवात केला़ त्याचवेळी जगातील अनेक देशात सुरू असलेले वांशिक शोषणाविरुद्धही त्या त्या देशातील वंचित समुहाचे जनमत तयार होत होते़ रशियात मजूर आणि कष्टकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध लढा उभा राहत होता़ मानवी शोषणासाठी झालेल्या विषम विभागणीविरुद्ध एक जागरुकता येत चालली होते़ हे लढे लढवणे सोपी गोष्ट नव्हती़ कारण या विषम विभागणीत पिळवणुकीचा आर्थिक-सामाजिक लाभ मिळवणाऱ्या वर्गाने सर्व सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठा आपल्या हातात ठेवली होती़ त्या जोरावर परंपरेचा वारसा सांगत विषम सामाजिक रुढी मोडण्यास ते विरोध करीत होते़ आफ्रिकन देशात अस्तित्वात असलेल्या गुलामगिरीपेक्षा भारतातील अस्पृश्यता ही भयानक गोष्ट होती, असे डॉ़ आंबेडकर मानत. अस्पृश्यता टिकून राहावी यासाठी त्याला धर्माचा आधार दिलेला होता. डॉ़ आंबेडकरांनी अतिशय कठोरपणे धर्माच्या आधारावरही टीका केली़ त्यासाठी त्यांना धार्माची निर्भत्सता करावी लागली़ शेवटी अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यास ते यशस्वी झाले़ जातीव्यवस्थाही त्यांनी बाद ठरवली़ तरीही वास्तव जीवनात त्याचा अडसर शिल्लक आहे़ पण कायद्याने त्यांनी ही व्यवस्था समाप्त केली़ जातीव्यवस्था व अस्पृश्यता या भयावह समाजवास्तवाच्या विरुद्ध लढत असताना डॉ़ आंबेडकरांना दोन पातळ्यांवर काम करावे लागले होते़ एका बाजुला सामाजिक विषमतेचे पुरस्कर्ते असलेल्यांना सडेतोड उत्तरे देणे, मर्माघाती प्रहार करणे ही जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती़ दुसऱ्या बाजुला ज्या समुहाला ते या शोषणातून मुक्त करू इच्छित होते, त्या समुहातही जागृती निर्माण करण्याचे मोठे काम त्यांच्याच खांद्यावर येऊन पडले होते़ रूढीग्रस्त शोषणाने पिचलेला माणून लुळा-पांगळा, मुका-बहिरा, आंधळा झालेला होता़ त्याच्यामध्ये सामाजिक स्वातंत्र्यांचे स्फुल्लिंग चेतवण्याचे काम त्यांनी केले़ त्याला उठवून उभा केला़ त्याला नेमका शत्रू दाखवला़ त्याच्या हातात विचारांचे हत्यार दिले आणि त्याला लढायला शिकवविले़ हे डॉ़ आंबेडकरांच्या सर्वात मोठे काम होते. यामुळेच वंचित समाज त्यांना आपला मुक्तीदाता मानतो. डॉ. आंबेडकरांच्या याच कार्याची लढाऊ प्रतिमा भारताबाहेरील ज्या ज्या देशांनी मानवी विषमतेचा संघर्ष अनुभवला त्या त्या देशात लोकप्रिय आहे, ही वस्तुस्थिती आहे. जागतिक पातळीवरच्या शोषणमुक्त समुहांनी परस्परांशी नाते प्रस्थापित करण्याची ही सुरुवात आहे आणि डॉ़ आंबेडकर या परस्पर नात्यांमधला दुवा ठरतो़ ब्लॅक पँथर मुव्हमेंट, नेल्सन मंडेला किंवा डावे असले तरी चे गव्हेरा, फिडेल कॅस्ट्रो या नेत्यांविषयी भारतीय समुहातील परिवर्तनवादी समुहाला जे आकर्षण आहे, ते याच नात्याचा भाग म्हणून. डॉ़ आंबेडकरांची वैचारिक प्रतिमा भारताबाहेरही आकर्षित होण्याचे हे एक कारण आहे. अस्पृश्यमुक्तीपासून डॉ. आंबेडकरांनी सुरूवात केली. आणि त्यांच्यावर स्वतंत्र भारताचे संविधान लिहिण्याची जबाबदारी येऊन पडली. डॉ. आंबेडकर जेव्हा सामाजिक समतेसाठी संघर्ष करीत होते, तेव्हा देशात महात्मा गांधी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील लढा उभा रहात होता. डॉ. आंबेडकरांनी येणाऱ्या