- बी.व्ही. जोंधळे(सामाजिक कार्यकर्ते)एकीकडे महिलावर्ग पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवीत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्यावर अनन्वित अत्याचार होत राहावेत या विसंगतीचा अर्थ असा की, स्त्रियांकडे एक माणूस म्हणून न पाहता ती एक भोगदासीच आहे. अशा पुरुषप्रधान विकृत दृष्टिकोनातून पाहिले जात असल्यामुळे स्त्रियांवर जोरजबरदस्ती करून त्यांच्यावर अमानुष अत्याचार होत असतात, होत आहेत, जे की निंद्य आहेत. उच्चभ्रू महिलांवरील अत्याचाराची चर्चा होते, महिला रस्त्यावर उतरतात, मोर्चे काढतात, बलात्काऱ्यांना फाशी देण्याची मागणी करतात. हे सारे स्वाभाविक नि रास्त आहे; पण त्याच वेळी दलित महिला-मुलींवर अत्याचार झाले तर समाज मूक राहतो.अत्याचारातही धर्म-जात पाहिली जाते. परिणामी, दलित स्त्रियांची दयनीय स्थिती, तिचे दु:ख, तिच्यावरील अन्याय-अत्याचार दुर्लक्षितच राहतो, ही बाब चिंतेची म्हटली पाहिजे. दरवर्षी ८ मार्च हा महिला दिन म्हणून पाळला जातो. यंदाही तो पाळला गेला. उच्चमध्यम, मध्यमवर्गीय महिलांना नजरेसमोर ठेवून चर्चा झाली, सेलेब्रिटी महिला, कलाकार, अभिनेत्री वगैरेंच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या; पण या सर्व सोपस्कारात दलित महिलांचा मात्र सर्वांनाच विसर पडला. त्यांच्याविषयी चकार शब्दसुद्धा उच्चारला गेला नाही, ही बाब गंभीर म्हणावी अशीच आहे.दलित महिलांना प्रत्येक ठिकाणी दुहेरी अन्यायाला बळी पडावे लागते. एक तर स्त्री म्हणून आणि दुसरीकडे जातीय भावनेतून. अत्याचार कुणावरही होवो तो निंद्यच असतो; पण दलित महिला-मुलींवरील अत्याचाराची समाज म्हणून संवेदनशीलतेने दखल घ्यायला आपण तयार नसतो. खैरलांजीप्रकरणी आंदोलने केली ती दलित समाजाने. अगदी ताजे उदाहरण म्हणजे अलीकडेच सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावी (जि. औरंगाबाद) एका दलित महिलेला जाळून मारले; पण त्याची फारशी चर्चाही झाली नाही. आंदोलने तर दूरच, अन्यत्र होणाºया अत्याचारात लोकप्रतिनिधी, मंत्री पीडितेच्या भेटीस जातात; पण दलित महिलांवरील अत्याचाराबाबत आपण फारसे गंभीर नसतो. एखाद्या दलित तरुणाने वरच्या जातीतील मुलीशी प्रेम केले तर त्याला दिवसाढवळ्या मारताना उभा गाव पाहतो; पण साक्ष द्यायला कुणी पुढे येत नाही. साक्षीदार फितूर होतात, कारण जात. जातीचा हा ब्रह्मराक्षस इतका जबर आहे की, दलित स्त्रिया अस्वच्छ असतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होऊ शकत नाही, असे एखादे न्यायमूर्ती म्हणू शकतात. यापेक्षा दलित स्त्रीची असंवेदनशील अवहेलना ती काय असू शकते?
पांढरपेशा स्त्रीमुक्ती चळवळीत दलित महिलांचा विसर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 06:21 IST