तुला देतो पैसा
By Admin | Updated: November 16, 2016 07:49 IST2016-11-16T07:50:17+5:302016-11-16T07:49:07+5:30
‘अर्थस्य पुरुषो दास:’ हे महाभारतातील वचन कळायला आयुष्याची काही वर्षे तरी घालवावी लागतात़ पैसा देऊनच सर्व कामे सिद्धीस जातात

तुला देतो पैसा
‘अर्थस्य पुरुषो दास:’ हे महाभारतातील वचन कळायला आयुष्याची काही वर्षे तरी घालवावी लागतात़ पैसा देऊनच सर्व कामे सिद्धीस जातात हे व्यवहारज्ञान न कळताही ‘तुला देतो पैसा’ हे गाणे गात-गात पावसाला निमंत्रण देत अनेकांचे बालपण गेले़ आपल्या वैदिक ऋषींनी पर्जन्यसूक्त, वरुणसूक्त रचून पावसाची आराधना केली़ पर्जन्ययाग करून त्याला मोठ्या सन्मानाने निमंत्रित केले़ पैसा व्यवहारात बलवान झाला आणि पैशाने सारे विकत घेता येते ही भावना दृढमूल होऊन बसली़ त्याला बालमन तरी कसे अपवाद असणार?
‘येरे येरे पावसा
तुला देतो पैसा’
ही लालूच दाखवायची कला माणसाने बालवयातच आत्मसात केली़ पैसा सुद्धा खोटा द्यायचा आणि पाऊस मात्र मोठा पड म्हणायचे़ कालमानाप्रमाणे आजकाल पावसाचे गाणेही बदलले आहे़ ९० टक्के मुले इंग्रजी केजीत जाणारी़ त्यांचे गाणे पावसाला बोलवत नाही़
‘रेन रेन गो अवे’़
पाऊस कशाला येणार? शेते कशी भिजणार? ‘तुला देतो पैसा’ हे खोटे आश्वासन उपयोगी तरी पडत होते़ माणूस सगळेच बदलायला बघतो आहे़ त्याला वाटते विज्ञानाच्या जोरावर काहीही शक्य आहे़ ईश्वराने कृपा केली असे मानायला माणूस तयार नाही़ देवाजीने कृपा केल्यावरच शेती पिकून हिरवी होते़ माणसाने कलात्मबुद्धीच्या जोरावर तयार केलेला सुंदर गालिचा खूप महागडा असतो़ तो बनवायला कालावधी खूप लागतो़ त्याला फार तर एका मोठ्या हॉलची मर्यादा. देवाजीचा गालिचा अमर्याद़ उघड्यावरच तो अंथरला जातो़
‘हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणाच्या मखमालीचे’
हे हरिततृण म्हणजे जिवंतपणाचे लक्षण़ परमेश्वराने अंथरलेल्या या गालिच्याची किंमत कशी करणार?
‘स्व’ पुढे ज्याला पाहाता येत नाही तो सृष्टीचे भले कसे ओळखणार? विज्ञान नियमानुसार काम करणाऱ बरे-वाईट त्याला थोडेच कळते़ ते कळते माणसाला़ माणसाने बऱ्याचा नादच सोडून दिला आहे़ त्याची सर्वांवर कुरघोडी, मी म्हणेन तेच खरे! अशाने जगाचे हित कसे बरे होईल? आपले पूर्वज काय वेडे होते़ त्यांनी रचलेली आणि केलेल्या प्रार्थना एकट्या दुकट्यासाठी नव्हत्या़ त्यांच्या मागण्यांत विश्वकल्याण होते़
काले वर्षतु पर्जन्य : पृथ्वी सस्यशालिनी।
देशोऽयं क्षोभरहितो सर्वेसन्तु निर्भया:।।
पाऊस वेळेवर पडो, धरा धनधान्याने समृद्ध होओ़ देश क्षोभरहित होऊन सर्वांना निर्भयपणे जगता येओ़ प्रार्थना गेली तशी तिच्याबरोबर वेळेवर पडणारा पाऊस गेला़ क्षोभ उत्तरोत्तर वाढीस लागला आणि जनता भयभीत झाली़
आता तरी म्हणा -
‘येरे येरे पावसा’
-डॉ. गोविंद काळे