स्वातंत्र्यात आमचे स्थान काय आहे, असा सवाल गांधींसमोर उभा केला. काँग्रेस सुरुवातीला समाजसुधारणेच्या चर्चेलाही वाव देत असत. पण निखळ स्वातंत्र्याच्या मागणीत फूट पडू नये म्हणून, सामाजिक सुधारणांचा कार्यक्रम काँग्रेसने बाजूला सारला. टप्प्या टप्प्याने स्वातंत्र्य देण्याच्या ब्रिटिशांच्या धोरणानुसार भारतात जी कमिशन आली किंवा लंडनमध्ये ज्या परिषदा झाल्या त्यात भाग घेण्याची संधी डॉ. आंबेडकरांना मिळाली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी अस्पृश्यांच्या हिताची भूमिका मांडली. येणाऱ्या स्वातंत्र्याच्या निर्णयप्रक्रियेत सर्व वंचित समूहांना जाणीवपूर्वक सहभाग मिळाला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. ते १९४६ सालाच्या पहिल्या मंत्रिमंडळात सहभागीही झाले. याच पार्श्वभूमीववर घटना समितीवर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. घटनासमितीवर काम करताना त्यांनी अजोड असे संविधान देशाला दिले. वास्तविक डॉ. आंबेडकरांना आपल्या देशात अपमानकारक व उपेक्षित अशी वागणूक मिळाली होती. एकदा गांधींच्या समोर त्यांनी ‘मला मातृभूमी नाहीये’ असे जळजळीत विधान केले होते. त्या डॉ. आंबेडकरांनी मनात कुठल्याही घटनेबद्दल अढी न बाळगता कुणाही व्यक्ती वा समूहाबद्दल द्वेष न बाळगता, उदात्त विचारांनी प्रेरित होऊन संविधान तयार केले. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व हा आपल्या संविधानाचा पाया आहे. संविधानाच्या उद्देशपत्रिकेत वर्गविहीन, वर्णविहीत समाजरचनेच्या निर्मितीची संकल्पना आहे. आज जगभरात भारताची जी पत आहे ती संविधानाच्या माध्यमातून आहे. जगाला मार्गदर्शक ठरावीत अशी स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची ग्वाही देणारा आश्वासक आशावाद आपल्या संविधानात आहे. त्या संविधानामुळेच प्रगत राष्ट्रेदेखील भारताकडे नेतृत्वाच्या अपेक्षेने पाहतात. संविधानकर्ता म्हणून डॉ. आंबेडकरसुद्धा जगभरातील परिवर्तनवादी विद्वानसमूहामध्ये आदराचे स्थान मिळवून आहेत. जगात अनेक राष्ट्रांची शकले पडत असताना भारतामध्ये तसे घडत नाही. नानाविध संस्कृती, भाषा, जनसमूह असतानाही आणि खलिस्तानसारखी आंदोलने उभे राहूनसुद्धा भारताची एक इंच भूमीसुद्धा बाहेर पडू शकत नाही याचे सारे श्रेय संविधानाला जाते. वंचित समूहाला सशक्त करण्याची जबाबदारी डॉ. आंबेडकरांनी राजकीय पक्षांवर सोडून दिली नाही, तर ती घटनेतच समाविष्ट करून त्याच्या अमलबजावणीची जबाबदारी त्यांनी राज्यकर्त्यांवर टाकली. जगातील सर्वच राज्यांना त्यांच्याकडच्या वंचित समूहांसाठी सकारात्मक कार्यक्रम राबवावा लागला. ज्यांना सकारात्मक कार्यक्रम राबविण्याचे धाडस झाले नाही, तिथले वंचित समूह आज मोठी चाचेगिरी करू लागले आहेत. सोमालिया त्याचे उदाहरण आहे. आपल्याकडेसुद्धा सुरुवातीला आरक्षण धोरणाचा प्रचंड विरोध झाला. हिंसक आंदोलने झाली. पण आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. वेगवेगळे जातसमूह आरक्षणाची मागणी करू लागले आहेत. अल्पसंख्य व वंचित समूहांना बरोबरीचे स्थान देण्याचे काम संविधानाने केले, याची जागतिक पातळीवर आवर्जून नोंद घेतली जाते. याचे श्रेय जग डॉ. आंबेडकरांना देत आहे. जागतिक परिप्रेक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव