चालता-फिरता आहे, बोलवाल तिथे येईन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 09:28 AM2022-04-22T09:28:32+5:302022-04-22T09:48:30+5:30

साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘लोकमत’च्या व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांची घेतलेली मुलाखत..

Former Marathi Sahitya Sammelan President Laxmikant Deshmukh takes the Interview of Sammelana President Bharat Sasane with on the platform of 'Lokmat' .. | चालता-फिरता आहे, बोलवाल तिथे येईन!

चालता-फिरता आहे, बोलवाल तिथे येईन!

Next


संमेलनाध्यक्षपदाच्या निवडीनंतर विविध ठिकाणी भाषणे करताना ‘लेखकाचा धर्म हा सत्याचा शोध आणि मानवी जगण्याच्या रहस्याचा भेद करणे असतो’, असे तुम्ही वारंवार सूचित केले,  तुमच्या भाषणाकडून अधिकची अपेक्षा करावी का? 
- भारत सासणे :  लेखकाने सत्य बोलले पाहिजे हे खरंतर लेखकाला सांगणे योग्य नाही. ते अभिप्रेतच आहे, पण अलीकडच्या स्थितीत लेखकाचे कथन सीमित होत चालले आहे. ज्याठिकाणी बोलायला हवे तिथे बोललेच पाहिजे. ते उच्चरावाने सांगितले पाहिजे. जीवनातील अतार्किकता भेदून जीवनाच्या पलीकडचे जीवन मांडले पाहिजे. मी रूढ अर्थाने गूढ लेखक नाही, पण माझ्या दीर्घकथांमध्ये गूढ लेखन अनुषंगिक येते. ज्या-ज्या वेळी ते आलेय त्या -त्या वेळी त्या गूढतेमधून सामान्यांच्या जीवनातील अतार्किकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे. गूढता मांडली नाही तर तुम्ही अमूर्त भाग मांडत नाही, असा त्याचा अर्थ असतो. लेखक म्हटले की, वास्तवता मांडली पाहिजे. परंतु, वास्तव हे सापेक्ष असते. एखाद्याचे वास्तव दुसऱ्याचे स्वप्न असू शकते.  त्यामुळे वास्तव आणि स्वप्न यातील भेद समजून घेऊन तो मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

साहित्य महामंडळाच्या सदस्यांनी तुमची एकमताने संमेलनाध्यक्ष पदासाठी निवड केली आहे, परंतु घुमानच्या साहित्य संमेलनावेळी तुम्ही निवडणूकही लढवली होती. हा बदल योग्य वाटतो का? अलीकडे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप नोंदविला आहे. तुम्ही दोन्ही प्रक्रिया जवळून अनुभवल्या आहेत. तुम्ही याकडे कसे पाहता? 
- भारत सासणे : घटनेमध्ये दुरुस्ती करून साहित्य महामंडळाने नवी योजना आणली आहे. त्यांनी निवडणुका नको, असे म्हटले. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून संमेलनाध्यक्षाची गुणवत्तेच्या आधारावर विवेकाने निवड करावी, असे ठरले. त्यामुळे मतदानातून निवडीचा प्रकार बंद झाला. माझी बिनविरोध निवड झाली म्हणजे गटबाजी झाली नाही. माझ्याकडून कुणालाही दुखावले गेले नाही.  कारण निवड झाली नाही तर समर्थक नाराज होतात. त्यामुळे सध्याची बिनविरोध निवड प्रक्रिया ही आनंददायी आहे.  

उदगीरच्या साहित्य संमेलनात नाशिकप्रमाणेच राजकारण्यांची मंचावर गर्दी होणार आहे. त्यामानाने उस्मानाबादमध्ये राजकारण्यांची फारशी भाऊगर्दी झाली नव्हती. राजकारण्यांच्या संमेलनातील सहभागाकडे कसे पाहता? 
- भारत  सासणे :  राजकीय मंडळींचा वावर संमेलनाच्या मंचावर कधी नव्हता? तो या ना त्या स्वरूपात होताच. त्याची व्यावहारिक किंवा राजकीय कारणे असू शकतील. मात्र, एक मर्यादा ठेवली पाहिजे.  त्यांचा फार बडेजाव, गर्दी किंवा वरचष्मा नसावा. असे व्हायला नको की, संमेलनाच्या अध्यक्षांनाच वेळ मिळाला नाही. यापूर्वी असे क्वचित झालेदेखील आहे. हा साहित्याचा मंच आहे. त्यामुळे साहित्यिकच तिथे असले पाहिजेत. साहित्यावरच चर्चा झाली पाहिजे. पण हेही खरं आहे की, राजकारण्यांमध्ये रसिक आणि जाणकार असतात. ते येतील, आपल्याबरोबर बसतील. एका मर्यादेपर्यंत त्यांचे स्वागत करायला हरकत नाही. 

