श्रीमंत आजोबांनी नातींसाठी ठेवल्या ‘कवड्या’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 07:42 AM2024-03-11T07:42:10+5:302024-03-11T07:43:46+5:30

५,००,००० पौंडाच्या मालक असलेल्या आजोबांनी आपल्याशी वाईट वागणाऱ्या, आपल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाच नातींना कसा ठेंगा दाखवला याची चर्चा मात्र जगभर रंगली.

frederick ward london rich grandfather kept nothing for his relatives | श्रीमंत आजोबांनी नातींसाठी ठेवल्या ‘कवड्या’!

श्रीमंत आजोबांनी नातींसाठी ठेवल्या ‘कवड्या’!

वारशाने मिळणाऱ्या संपत्तीवर श्रीमंत होणाऱ्या व्यक्ती जगात अनेक सापडतील. म्हातारपणी मुलांनी आपली काळजी नाही घेतली तरी त्यांच्या नावावर आपली संपत्ती करण्यावाचून अनेकांकडे पर्याय नसतो. 

आपल्या आई-वडिलांची संपत्ती आपल्याशिवाय कोणाला मिळणार, या भरवशावर मुलंही त्यांना गृहीत धरू लागतात, असं चित्र सार्वजनिक असलं तरी या चौकटीत न बसणारीही काही माणसं आहेत. आम्हाला, आमच्या इच्छांना तुम्ही गृहीत धरू शकत नाही, काही न करता आमच्या संपत्तीवर तुम्ही हक्क सांगू शकत नाही, हे सांगणारे आणि त्यापुढच्या परिणामांची पर्वा न करता व्यावहारिक, तर्कशुद्ध पण कठोर निर्णय घेणारी माणसंही या जगात आहेत. 

लंडनमधील फेड्रिक वार्ड सीनियर हे त्यातलेच एक. ते निवृत्त सैनिक होते. २०२० मध्ये वयाच्या ९१व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांचं निधन झाल्यावर त्यांचं मृत्यूपत्र वाचून दाखवण्यात आलं. ते वाचलं जात असतानाच तिथे उपस्थित त्यांच्या नातेवाइकांपैकी काहींची धुसफूस सुरू झाली. ‘हे असं कसं? हा अन्याय आहे’, म्हणत आरडाओरड सुरू झाली. हे प्रकरण फक्त तात्पुरत्या नाराजीवर थांबलं नाही तर फेड्रिक यांच्या मृत्यूपत्राविरुद्ध खुद्द त्यांच्या पाच नातींनी कोर्टात धाव घेतली.

मृत्यूपत्र वाचनानंतर फेड्रिक यांनी आपल्या संपत्तीचे जे विभाजन केलं होतं, त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांना पाकिटं देण्यात आली. फेड्रिक यांच्या पाच नातींनाही एक-एक पाकीट मिळालं. त्या पाकिटात होते फक्त ५० पौंड. ५००,००० पौंड संपत्ती असलेल्या आजोबांनी आपल्या हातात फक्त ५० पौंड टेकवले, हे बघून नातींचा भ्रमनिरास झाला. आपल्या वाटेची संपत्ती ही काकाने आणि आत्याने हडप केली आणि आपल्या हाती ‘कवड्या’ ठेवल्या या समजुतीतून त्यांनी या मृत्यूपत्राविरुद्ध थेट न्यायालयातच दाद मागितली.

फेड्रिक यांनी २०१८च्या आधी एक मृत्यूपत्र तयार केलं होतं. त्यात त्यांनी आपली संपत्ती आपली तीन मुलं टेरी, फेड्रिक ज्युनिअर आणि मुलगी सुसान यांच्या नावावर केली होती; पण २०१५ मध्ये ज्युनियर फेड्रिकचा मृत्यू झाला. मग त्यांचा वाटा त्यांच्या पाच मुलींना समप्रमाणात वाटला जाईल, असा बदल फेड्रिक सीनियर यांनी आपल्या मृत्यूपत्रात केला. पण २०१८ मध्ये फेड्रिक यांनी आपल्या मृत्यूपत्रात बदल केला आणि पाच नातींना आपल्या संपत्तीतून प्रत्येकीला ५० पौंडच दिले. हा बदल करण्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर या पाच नातींनी कधीही आपल्या आजोबांची काळजी घेतली नाही, त्यांना त्या भेटायला आल्या नाहीत, त्यांची विचारपूस केली नाही. फेड्रिक हे जेव्हा फुप्फुसाच्या विकाराने आजारी होते, दवाखान्यात भरती होते तेव्हादेखील या पाचपैकी एकही नात त्यांनी भेटायला गेली नाही. फेड्रिक सीनियर यांच्या पणतूच्या लग्नात या नातींनी आपल्या आजोबांकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. अशा प्रकारे आपल्या नातींच्या वागण्याने निराश झालेले फेड्रिक सीनियर यांनी मग आपल्या मृत्यूपत्रात बदल केला. सर्व संपत्ती आपला मुलगा टेरी आणि मुलगी सुसान या दोघांच्या नावावर केली.

आजोबांनी २०१८ मध्ये तयार केलेलं मृत्यूपत्र हे त्यांच्यावर दबाव आणून करून घेतलं गेलं, असा आरोप फेड्रिक सीनियर यांच्या नातींनी केला. आपण तर आपल्या आजोबांना नियमित भेटत होतो. एका संपत्तीच्या प्रकरणावरून पाचपैकी एका नातीसोबत फेड्रिक सीनियर आणि त्यांच्या कुटुंबाचा वाद झाला होता. त्यामुळे आजोबा काका, आत्या आणि फेड्रिक यांच्या नाती यांच्यात अंतर पडलं. त्यामुळे संवाद कमी झाला. आपल्याला आजोबा दवाखान्यात दाखल आहे, हेच माहिती नव्हतं अशी सारवासारव करण्याचा नातींनी प्रयत्न केला; पण त्यात त्यांना यश आलं नाही.

फेड्रिक सीनियर यांनी आपल्या मृत्यूपत्रात केलेले बदल ऐच्छिक आणि तर्कशुद्ध आहेत, असा निर्णय न्यायालयाने दिला. हे प्रकरण खरं तर तिथे संपलं; पण ५,००,००० पौंडाच्या मालक असलेल्या आजोबांनी आपल्याशी वाईट वागणाऱ्या, आपल्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पाच नातींना कसा ठेंगा दाखवला याची चर्चा मात्र जगभर रंगली.

नुसतेच आरोप, पुरावा मात्र काहीच नाही! 

‘आपल्या आजोबांना काका टेरी यांची भीती वाटत होती. त्यांना त्यांच्या मुलाने टेरीने शारीरिक जाच केला. त्यांच्या मनात आपल्या मुलाची भीती होती तर सुसान आत्याने आपल्या आजोबांना नातींविषयी भडकावलं. या प्रभावातूनच आजोबांनी मृत्यूपत्र बदललं. आजारी आजोबांवर मुलगा कसा अन्याय करतो, त्यांच्याकडे कशी पैशांची मागणी करतो याविषयी आपल्या नातेवाइकांनीच आपल्याला सांगितलं’, असा आरोप करणाऱ्या फेड्रिक यांच्या नाती मात्र यासाठीचा कोणताही पुरावा न्यायालयाला सादर करू शकल्या नाहीत.
 

Web Title: frederick ward london rich grandfather kept nothing for his relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.