येण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. १९५६ साली डॉ. आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा अंगिकार केला. त्यांनी स्वत: बौध्द धम्माचा स्वीकार करून आपल्या अनुयायानांही बौध्द धर्माची दिक्षा दिली. त्यांचे हे धम्मचक्र प्रवर्तन होय. या कृतीमुळेसुद्धा भारताबाहेर ज्या ज्या ठिकाणी बौद्ध धम्म आहे त्या त्या ठिकाणच्या लोकांचे डॉ. आंबेडकरांकडे लक्ष गेले. भारताबाहेर आशिया खंडात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धम्म आहे. तद्वतच युरोपातील काही राष्ट्रांत बौद्ध धम्म आहे. अनेक ठिकाणी बौद्ध धम्मात स्थानिक पातळीवरचा प्रक्षिप्तपणा घुसलेला आहे ही वस्तुस्थिती आहे. डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या अनुयायांना केवळ बौध्द धम्म दिला एवढेच नव्हे तर त्यांनी बौद्ध वाङमयाचा कसून अभ्यास केला होता. त्यानुसार जो भाग प्रक्षिप्तपणे बुद्ध चरित्रात किंवा बौद्ध तत्वज्ञानात घुसडला आहे, तो त्यांनी काढून टाकला व शास्त्रशुद्ध चिकित्सा करून बुध्दीला पटेल अशी बौध्द तत्वज्ञानाची मांडणी केली. हा बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ होय. एक प्रकारे धम्मचक्र प्रवर्तन करताना त्याला वैज्ञानिक दृष्टीकोन देण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी केले. त्यामुळे सुरूवातीला भारताबाहेरील बौद्धांना डॉ. आंबेडकरांची भूमिका पटली नाही. हा डॉ. आंबेडकरांचा धम्म आहे अशी टीका त्यांनी केली. परंतु जेव्हा त्यांनी अभ्यास केला तेव्हा त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बौद्ध धम्माविषयीची भूमिका पटली व ती त्यांनी स्वीकारलीही. या पातळीवरही जागतिक क्षेत्रात डॉ. आंबेडकरांचे नाव आदराने घेतले जाते. एक योगायोग असा आहे की ४0 ते ५0 च्या दशकात जगातल्या ज्या देशांमध्ये बौद्ध धम्म होता त्या देशात मार्क्सचा साम्यवादही रूजला. बौद्ध तरूण साम्यवादाकडे आकर्षित झाला होता. हा धोका हेरून डॉ. आंबेडकरांनी काठमांडूच्या परिषदेमध्ये बुद्ध व कार्ल मार्क्स यांची तुलना केली. त्यांनी दाखवून दिले की मार्क्सचे तत्वज्ञान कष्टकऱ्यांच्या पिळवणुकीवर बोलत आहे, तर बुद्धाचे तत्वज्ञान मानवी दु:खावर बोलत आहे. त्यांनी हेही स्पष्ट केले की कामगारांची हुकुमशाही प्रस्थापित केल्यावर साम्यवादासमोर पुढची वाटचाल नाही. या उलट बुद्धाचे तत्वज्ञान दु:खविरहीत समाजरचना व त्यातल्या नैतिक मानवी व्यवहारावर भर देते. मार्क्स हिंसेचे मार्ग सांगतो, तर बुध्द अहिंसेच्या मार्गाने परिवर्तन घडवितो. आज आपण पाहतो की जगात जिथे साम्यवादाचा प्रभाव होता, ती सारी राष्ट्रे कोसळून पडली. त्यामुळे साम्यवादाकडे आकिर्षित झालेला बौद्ध तरूण बुध्दाच्या तत्वज्ञानाकडे वळला. या प्रवर्तनाचे श्रेय सारे जग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देते. जागतिक परिप्रेक्षामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव या पातळीवर पोहोचले आहे. जो जो त्यांच्या विचारांचा अभ्यास होईल, तो तो डॉ. आंबेडकरांची कीर्ती अधिक दिगंत होत जाईल. हा भविष्यकाळ समजून घेऊनच आंबेडकरी अनुयायांनी व प्रचारकांनी त्यांच्या विचारांची मांडणी करावी. लेखक - अविनाश महातेकर