स्वातंत्र्याहून सुरक्षितता बरी ?

By Admin | Updated: February 11, 2017 00:23 IST2017-02-11T00:23:21+5:302017-02-11T00:23:21+5:30

‘सामान्य माणसांना स्वातंत्र्याहून सुरक्षितता अधिक भावत असते. स्वातंत्र्यात घ्याव्या लागणाऱ्या स्वयंनिर्णयांच्या परिणामांची जोखीम पत्करणे त्यांना नको असते.

Freedom from freedom? | स्वातंत्र्याहून सुरक्षितता बरी ?

स्वातंत्र्याहून सुरक्षितता बरी ?

‘सामान्य माणसांना स्वातंत्र्याहून सुरक्षितता अधिक भावत असते. स्वातंत्र्यात घ्याव्या लागणाऱ्या स्वयंनिर्णयांच्या परिणामांची जोखीम पत्करणे त्यांना नको असते. याउलट सुरक्षेच्या व्यवस्थेचे आश्वासन देणारेच साऱ्यांसाठी निर्णय घेतात आणि त्याची जोखीमही पत्करतात, अशी ती मानसिकता असते’ हे ‘फिअर आॅफ फ्रीडम’ (स्वातंत्र्याचे भय) या आपल्या तत्त्वचिंतनपर ग्रंथात अशी मांडणी करणारा एरिक फ्रॉम हाच आजच्या युगाचा खरा तत्त्वज्ञ असावा, असे वाटायला लावणारे सध्याच्या राजकारणाचे चित्र आहे. ‘पूर्वीच्या सरकारांनी तुम्हाला लुटले, असुरक्षित केले आणि तुमचे म्हणून तुम्हाला काही वाटू दिले नाही. आता मी आलो आहे, मी तुम्हाला सुरक्षा देईन, तुमची मालमत्ता वाढवीन आणि देशाचेही वैभव वाढवून देईन’ अशी दर्पोक्ती करणारे ट्रम्पसारखे पुढारी केवळ अमेरिकेतच सत्तेवर आले, असे नाही. त्याआधी ते भारतात, चीनमध्ये, मध्य आशियाई आणि अतिपूर्वेकडील देशांतही सत्तेवर आले आहेत. ‘तुम्हाला साऱ्या बाजूंनी धोका आहे’, अशा कुठल्याशा अज्ञात भीतीचा बागुलबुवा लोकांसमोर उभा करायचा आणि मीच काय तो तुमचा तारणहार आहे हे लोकांच्या गळी उतरवायचे, याचेच नाव राजकारण आणि ते ज्याला चांगले जमते तोच खरा राजकीय पुढारी’ हे हेन्केन या जुन्या अमेरिकी पत्रकाराचे सांगणेही याच स्वरूपाचे आहे. ट्रम्प यांनी मुस्लीम, मेक्सिकन व विदेशी वंशाचे लोक यांच्याएवढेच स्वपक्षातील टीकाकार, डेमॉक्रेटिक पक्षाचे नेते आणि देशातील न्यायालये यांच्याविरुद्ध सध्या जी आघाडी उघडली आहे ती याच धर्तीवरची. जनतेला भयभीत करून स्वत:कडे सारे अधिकार एकवटणारी ही राजकारणातील रीत आहे. अल्पसंख्यकांचे भय, ख्रिश्चनांविषयीची भीती, दलितांविषयीचा संशय आणि जुन्या सरकारांनी मिळविलेल्या यशाची टवाळी अशा साऱ्या गोष्टी करीत राहण्याचे मोदींचे स्वदेशी राजकारणही असेच जनतेच्या मनात भीतीचा बागुलबुवा उभा करून आपले अधिकार वाढवून घेण्याचे आहे. ट्रम्प यांनी सात मुस्लीम देशांतील नागरिकांवर अमेरिकाबंदीचा जो आदेश बजावला, तो तेथील एका जिल्हा पातळीवरील सांघिक न्यायालयाने असंवैधानिक ठरवून रद्द केला. त्यावर ट्रम्प यांनी वरिष्ठ न्यायालयात दाखल केलेली याचिकाही फेटाळली गेली. आता सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावताना ‘आमची न्यायालये राजकीय झाली असून, ती माझ्या अधिकारावर अतिक्रमण करीत आहेत’ असा दावाही त्यांनी केला आहे. अमेरिकेत आतापर्यंत आलेल्या ४४ अध्यक्षांपैकी कोणीही तेथील न्यायालयाला अशी नावे ठेवली नव्हती. ट्रम्प यांनी प्रसिद्धी माध्यमांना अप्रामाणिक म्हटले, डेमॉक्रेटिक पक्षाला देशाचे शत्रू ठरविले आणि स्वत:खेरीज दुसरे कोणी देशहिताचा विचार करीत नाही, असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सध्या चालविला आहे. इकडे नरेंद्र मोदींनी डॉ. मनमोहन सिंगांच्या अर्थकारणावरील अधिकाराची प्रशंसा करीत असतानाच त्यांच्याच काळात सगळे आर्थिक घोटाळे झाले असे सांगून ‘बाथरूममध्ये रेनकोट घालून अंघोळ करणारे ते नेते आहेत’ असा त्यांचा कमालीचा उपमर्दकारक उल्लेख केला. अशा उल्लेखांची दखल घेणे मला शोभणारे नाही असे मनमोहन सिंगांचे त्यावरील वक्तव्य हे त्यांचे प्रगल्भपण स्पष्ट करणारे व मोदींचे उथळपण उघडे करणारे आहे. हा कोणा एका देशाचा वा नेत्याचा प्रश्न नसून जगभरच्या राजकीय मानसिकतेचा व तिच्यात वाढत चाललेल्या नेतृत्वाच्या अहंमन्यतेचा विषय आहे. ‘मी तुम्हाला तुमचे जुने वैभव प्राप्त करून देतो, अगोदरच्या साऱ्यांनी तुमची लूटच केली’ असेच सांगून हिटलर सत्तेवर आला. ‘इटलीत सर्वत्र दिसणारा आतंक व हिंसाचार संपवून मीच एकटा तुम्हाला संरक्षण देऊ शकतो’ असे म्हणत मुसोलिनीने तो देश ताब्यात आणला. मी सोडून बाकीचे सारे अप्रामाणिक व भ्रष्ट आहेत. त्यांच्यात धर्मभावना नाहीत, ते देशाचे शत्रू आहेत, देश, धर्म व सुरक्षा या गोष्टी केवळ माझ्यामुळेच येथे नांदू शकतील, अशी आश्वासने देऊन किती लोक एकेक शहर, राज्य वा देश हाती ठेवण्याचे राजकारण करीत आहेत, हे राजकारणाच्या साध्याही अभ्यासकाला आता समजू शकणारे आहे; मात्र त्यांची खरी ओळख पटेपर्यंत त्यांची सत्ता मजबूत झालेली असते आणि त्याला आवरायचे कोणतेही उपाय उरलले नसतात. शिवाय सत्ताधाऱ्यांना त्यांच्या भक्तांचाही एक मोठा वर्ग लाभत असतो. ‘आजवर असे कोणी बोलले नाही किंवा कोणी असे केले नाही’ असे म्हणणारा भक्तांचा हा वर्ग लोकांच्या स्वतंत्र विचारांना व त्यांच्या टीकेला तुच्छ लेखत आपल्या नेत्यांची देवळे बांधायचेच बाकी ठेवत असतो. ट्रम्प आणि मोदी यांच्या राजकारणाचे चित्र असे आहे. अशी स्वत:त पूर्णत: पाहणारी माणसे मुळात तशी नसतात. त्यांच्या अहंताच त्यांच्या उणेपणावरच्या पांघरुणासारख्या असतात. समाजाला व जगाला अशा माणसांबाबत सदैव सावध राहावे लागते. अखेर अखंड सावधानता ही लोकशाहीने समाजाकडे मागितलेली स्वत:ची किंमतच असते.

Web Title: Freedom from freedom?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.