बजरंगी भाईजान ते गीता : दोन देशांच्या मनाची हाक

By Admin | Updated: August 2, 2015 21:48 IST2015-08-02T21:48:28+5:302015-08-02T21:48:28+5:30

भारताच्या सार्वजनिक जीवनात पाकिस्तानची प्रतिमा नेहमीच एक शत्रू अशी राहिली आहे. ते स्वाभाविकही आहे, कारण गेली ६८ वर्षे हे दोन्ही देश कायम परस्परांविरुद्ध

Gearangi Bhaiyan Gita: The call of mind of two countries | बजरंगी भाईजान ते गीता : दोन देशांच्या मनाची हाक

बजरंगी भाईजान ते गीता : दोन देशांच्या मनाची हाक

विजय दर्डा (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)
भारताच्या सार्वजनिक जीवनात पाकिस्तानची प्रतिमा नेहमीच एक शत्रू अशी राहिली आहे. ते स्वाभाविकही आहे, कारण गेली ६८ वर्षे हे दोन्ही देश कायम परस्परांविरुद्ध दंड थोपटूनच उभे ठाकले आहेत. दोन्ही देशांमध्ये चार युद्धे झाली आहेत आणि अण्वस्त्रधारी असलेल्या या देशांकडून मैत्रीसाठीही काही हालचाली होत नाहीत. गेल्याच आठवड्यात पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात पोलीस ठाण्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानच्या आयएसआयकडून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची स्पष्ट छाप दिसून आली. नेहमीप्रमाणे पाकिस्तानने हे हल्लेखोर सीमेच्या पलीकडून आल्याचा इन्कार केला. पण भारत-पाकिस्तान संबंध चांगल्या स्थितीत नाहीत, हे कोणीही नाकारू शकणार नाही. पण द्विपक्षीय संबंध असे अविश्वास आणि तणावाच्या वातावरणात असताना, एक मूक-बधिर पाकिस्तानी मुलगी आणि एक भारतीय पुरुष यांच्यातील नाजूक नातेसंबंधांवर बेतलेल्या ‘बजरंगी भाईजान’ या सलमान खान- करिना कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाने पाकिस्तानात हॉलिवूड चित्रपटांचेही विक्रम मोडावेत हे दोन्ही देशांच्या लोकांच्या मनातील अतूट भावबंधांचे प्रतीक आहे.
मुळात एखादा भारतीय चित्रपट पाकिस्तानात खुलेपणाने प्रदर्शित केला जावा, हीच मोठी गोष्ट आहे. मूक-बधिर असलेल्या व भारतात येऊन हरवलेल्या छोट्या मुन्नीला, बजरंगीच्या भूमिकेतील सलमान खान, तिच्या आईचा पाकिस्तानात शोध घेऊन तिच्या कसे हवाली करतो, याचे चित्तवेधक कथानक या चित्रपटात रंगविलेले आहे. रमझान ईदच्या काळात हा चित्रपट पाकिस्तानातही झळकावा व लोकप्रिय व्हावा ही नक्कीच एक शुभवार्ता आहे. दोन्ही देशांमध्ये सलमान खान खूप लोकप्रिय अभिनेता आहे व त्याच्या नव्या चित्रपटाची सिने वितरकांना उत्कंठतेने प्रतीक्षा असते. खरे तर हा चित्रपट केवळ या दोन देशांमध्येच नव्हे तर जगात सर्वत्र गाजत आहे.
सलमान खानच्या या चित्रपटाचे यश अपेक्षितच होते. पण आज जो विषय मुद्दाम मांडावासा वाटतो तो वास्तव जीवनात घडलेल्या घटनेशी संबंधित आहे. ‘बजरंगी भाईजान’च्या यशाने ही सत्यकथा समोर आली आहे व त्यामुळे आपल्याला दोन्ही देशांमधील मानवतावादी व मैत्री भावनेची खरी ओळख पटते. ‘बजरंगी भाईजान’च्या पाकिस्तानातील यशाच्या बातमीसोबतच २३ वर्षांच्या गीताची वास्तव कथा समोर आली आहे. मूक-बधिर असलेली ही भारतीय मुलगी सध्या कराचीच्या मिठादर भागात एधी फाउंडेशनच्या शेल्टर होममध्ये राहत आहे. एधी फाउंडेशन ही पाकिस्तानातील मानवतावादी काम करणारी संस्था आहे. या फाउंडेशनच्या फैसल एधी यांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाब रेंजर्सनी १३ वर्षांपूर्वी या मुलीला फाउंडेशनकडे आणून सोपविले. तेव्हापासून तेथील कार्यकर्ते तिला भारतात परत पाठविता यावे यासाठी तिच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सुरुवातीस या मुलीस लाहोरमध्ये ठेवले गेले. नंतर तिला