पर्यावरण रक्षणार्थ गीतेची शिकवण

By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:34+5:302015-07-25T01:14:34+5:30

पर्यावरण विनाशाने आज टोक गाठलंय. माणसाचे अस्तित्व धोक्यात आलंय. धोक्याचे इशारे सर्वच देताहेत. भगवत गीतेनेही हजारो वर्षापूर्वी पर्यावरण रक्षणासाठी यशाचा

Gita teachings for environmental protection | पर्यावरण रक्षणार्थ गीतेची शिकवण

पर्यावरण रक्षणार्थ गीतेची शिकवण

पर्यावरण विनाशाने आज टोक गाठलंय. माणसाचे अस्तित्व धोक्यात आलंय. धोक्याचे इशारे सर्वच देताहेत. भगवत गीतेनेही हजारो वर्षापूर्वी पर्यावरण रक्षणासाठी यशाचा विचार मांडलाय. तिसऱ्या अध्यातील श्लोक ९ ते १६ या ८ श्लोकात यज्ञाचे सलगपणे विवेचन आले आहे. पूज्य विनोबांनी गीताई चिंतनिकेत दिलेले यज्ञाचे स्पष्टीकरण समजून घेतले तर यज्ञाचा संबोध स्पष्ट होईल आणि पर्यावरण रक्षणार्थ आचरण कसे असावे हे कळेल. वरील ८ श्लोकांचा अर्थ समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी, टिळकांचे गीतारहस्य, पांडुरंग शास्त्री आठवलेंचं गीतामृत आणि स्वामी प्रभुपादांचे गीता जशी आहे तशी ही पुस्तकेही अभ्यासली.
यज्ञ शब्दाचा गीताई चिंतनिकेतील अर्थ सृष्टीदेवतेची निष्ठावंत सेवा आणि तदर्थ उत्पादक परिश्रम करणे. इतर चार लेखकांनी स्वधर्माचे आचरण किंवा चातुर्वणविहित कर्मे करणे म्हणजे यज्ञ असा अर्थ करून कर्म करणे म्हणजे यज्ञ असाच अर्थ अधोरेखित केला आहे. आज मात्र यज्ञ कुंडात आहुती देणे म्हणजे यज्ञ असा अर्थ गृहीत धरला जातोय. लोकमान्य टिळक आणि पांडुरंग शास्त्री आठवले लिहितात : यज्ञकुंड उभारून अग्नीमध्ये तीळ, तांदूळ, जव इत्यादीचे हवन करणे म्हणजेच केवळ यज्ञ नाही. जगाच्या धारण पोषणार्थ आणि लोकसंग्रहार्थ करावयाच्या सर्व कर्मांचा यज्ञात समावेश होतो. जगाचे धारणपोषण आणि लोकसंग्रह हा यज्ञाचा हेतूच इथे स्पष्ट होतो. धारण पोषणासाठी मानवाच्या प्राथमिक गरजांची पूर्तता आणि त्यासाठी उत्पादक परिश्रम आवश्यक आहेत. हे लक्षात घेतले विनोबांचा यज्ञाचा अर्थ अधिक अर्थपूर्ण वाटतो. दहाव्या श्लोकाचा आशय असा की ब्रह्मदेवाने ही सृष्टी (म्हणजेच पर्यावरण) निर्माण केली. आणि तिचे सातत्य टिकून राहण्यासाठी (पर्यावरण रक्षणासाठी) यज्ञाचा विचार मांडला. टिळक म्हणतात. सृष्टीचे सातत्य टिकून राहण्यासाठी करावयाच्या सर्व कर्माचा यज्ञात समावेश होतो.
रक्षा देवास यज्ञाने तुम्हा रक्षतो देव ते ।
एकमेकास रक्षूनि पावा कल्याण सर्व ही। ३.११
विनोबा देव या शब्दाचा सृष्टी असा अर्थ करतात. ज्ञानेश्वरी आणि गीतारहस्यात देव या शब्दाचा अर्थ दिलेल्या आढळला नाही. विनोबांचा अर्थ लक्षात घेतला की सहजच लक्षात येते की यज्ञरूपी कर्माने पर्यावरणाचे रक्षण केले की पर्यावरण मानवाचे रक्षण करेल आणि दोघांचं कल्याण होईल.