‘चिरदाह’पासून ‘दाट काळा पाऊस’पर्यंतचा प्रवास हा मूर्ततेकडून अमूर्तकडे अथवा सुलभतेकडून व्यामिश्रतेकडे गेला आहे. हे लेखन परिवर्तन कसे घडले? 
- भारत सासणे : माझ्या साहित्यात बुद्धिगम्यता आणि हृदयगम्यता हे दोन प्रवाह दिसतात. हृदयगम्यतेचा अर्थ असा आहे की, ज्या भावनेला साद घालतात, पटकन समजतात. त्यातून तुम्हाला बोध होतो. बुद्धिगम्यतेमध्ये विचार आणि संस्कारांचे आव्हान आहे. वेगवेगळे संदर्भ माहिती असायला हवेत. ‘दाट काळ पाऊस’मध्ये ‘आय थिंग आय एम’ नावाची कथा आहे. हे कोटेशन कुणाचे आहे हे माहिती असेल तर तुम्हाला कथा कळू शकते. माहिती नसले तरी काही बिघडत नाही. हे संदर्भ वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले असतात आणि कथाकार ते पेलत जातो. भावगम्यता, बुद्धिगम्यता या प्रकारांमध्ये कुठेतरी दुर्बोधता यायला लागते. पण दुर्बोधता येते तेव्हा वाचकांसमोर एक आव्हान नि आवाहनही असते. वाचकांनी स्वत:ची तयारी करावी लागते. त्याला अभ्यास करावा लागतो. त्यानंतर तो लेखकाच्या अधिक जवळ येतो. लेखकाला काय म्हणायचेय हे त्याला पटकन कळते आणि त्याला कथा कळायला लागते. माणसाला अधिक समजून घ्यायला लागल्यावर लेखनात अमूर्तता येत जाते.

तुम्ही प्रामुख्याने दीर्घकथाकार म्हणून ओळखले जाता. दीर्घकथा आणि कथा तसेच कादंबरी व लघुकादंबरीमध्ये काय फरक आहे?
- भारत  सासणे : माझी ओळख लघुकथाकार अशी आहे. त्यावेळी मासिक, दिवाळी अंकांमध्ये माझ्या लघुकथा प्रसिद्ध होत असत. लघुकथा म्हणजे सुईच्या अग्राप्रमाणे वेदना देणारा जो अनुभव असतो तो लघुकथेच्या अनुषंगाने जातो. दीर्घकथा व्यामिश्र असते. त्यात बहुकेंद्री अनुभव कालपटलावर मांडलेला असतो. समाजामध्ये जी जटिलता वाढली होती, त्यात माणसाला शोधायचे असेल तर त्यासाठी विस्तृत पटल पाहिजे. दीर्घकथा लिहिली जात होती तरी ती स्तब्ध होती. सर्वसामान्यांच्या लढाया, वेदना दीर्घकथेमध्ये व्यापक पद्धतीने मांडता येतात असे वाटल्याने  दीर्घकथेकडे वळलो. 

तुम्ही दीर्घकाळ प्रशासकीय सेवेत होतात. राजकीय, सामाजिक वातावरण जवळून पाहिले आहे. तुमच्या साहित्यात त्याचे पडसाद खूप कमी उमटतात..
- भारत सासणे: प्रशासकीय सेवेत असताना अनेक गोष्टींचा अनुभव मी घेतला. जे पाहिले किंवा अनुभवलेले असते ते नकळतपणे झिरपतच असते. त्याचा शोध कदाचित कलात्मक, सूचक असतो. माझ्या अनेक दीर्घ किंवा लघुकथांमध्ये राजकीय वातावरण उतरले आहे. उपहास, शोषण या सर्व गोष्टी त्यात आल्या आहेत. ‘दोन मित्र’मध्ये जातीयता, शोषण यांचा उल्लेख आहे. या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद झाल्यानंतर आजही ती कालसुसंगत वाटते, असे सांगण्यात येत आहे.

तुम्ही चालते-फिरते संमेलनाध्यक्ष झाला आहात, तुम्हाला वर्षभर हिंडायचे आहे. आपण कोणत्या गोष्टींवर भर देणार आहात? 
- भारत सासणे : ग्रामीण भागात सर्वदूर पसरलेल्या मराठी माणसाला मार्गदर्शन मिळण्याची इच्छा असते. मला जिथे बोलावले जाईल तिथे मी जाणार आहे. वर्षभर राज्य आणि राज्याबाहेर जाऊन लोकांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
शब्दांकन : नम्रता फडणीस
 

Web Title: Former Marathi Sahitya Sammelan President Laxmikant Deshmukh takes the Interview of Sammelana President Bharat Sasane with on the platform of 'Lokmat' ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.