नक्षत्रांचे देणे

By Admin | Updated: April 22, 2017 04:21 IST2017-04-22T04:21:56+5:302017-04-22T04:21:56+5:30

चिखलदऱ्याला विश्रामगृहाच्या प्रशस्त अंगणात आकाशात चमचमणाऱ्या नक्षत्रांवर नजर खिळवून मंत्रमुग्ध झाल्यासारखे आम्ही कितीतरी विद्यार्थी बसलो होतो.

Giving stars | नक्षत्रांचे देणे

नक्षत्रांचे देणे

- डॉ. सौ. प्रज्ञा आपटे

चिखलदऱ्याला विश्रामगृहाच्या प्रशस्त अंगणात आकाशात चमचमणाऱ्या नक्षत्रांवर नजर खिळवून मंत्रमुग्ध झाल्यासारखे आम्ही कितीतरी विद्यार्थी बसलो होतो. एरवी उंच इमारतींच्या घेऱ्यात व विजेच्या दिव्यांच्या लखलखाटात क्षितिजापर्यंतची नक्षत्रे घरच्या खिडक्यातून नजरेस पडतच नाहीत. प्रतिभेच्या गूढ देण्याची परतफेड करायचे राहून गेले - ‘गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे !’ म्हणून हुरहूर व्यक्त करणारे आरती प्रभू आठवले. लाट उसळून जळात खळं व्हावं आणि त्यात चंद्राचे चांदणे पडावे तशी लाडक्या कन्येची गालावरची खळी ‘बी’ कवींना भासली. उभे विश्व म्हणजे महादेव (व्योमकेश), आकाश हे त्यांचे केस, त्यात चंद्र आणि आकाशगंगा चमचमत आहेत ही सावरकरांच्या सप्तर्षी कवितेतील अचाट कल्पना अचानक आठवली. कालपथावर निघालेल्या ‘जगन्नाथाचा रथ’ आठवला. ‘पृथ्वीचे प्रेमगीत, काढ सखे गळ्यातील, मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसिले’ अशा कुसुमाग्रजांच्या कवितेतील नक्षत्रांची मोहकता आठवली. ‘थांग-अथांग’ संग्रहातील नागझिरा कवितेच्या तिसऱ्या भागात कवी श्रीधर शनवाऱ्यांनी विश्रामगृहाच्या खिडकीतून दिसणाऱ्या एका वठलेल्या निष्पर्ण वृक्षाचे शब्दचित्र रेखाटले आहे. कृत्तिकेचा पुंज, मग रोहिणी आणि कितीतरी नक्षत्रे त्या वृक्षावर उमलत गेल्याचे त्यांना दिसते. दिशा उजळल्यावर वास्तवाची धग जाणवते. वठलेल्या झाडावर घाव घालायला रेंजर उभा असतो. आपले जगणे असेच आभासमय तर नाही? हा अनुत्तरित प्रश्नही कवीच्या मनात तरळत राहिला.
बी.एड.च्या विद्यार्थ्यांची चिखलदऱ्याला गेलेली ती सहल होती. आकाशवाचनाची माझी हौस स्वस्थ बसू देईना. पूर्वेकडचे हस्त नक्षत्र, कृत्तिकेचा पुंज, रोहिणी, सप्तर्षी, आकाशाचे महाद्वार सारे बघताना दक्षिण क्षितिजाच्या थोडे वर असणारे वृश्चिक नक्षत्र लखलखू लागले. ते दाखवते आहे तोच मॅडमची हाक कानी आली. आम्ही सगळ्याजणी परतलो. रात्र बरीच झाली होती. विश्रांतीचीही गरज भासत होती. गादीवर पसरलेल्या पांढऱ्याशुभ्र चादरीवर अंग टाकले मात्र विंचवाने डंख मारल्यागत मी झटक्यात उठून बसले. माझ्या लहानशा चित्काराने मैत्रिणीही भोवती जमल्या. डंखाच्या झिणझिण्या क्षणासाठी पार मेंदूपर्यंत पोहोचल्या. माझ्या गादीवर टेकलेल्या दंडाला डंख मारून, नुकतेच जगात आले असावे इतके नखभर लहान आणि भुरे विंचवाचे पिल्लू नांगी उभारून बिछान्याबाहेर धावत होते. नुकतीच मी वृश्चिक नक्षत्र बघितले होते आणि आता हा त्याचा डंख. विंचवाचे पिल्लू लहान होते; पण त्याच्या डंखात विखार होताच. मैत्रिणींनी त्याचा समाचार घेतला. माझ्यावर उपचार केले. मी मात्र तेव्हापासून आकाशवाचनाचा आणि विशेषत: ‘वृश्चिक’ नक्षत्राचा धसकाच घेतला आहे !

Web Title: Giving stars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.