पर्यावरण रक्षणासाठी नेमकी कोणती यज्ञरूप कर्मे करायची याचे छान विवेचन विनोबांनी केले आहे. ते म्हणतात आपल्या जगण्यामुळे दोन प्रकाराने पर्यावरणाचं संतुलन ढळतं. १) अन्न, वस्त्र आदि विविध वस्तूंचा आपण उपभोग घेतो. त्यामुळे पर्यावरणाची झीज होते झीज भरून काढण्यासाठी शेती, वस्रनिर्मिती असे उत्पादक परिश्रम केले पाहिजेत. झीज भरून काढण्यासाठी उत्पादक शेती, वस्रनिर्मिती असे उत्पादक परिश्रम केले पाहिजेत. झीज भरून काढण्यासाठी उत्पादक परिश्रम करण्याची वृत्ती विकसित झाली की उपभोगावर मर्यादा येईल आज पर्यावरण विनाशाच्या सर्व समस्या, उपभोगाच्या अतिरेकानेच निर्माण झाल्या आहेत. संतुलन ढळण्याचा दुसरा प्रकार म्हणजे आपल्या जगण्यामुळे पर्यावरण प्रदूषित होतं. अस्वच्छता परसते. कचऱ्याचे ढीग साठतात. नद्या व विहिरींचे पाणी प्रदूषित होतं. अशा सर्व प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी करावयाची स्वच्छतेची सर्व कामे यज्ञकर्मेच आहेत. ती केली तरच पर्यावरणाचं रक्षण होईल.
चौदाव्या श्लोकाकडे मी विशेषत्वाने लक्ष वेधू इच्छिते.
अन्नापासूनी ही भूते पर्जन्यातूनि अन्न ते ।
यज्ञे पर्जन्य तोहोय यज्ञ कर्मामुळे घेउ ।। ३.१४ वरील श्लोकात अन्ननिर्मितीच्या चक्राचा उल्लेख आहे. अशी अनेक चक्रे निसर्गात आहेत. पावसाचे चक्र प्राण्यांच्या उच्छवासातून बाहेर पडणारी अशुद्ध हवा वनस्पतीमुळे शुद्ध होते हे आणखी एक चक्र. हजारो वर्षापासून हे चक्र चालू आहे. आजपर्यंत कधी शुद्ध हवेचा तुटवडा भासला नाही. भविष्यात कदाचित निसर्गाच्या क्षमतेपेक्षाही जास्त अशुद्ध हवा वातावरणात मिसळते आहे. शिवाय जंगलेही नष्ट होताहेत. प्रचलित विकासाच्या संबोधाची हानिकारकता विविध माध्यमातून लोकांपर्यंत पोचवणं, अविघटनशील वस्तूंचा वापर टाळण्याविषयी प्रबोधन करणं हे यज्ञच. अशा यज्ञांना आपण ज्ञानयज्ञ म्हणू शकतो. वरील श्लोकात यज्ञे पर्जन्य तो होय अशी अर्धी ओळ आली आहे. यज्ञ या संबोधाचं आकलन न झाल्याने अवर्षणाची परिस्थिती निर्माण झाली की यज्ञकुंड प्रज्वलित करून त्यात समिधांची आहुती देत बसतात. यज्ञ कर्मामुळे घडे ही पुढची अर्धी ओळ विसरतात. निसर्गानी विविध चक्र सुरळीत चालू रहावीत. यासाठी जो कार्य करीत नाही त्याला गीता पापी म्हणजे गीतेने प्रस्तुत आठ श्लोकात पर्यावरण रक्षणासाठी छान मार्गदर्शन केलं आहे. त्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वत:च जगणं अवघड करणं.
- वासंती सोर
(ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ता)

Web Title: Gita teachings for environmental protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.