कराचीच्या शेल्टर होममध्ये ठेवले गेले. तेथे बिल्किस एधी यांनी तिला ‘गीता’ असे नाव दिले. ‘बजरंगी भाईजान’मधील मुन्नी आणि या आपल्या गीतामध्ये अनेक साम्य आढळते. मुन्नी मशिदीत नमाज पढते, तर गीता मंदिरात प्रार्थना करते. बजरंगीप्रमाणेच कराचीतील शेल्टर होमच्या कर्मचाऱ्यांनीही गीताच्या भावनांची कदर करून तिच्यासाठी एक स्वतंत्र प्रार्थनागृह तयार करून दिले आहे. गीतासाठी गणपतीची एक छोटी मूर्ती नेपाळमधून आणून दिल्याचे फैसल सांगतात. मूक-बधिर असल्याने मुन्नी व गीता या दोघीही फक्त खाणाखुणांच्या भाषेतच बोलतात. फाउंडेशनच्या एका कर्मचाऱ्याने मोबाइल फोनच्या स्क्रीनवर दाखविलेला भारताचा नकाशा ओळखून गीताला रडू फुटणे एवढेच काय ते तिच्या खाणाखुणांमधून झालेले अर्थपूर्ण संभाषण. हुंदके देत गीता भारताच्या नकाशावर आधी झारखंड राज्यावर व नंतर तेलंगणावर बोट ठेवून तिच्या भूतकाळाविषयी काही तरी सांगण्याचा प्रयत्न करते. कदाचित यातूनच फाउंडेशनच्या लोकांना काही संदर्भ मिळू शकेल. भारतात परत जाण्याची तिची तीव्र इच्छा आहे. एखादा सुयोग्य हिंदू मुलगा पाहून त्याच्याशी लग्न लावून देण्याची तयारी बिल्किस यांनी दाखविली तरी गीता पाकिस्तानात कायमची राहायला तयार नाही. तिने आपल्याला सात बहिणी व चार भाऊ असल्याचेही सांगितले आहे. शेल्टर होममध्ये ती हसतमुखाने पडेल ते काम करीत असते. पण रुपेरी पडद्यावरील मुन्नी आणि वास्तवातील गीता यांच्यातील सर्वात मोठा फरक असा की, मुन्नीला अखेर तिचे कुटुंबीय भेटतात, पण गीताला मात्र ते भाग्य अद्याप लाभलेले नाही. फैसल यांनी कागदावर एका घराचे चित्र काढून तो कागद गीताला दिला की ती हसून त्या घराच्या बाजूला ‘१९३’ असा आकडा लिहिते. कदाचित तो तिचा घरक्रमांक असू शकेल.
बॉलिवूडमधील मुन्नी आणि वास्तव आयुष्यातील गीता यांच्या या कथेतून जे सामायिक व मनाला समाधान देणारे सूत्र दिसते ते परस्परांना शत्रू मानणाऱ्या दोन देशांमधील जनतेच्या मनात परस्परांविषयी असलेल्या प्रेम आणि सद्भावनेचे. दोन्ही देशांमध्ये असलेले तंट्याचे मुद्दे खरोखरीचे आहेत व ते असे सहजपणे झटकून टाकता येण्यासारखे नाहीत. त्यांची सुलभ उत्तरेही उपलब्ध नाहीत. पण गीता आणि मुन्नीच्या या कथा जणू दोन्ही देशांच्या नेत्यांना आपसातील वाद लवकरात लवकर संपविण्याचा संदेश देणाऱ्या आहेत. दोन्ही देशांची संस्कृती, धर्म आणि एकमेकांबद्दलचे ममत्व या दोन्ही देशांतील जनतेच्या मनातील ज्या इतर समान गोष्टी आहेत त्यांच्यावर तरी बंधने का असावीत? दोन्ही देशांतील नागरिक जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांच्या मनात याच भावना असतात. मग त्या द्विपक्षीय संबंधांमध्ये का प्रतिबिंबित होत नाहीत?
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
संसदेचे सध्या सुरू असलेले पावसाळी अधिवेशन अगदीच निराशाजनक ठरत आहे. संसद ठप्प होण्याने सरकारी तिजोरीचा किती पैसा वाया जातो याची आकडेवारी वाचून मन उद्विग्न होते. यातून संपूर्ण राजकीय व्यवस्थेचे अपयशच दिसून येते. सत्ताधारी व विरोधक या दोघांनाही आपापली जबाबदारी पार पाडायची असते हे खरे; पण यातून कसा मार्ग काढायचा हे दोघांनीही आपसात ठरवायला हवे. केवळ परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करून काहीच उपयोग होणार नाही. अर्थात यात पुढाकार घेण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे व त्यासाठी त्यांनी केवळ सूचना करून भागणार नाही तर ठोस कृतीही करावी लागेल.

Web Title: Gearangi Bhaiyan Gita: The call of mind of two countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.