स्वातंत्र्य नव्हे स्वैराचार!
By Admin | Updated: February 9, 2015 01:38 IST2015-02-09T01:38:18+5:302015-02-09T01:38:18+5:30
स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये असणाऱ्या सीमारेषेचा विसर पडला की माणूस बेभान होत जातो. त्यासाठी त्याला संयमाचा, तारतम्याचा आणि नीतिमत्तेचा बांध आवश्यक असतो

स्वातंत्र्य नव्हे स्वैराचार!
स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये असणाऱ्या सीमारेषेचा विसर पडला की माणूस बेभान होत जातो. त्यासाठी त्याला संयमाचा, तारतम्याचा आणि नीतिमत्तेचा बांध आवश्यक असतो. अन्यथा सामाजिक -सांस्कृतिक सभ्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागते. 'एआयबी-नॉकआऊट द रोस्ट' या नावाचा एक शो मुंबईत नुकताच सादर झाला. 'चला अश्लीलता सुरू करू या' या शब्दांतच करण जोहरने त्याची घोषणा केली होती. त्यासाठी हजारो महागडी तिकिटे खरेदी करून हजेरी लावली. त्यात दीपिका पादुकोन, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट या अभिनेत्रींसह महिलावर्गाची उपस्थितीही लक्षणीय होती. या कार्यक्रमाचे काही व्हिडिओ 'अश्लील, बिनधास्त आणि अवमानकारक' तसेच '१८ वर्षांवरील प्रौढांसाठीच' अशा टॅगखाली उघडपणे दिसू लागले, लक्षावधी लोकांनी ते पाहिले, असंख्यांंच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पोहोचले. मानवी गुुप्तांगाचा उघडपणे विनोदाच्या नावाखाली होणारा उल्लेख आणि त्यात वापरले गेलेले आक्षेपार्ह आणि असांस्कृतिक शब्द लक्षात आल्यानंतर त्यावर सार्वत्रिक टीका होऊ लागली. हा व्हिडीओ इंटरनेटवरून काढून टाकला तरी अजूनही लाखो लोकांच्या मोबाइलमधून तो फिरतोच आहे. करण जोहरवर गुन्हाही दाखल झाला. जो काही अश्लाघ्य कार्यक्रम केला जातो तो मुळातच पाश्चात्त्यांच्या एका कार्यक्रमावरून कॉपी केलेला असा आहे. सभ्य आणि सुसंस्कृत समाजात कुणीही बोलणार नाही अशा अश्लील वाक्यांवर जर अभिनेत्रीही हसून दाद देत असतील, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर हे असे अंधानुकरण होऊन सभ्यतेलाच काळिमा फासणारा अश्लीलतेचा नंगानाच उघड होणार असेल, आणि त्याला कुणीच काही बोलणार नसेल तर यापुढील काळात अशाच कार्यक्रमांची चलती येऊ शकेल. मराठी नाटकांमध्येही जशी 'फक्त प्रौढांसाठी' हे लेबल लावून फक्त कंबरेखालचे विनोद करण्यातच आनंद मानणारे तथाकथित 'कलाकार' आणि 'आंबटशौकीन' रसिक वाढताहेत तसेच अश्लीलतेचा उघडपणे प्रसार व उच्चार करणाऱ्या कार्यक्रमांचेही होऊ शकेल. समाजाला जर किमान सभ्यतेची, सुसंस्कृततेची व नीतिमत्तेची चौकट आपण ठेवली नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा उघड स्वैराचार असाच सुरू राहील. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो आहे.