हुंदक्यांचा विसर
By Admin | Updated: April 24, 2017 23:22 IST2017-04-24T23:22:13+5:302017-04-24T23:22:13+5:30
कुपोषित मुलांचे रडणे मोदींना अस्वस्थ करीत नाही. मात्र देवांच्या हाकांनी आणि मंदिराच्या घंटांनी ते प्रसन्न झालेले आपल्या साऱ्यांनाच दिसतात.

हुंदक्यांचा विसर
कुपोषित मुलांचे रडणे मोदींना अस्वस्थ करीत नाही. मात्र देवांच्या हाकांनी आणि मंदिराच्या घंटांनी ते प्रसन्न झालेले आपल्या साऱ्यांनाच दिसतात. मग शेतकऱ्यांची स्मशानभूमी असलेल्या विदर्भात येताना त्यांना इथल्या चिता कशा दिसणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वच विषयांवर आवडीने बोलत असतात. स्कील इंडिया ते डिजिटल इंडिया, लहान मुलांच्या खेळापासून तर गृहिणींच्या स्वयंपाकापर्यंत ते अधिकारवाणीने सांगतात. मोदी एखाद्या शाळेत गेले तर तिथल्या मुलांसोबत टेबलही वाजवू लागतात. परवा रस्त्यात वाहन थांबवून एका चिमुकलीशी त्यांनी गप्पाही मारल्या. अक्षय कुमारच्या मुलाचे कान जितक्या आपुलकीने ते धरतात तेवढ्याच रसिकतेने एखाद्या चित्राबद्दल ‘मन की बात’ही करतात. पण, या सर्व ‘नमोगिरी’त शेतकरी कुठेच नसतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी दाभाडीत शेतकऱ्यांच्या दु:खाने व्यथित झालेले मोदी नंतर असे निर्विकार का वागतात हा प्रश्न साऱ्यांनाच सतावत असतो.
मोदी परवा नागपुरात होते. तास-दीड तासाच्या भाषणात त्यांनी प्रचंड टाळ्या घेतल्या. मोदी मोदी या जयघोषाने एरवी ते सुखावून जातात. त्या दिवशी ते अक्षरश: मोहरून गेले. मोदींना आता अशा जयघोषाची सवय झाली आहे. असे काही ऐकायला मिळाले नाही तर ते अस्वस्थही होत असावेत. नागपुरातील भाषणात सवयीप्रमाणे मोदी साऱ्याच विषयांवर बोलले. अपवाद फक्त शेतकऱ्यांचा. विदर्भात मागील ३० वर्षात लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्याबद्दलचा एक साधा उसासा तरी त्यांच्या भाषणात दिसेल, शेतकऱ्यांच्या कल्याणाबद्दल ते काहीतरी बोलतील, असे अभिप्रेत होते. पण, तसे काहीच घडले नाही. महिनाभरापूर्वी साहेबराव करपे या शेतकऱ्याच्या स्मृतिदिनी महाराष्ट्रातील हजारो भूमिपुत्रांनी एक दिवसाचा अन्नत्याग केला. त्या अन्नत्यागाची करुण वार्ता मोदींना पोहोचली असणारच. रेल्वेत एखाद्या बाळाला दूध हवे असेल तर मोदींचे जागरूक मंत्री तत्परतेने तिथे दूध पोहचवतात. इथे विदर्भात शेतकरी विधवांनी फोेडलेला टाहो त्यांच्या कानावर जात नसेल असे कसे म्हणता येईल?
मोदी नवरात्रात उपवास करतात. त्यांच्या उपवासाचे प्रयोजन त्यांनाच लखलाभ. पण, किमान एक दिवस तरी शेतकऱ्यांच्या नावाने त्यांनी उपवास केला तर मरण पत्करायला लावणाऱ्या भूकेच्या तळाशी ते पोहचू शकतील. पण, मोदी तसे करणार नाहीत. मोदी सदैव सावध असतात. कुठे काय बोलावे, काय ऐकू यावे, याचे भान त्यांना असते. नागपुरातील भाषणात ते मराठीत बोलतात, अमेरिकेत ओबामांना भेटायला जाताना खास मेकअप करून जातात, नागालँडच्या सभेत तिथला पेहराव त्यांच्या अंगावर असतो. पण, दादरीत मारल्या गेलेल्या अखलाखचा आकांत त्यांना ऐकू येत नाही, दाभोलकर-पानसरेंच्या बाजूने उभा झालेला आक्रोशही त्यांना व्यथित करीत नाही. नक्षलवाद्यांनी मारलेल्या आदिवासींच्या व्यथा त्यांच्या कानावर जात नाहीत आणि देशातील एकतृतीयांश कुपोषित मुलांचे रडणेही त्यांना अस्वस्थ करीत नाही. मात्र देवांच्या हाकांनी आणि मंदिराच्या घंटांनी ते प्रसन्न झालेले आपल्या साऱ्यांनाच दिसतात. मग शेतकऱ्यांची स्मशानभूमी असलेल्या विदर्भात येताना मोदींना इथल्या पेटलेल्या चिता कशा दिसणार? संसदेतील पहिल्याच भाषणात जुनाट कायदे नष्ट करू असे मोदींनी सांगितले आणि नंतर त्या कायद्यांचा त्यांनी दफनविधीही केला. पण, ज्या कायद्यांमुळे माणसे मरत आहेत त्यांना वाचवावेसे मोदींना वाटत नाही.
मोदींना सत्तेवर येऊन तीन वर्षे होत आहेत. आता उरलेत फक्त दोन वर्ष. पुढे ते काही करतील असे वाटत नाही, याचे कारण असे, की त्यांना आभासी विकासाचे प्रचंड आकर्षण आहे. समाज म्हणून आम्ही एवढे नतद्रष्ट की मोदी आणि त्यांच्या सग्या-सोयऱ्यांना त्याची जाणीव करून देण्याची आमची हिंमतही नाही. आपण आपल्याच पोशिंद्याची प्रेते अशी किती दिवस खांद्यावर घेऊन जायची? शेतकरी गलितगात्र आहे. तो उभाही राहू शकत नाही. मग त्याच्यासाठी समोर कुणी यावे? शेतकऱ्यांच्या मुलांनीच आता पुढे यायला हवे. पण ही पोरं आपले सत्त्व गमावून बसली आहेत. जी शहरात आहेत ती मोदी-राहुल गांधींच्या सभेत कंठशोष करीत असतात आणि गावातच राहिलेली जातींच्या मोर्चात ‘मौन’ असतात. अशा भूलथापांना बळी पडत असताना या पोरांनी आतातरी आपल्या मेलेल्या बापाचे स्मरण करू नये का? हे सुरू राहील तोपर्यंत आपल्या खांद्यांवरील प्रेतांचे ओझे असेच वाढत जाईल आणि शेतकऱ्यांचे हुंदकेही मग कायमचे विरून जातील.
- गजानन जानभोर